- नंदकिशोर पाटील‘हल्लीचं पुणं खूपच मंतरलेलं दिसतंय’, असं म्हणत पुलंनी पेपरची घडी घातली आणि मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. ‘स्वर्गात असलो म्हणून काय झालं? रंभा-अप्सरांच्या सहवासात राहायचं असेल तर फिटनेस मेन्टेन्ड करायला नको का? दिवसभर एका जागी बसून नुस्ता कंटाळा येतो. बरं कसला गोंगाट नाही, वाहनांची वर्दळ नाही, पाण्याची टंचाई नाही, की भांड्यांचा आवाज नाही. इतकी नीरव शांतता खायला उठते हो! आमच्या पुण्यात कसं ‘दहीऽऽऽऽ’ अशी नुस्ती आरोळी कानावर आली तरी थंडगार लस्सी पिल्याचा आनंद मिळतो. इथल्या सोमरसास न कसली चव, ना झिंग. यापेक्षा आमच्याकडची नीरा बरी...बहुदा अप्सरांच्या सुरक्षेस्तव हा उपाय योजला असेल!’ असं पुटपुटत भार्इंनी चपला चढवल्या अन् वॉकला बाहेर पडले. बघतो तर काय, समोर प्र.के. अत्रे! ‘बाबुरावांनी स्वत:बरोबर आपली छत्रीही अमर केलेली दिसते!’ ओठावर आलेला हा विनोद गिळून टाकत भाई म्हणाले, ‘काय पीके आज एकदम मार्निंग वॉकला?’ पुलंच्या प्रश्नातील खोच अत्रेंच्या लक्षात आली. ‘अहो पीएल, ज्यासाठी जागावं न लागणं हाच तर स्वर्ग!’‘व्वा क्या बात है!’ अशी दाद देत भार्इंनी हळूच खडा टाकला. ‘बाबुराव, हल्ली आपल्या पुण्याबद्दल बरंच काही कानावर येत असतं...’ कोटाची बटणं सैल करत अत्रेंनी मिश्कीलपणे विचारलं, ‘पेशव्यांनी आपला शनिवारवाडा आमच्या नावे केला की काय?’ ‘करतीलही कदाचित...मुन्सिपाल्टीची बिलं परवडली पाहिजेत ना!’ भार्इंच्या या वाक्यावर दोघेही खळखळून हसले.भार्इंनी मग पुण्यात अलीकडेच घडलेल्या काही घटनांचा वृत्तांत अत्रेंना ऐकविला. ‘हल्ली दीनानाथमध्ये औषधोपचाराने नव्हे, मंत्रोपचाराने रुग्णांस बरे करतात म्हणे! आणि हो, पिंपरीत तुमच्या नावे उभारलेल्या नाट्यगृहात चक्क भुताटकी झाली म्हणे!’ भार्इंचे हे बातमीपत्र मध्येच थांबवत अत्रे म्हणाले, ‘अहो पीएल, मी आजन्म संपादक राहिलो आहे. हजार वर्षांत असे कधी घडले नाही अन् घडणारही नाही. त्यामुळे असल्या अफवांवर मी कसा विश्वास ठेवू?’ अत्रेंच्या या प्रश्नावर पुलंनी लागलीच आपल्या खिशातून मोबाईल काढून ‘त्या’ घटनांचे व्हिडिओ दाखवले. ‘ही तर ‘ब्रॅण्डी’ची कमाल दिसतेय!’ अत्रे उद्गारले.‘अहो बाबुराव, दांडेकर पुलाखालून तुमच्या कºहेचे बरेच पाणी वाहून गेले आहे. घासीराम कोतवालाने तुमची ‘ब्रॅण्डीची बाटली’ केव्हाच उतरून टाकली आहे!’पुलंनी असा ‘भ्रमाचा भोपळा’ फोडताच अत्रेंनी आपला पाईप चेतविला. चांगले दोन-चार झुरके मारले. ‘पीएल, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. लता, आशा, उषा या मंगेशकर भगिनींनी आजवर उभ्या महाराष्टÑाला मंत्रमुग्ध केलं आहे. हल्ली रुग्णांना बरं वाटावं म्हणून म्युझिक थेरपी पण निघाली आहे. दीनानाथमध्ये उघडली असेल त्याची एखादी शाखा!’‘मग पिंपरीच्या नाट्य्गृहातील त्या भुताटकीचं काय?’ भार्इंनी उपप्रश्न टाकला. ‘ते सगळं पुण्यातील हौशी मंडळींनी रचलेलं कुभांड आहे. अहो भाई, न बसलेली त्यांची नाटकं पडली तर म्हणणार भुताटकी झाली!’ अत्रेंच्या या उत्तरावर पुलंनी त्यांना चक्क ‘साष्टांग नमस्कार’च घातला!
(तिरकस)