महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर महाराष्ट्रात आघाडी निरुत्तर!

By किरण अग्रवाल | Published: May 23, 2019 08:11 PM2019-05-23T20:11:51+5:302019-05-23T20:19:31+5:30

Maharashtra Lok Sabha election results 2019: भाजप व शिवसेनेसाठी हे यश आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा उत्साह वाढविणारेच ठरले आहे

Maharashtra Lok Sabha election results 2019: North Maharashtra lead no answer! | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर महाराष्ट्रात आघाडी निरुत्तर!

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर महाराष्ट्रात आघाडी निरुत्तर!

Next

- किरण अग्रवाल

नाशिक : तीन ठिकाणी उमेदवार बदलूनही भाजप-शिवसेना युतीने नगरसह उत्तर महाराष्ट्रात यंदा पुन्हा शत-प्रतिशत जागा राखण्याच्या दिशेने घोडदौड चालविल्याने विरोधकांची विकलांगता स्पष्ट होऊन गेली आहे. विशेषत: नाशिकमध्ये ‘मनसे फॅक्टर’ राष्ट्रवादीसाठी उपयोगी ठरू शकला नाही, तर दिंडोरी लोकसभा मतदार-संघातील भुजबळ प्रतिनिधित्व करीत असलेल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघातही भाजप उमेदवारास मताधिक्य लाभले. ही बाब राष्ट्रवादीसाठी धोक्याची सूचना ठरू शकणारी आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या चार जागा काँग्रेसकडे असूनही तेथे या पक्षाला यशापर्यंत पोहोचता आले नाही. या बाबी आगामी विधानसभा निवडणुकीतही परिणामकारक ठरण्याची चिन्हे नाकारता येऊ नये.

गेल्या २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेच्या बळावर नगरसह उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी सहा जागा भाजपने तर दोन जागा शिवसेनेने काबीज केल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळेसारखी मोदी लाट नसल्याचे अंदाज बांधले गेल्याने किमान दोन ते तीन जागा तरी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदरात येतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती; परंतु युतीने पुन्हा नाशिक विभागातील आपले शत-प्रतिशत वर्चस्व सिद्ध केल्याचे दिसून आले आहे. विशेषत: अहमदनगरची जागा आघाडीअंतर्गत राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील भाजपकडे गेले व विजयीही झाले. परंतु राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप ही जागा मिळवू शकले नाहीत. वस्तुत: येथे खासदारकीची हॅट्ट्रिक केलेल्या दिलीप गांधी यांची उमेदवारी कापण्यात आली होती.

सुजय यांच्यासाठी त्यांचे पिताश्री व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघडपणे प्रचार केला. त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्व अस्मितेची लढाई ठरली होती व अखेर त्यांनी यशही मिळविले. विखे यांना शह देण्यासाठी जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसने बळ दिले. थोरात यांच्याच संगमनेरला पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा शेवटच्या चरणात घेण्यात आली तरी ती नगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप किंवा शिर्डीतील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना लाभदायी ठरू शकली नाही. शिर्डीत दुसऱ्यांदा शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयाच्या वाटेवर आहेत. काँग्रेसचे चार आमदार असून, शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराची दाणादाण उडाली ही बाब उद्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी धोक्याचा संकेत देणारीच म्हणता यावी.

जळगावमध्येही यंदा भाजपने उमेदवारी बदलली. त्यातही अगोदर आमदार स्मिता वाघ यांना घोषित केलेली उमेदवारी नंतर चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना देण्यात आली. यावरून अमळनेरच्या सभेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तेथील आमदारांना धक्काबुक्की केली गेल्याची घटनाही घडून आली; पण तरी पाटील यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. अर्थात, यात जळगावमधील शिवसेनेचे मातब्बर नेते सुरेशदादा जैन व अन्य शिवसेना नेत्यांनी भरभक्कम पाठबळ पाटील यांच्या पाठीशी उभे केल्याने जळगावमध्ये भाजपला मताधिक्य राखता आले. तेथे राष्ट्रवादीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिली होती; परंतु ते यशस्वी ठरू शकले नाही. रावेरमध्ये भाजपच्याच रक्षा खडसे दुसऱ्यांदा खासदारकीच्या उंबरठ्यावर आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या दोन-अडीच वर्षापासून सत्तेबाहेर असले तरी या मतदारसंघावरील त्यांची पकड व प्रभाव यानिमित्ताने स्पष्ट व्हावा. या जागेवर यंदा दहा वर्षांनंतर काँग्रेसला उमेदवारी करायची संधी लाभली. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी पुरेपूर प्रयत्नही केला; परंतु प्रचारासाठी वेळ कमी पडल्याने की काय, ते विजयाप्रत पोहोचू शकले नाहीत.

धुळे व नंदुरबार या दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारास बंडखोरांना सामोरे जावे लागले. धुळ्यात आमदार अनिल गोटे यांनी अपक्ष उमेदवारी केली तर नंदुरबारमध्ये पक्षातर्फे यापूर्वी दोनदा निवडणूक लढलेल्या सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली तरी डॉ. सुभाष भामरे व डॉ. हीना गावित दुस-यांदा लोकसभेची पायरी चढणार आहेत. नंदुरबारमध्ये काँग्रेसने तब्बल तीस वर्षांनंतर उमेदवार बदलून आमदार के.सी. पाडवी यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते; परंतु शिरपूर व साक्री विधानसभा मतदारसंघाने गावित यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. धुळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास दाजी पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीची साथही त्यांना लाभली; परंतु डॉ. भामरे यांना मोदी यांच्या प्रतिमेचाही लाभ झाल्याने कुणाल पाटील मागे पडले.

नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी सलग दुस-यांदा लोकसभा गाठून अपवाद वगळता खासदार रिपीट न करण्याचा नाशिककरांचा पायंडा मोडीत काढला. येथे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याऐवजी त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. गत पाच वर्षातील गोडसे यांचा जनसंपर्क, त्यास मोदी फॅक्टरची लाभलेली जोड यामुळे ते पुन्हा विजय मिळवून गेले. नाशकात राज ठाकरे यांनी सभा घेतल्याने मनसे फॅक्टर भुजबळांना उपयोगी ठरण्याचे आडाखे बांधले जात होते; पण तसेही घडले नाही त्यामुळे यापुढील काळात मनसेलाही नाशकात आशावादी राहता येऊ नये. दिंडोरीतही भाजपने हॅट्ट्रिक केलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी बदलली.

राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपने रिंगणात उतरविले तर शिवसेनेतून आलेले धनराज महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. परंतु या लोकसभा मतदारसंघातील चांदवड - देवळा, येवला, नांदगाव व निफाड मतदारसंघातील मताधिक्याच्या बळावर डॉ. पवार यांनी बाजी मारली. यात उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ प्रतिनिधित्व करत असलेल्या येवला व त्यांचे पुत्र पंकज आमदार असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातही भाजपला मताधिक्य लाभल्याने यापुढील विधानसभेसाठीच्या वाटा अवघड बनल्याचे संकेत घेता यावेत. नाशकात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे व दिंडोरीत माकपा उमेदवार जे.पी. गावित यांना फार मजल गाठता आली नाही. त्यामुळेही गोडसे व डॉ. पवार यांचा मार्ग सुकर झाला.

एकूणच नाशिक विभागातील युतीचा वरचष्मा या निकालाने स्पष्ट झाला असून, त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेऊन व पक्षाचे बळ एकवटूनही या पक्षाला एकही जागा मिळविता आली नाही. नगर जिल्ह्यात विखेंचाच दबदबा सिद्ध झाला तर थोरात मागे पडले, जळगाव जिल्ह्यात व नाशिकचे पालकमंत्री असल्याने नाशिक जिल्ह्यातही गिरीश महाजन यांचे नेतृत्व उजळून निघाले. विभागात उमेदवारी केलेल्या सातपैकी एकमेव आमदार उन्मेश पाटील यांना विधानसभेतून लोकसभेत जाण्याची संधी लाभली. त्यामुळे चाळीसगावच्या जागेवर दुस-या व्यक्तीला संधीची कवाडे उघडणार आहे. एकूणच भाजप व शिवसेनेसाठी हे यश आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा उत्साह वाढविणारेच ठरले आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी तसेच त्यांना साथ देणारी मनसे निरुत्तर झाली आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha election results 2019: North Maharashtra lead no answer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.