मनाचिये गुंथी - कल्पवृक्ष
By admin | Published: March 28, 2017 12:29 AM2017-03-28T00:29:37+5:302017-03-28T00:29:37+5:30
शास्त्रामध्ये एक कथा आहे, एक वाटसरू रखरखत्या उन्हात प्रवास करीत असतो. एका डेरेदार वृक्षाला पाहून तो त्याखाली विश्रांती
शास्त्रामध्ये एक कथा आहे, एक वाटसरू रखरखत्या उन्हात प्रवास करीत असतो. एका डेरेदार वृक्षाला पाहून तो त्याखाली विश्रांती करण्याचे ठरवितो. त्याला खूप जोराची भूक लागलेली असते. त्यामुळे त्याच्या मनात एक तीव्र इच्छा उत्पन्न झाली व त्याला वाटले की जर इथे कोणी छान जेवण आणून दिले तर किती बरे होईल ! त्याक्षणी त्याच्यासमोर स्वादिष्ट जेवण आले. जेवण केल्यानंतर त्याची चांगल्या बिछान्यावर झोपण्याची इच्छा झाली. लगेच चांगला बिछाना आला. गाढ झोपेतून उठल्यानंतर त्या वाटसरूच्या मनात भीती निर्माण झाली की या निर्जनस्थळी चोर-डाकू तर येणार नाही ना ! लगेच तिथे चोर-डाकू आले. त्यांना पाहून अत्यंत घाबरून त्याने विचार केला की, हे चोर-डाकू आपल्याला मारपीट करून लुटणार तर नाही ना! एवढ्यातच त्या चोर-डाकूंनी त्याला मार-पीट करून लुटले आणि या सर्व घटना ज्या वृक्षाखाली झाल्या तो कल्पवृक्ष होता. वैदिक साहित्यामध्ये कल्पवृक्षास असे मानले गेले आहे की, ज्याखाली बसून केलेली इच्छा तत्क्षणी पूूर्ण होते. जैन तथा बौद्ध शास्त्रामध्येसुद्धा कल्पवृक्षाचा उल्लेख आढळतो. समुद्र-मंथनाच्या वेळी जे चौदा रत्न निघाले त्यापैकी एक कल्पवृक्ष होय. या वृक्षाला देवराज इंद्र आपल्यासोबत घेऊन गेले व त्यांनी स्वर्गात ते वृक्ष लावले. जरी कल्पवृक्ष काल्पनिक असला तरी त्याचे एक सूचनात्मक महत्त्व आहे. प्रत्येक मानवाचे मन हे कल्पवृक्ष आहे. जसे कल्पवृक्ष इच्छित फळ देतं त्याचप्रमाणे आपले मनसुद्धा आपल्या मनात येणाऱ्या विचारांना फलित करीत असतं. जर सकारात्मक विचारांना प्राधान्य दिले तर आपल्या जीवनातसुद्धा सकारात्मक घटना घडतात. याउलट जर विचार नकारात्मक असतील तर ते सर्व शरीरात नकारात्मक ऊर्जेला जन्म देतात. विज्ञानाने हे सिद्ध केले की प्रत्येक विचार हा एक प्रकारची ऊर्जा आहे. ही ऊर्जा नेहमीच कंपित होत असते आणि या ऊर्जेच्या स्वत:च्या लाटा असतात. जर एखादा विचार बराच काळपर्यंत आपल्या मनात असेल तर तो शेवटी त्याचे परिणाम दाखवतोच. या वैज्ञानिक सत्याला ओळखून पूर्वजांनी मनात चांगले व सकारात्मक विचार उत्पन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. मंत्रजप सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करण्याचा एक उत्तम विधी होय. कोणत्याही मंत्राचा जेव्हा आपण अर्थ पाहतो त्यावेळी ते अत्यंत सकारात्मक व प्रेरणात्मक असल्याचे जाणवते. याचप्रकारे जेव्हा आपण प्रवचन ऐकतो, त्यावेळीसुद्धा सकारात्मक ऊर्जा आपल्या मनात उत्पन्न होत असते. तसेच चांगली पुस्तके वाचल्याने आपले विचार सकारात्मक होतात व त्याप्रमाणे आपले जीवन घडत असते. त्याचप्रमाणे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहेङ्घ.
तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु ।
म्हणजेच माझे मन हे शुभसंकल्पाचे आहे.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय