एका दगडात अनेक
By admin | Published: October 12, 2015 10:11 PM2015-10-12T22:11:48+5:302015-10-12T22:11:48+5:30
मुंबईतील इंदू मिल्सच्या भूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत स्मारकाचे भूमीपूजन करताना आणि त्याच्याही आधी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारुन घेतले
मुंबईतील इंदू मिल्सच्या भूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत स्मारकाचे भूमीपूजन करताना आणि त्याच्याही आधी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारुन घेतले, असे म्हणता येईल? देशातील मागासवर्गीयांना राज्यघटनेने बहाल केलेले आरक्षण मोदी सरकारच काय, पण कोणीही रद्द करु शकत नाही असे नि:संदिग्ध प्रतिपादन करुन त्यांनी रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना तर इशारा दिलाच पण भागवतांनी आरक्षणनीतीच्या फेरविचाराची जी आवश्यकता बोलून दाखविली होती व ज्या विधानामुळे देशातील यादवादि तमाम दलितोद्धारकांनी जी कावकाव सुरु केली होती, ती बंद करुन टाकली. त्याचबरोबर खुद्द मोदींच्या राज्यात पाटीदारांना आरक्षण देण्याच्या मागणीआडून जातीधारित आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरु करणाऱ्या हार्दीक पटेल यालाही उत्तर देऊन टाकले. एकीकडे जातीधारित आंदोलनाला विरोध करायचा आणि दुसरीकडे जातीधारित आंदोलनाचा व्याप वाढविण्याच्या प्रयत्नातील नितीशकुमार यांना पाठिंबा देऊन भाजपाला बिहारात पराभूत करण्याच्या वल्गना करायच्या यातच हार्दीक पटेल यांचे गोंधळी वावदूकगिरी उघड होते. अर्थात पंतप्रधानांनी स्वत: याबाबतीत स्पष्टीकरण केल्यानंतरही लालूप्रसाद आणि प्रभृतींची आगपाखड थांबेलच असे नाही. मोदींनी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दरम्यान जसे अनेक पक्षी गारद केले तसेच कार्यक्रमापूर्वीही काही केले. घटनाबाह्य सत्ताकेन्द्र चालविणे आणि सत्तेचे सारे लाभ घेताना जबाबदाऱ्या मात्र इतरांवर ढकलायच्या याचे बाळकडूच शिवसेनेला मिळालेले असल्याने आपण जरी अष्टौप्रहर भाजपाला दुमत्यात घालीत असलो तरी पंतप्रधानांच्या या कार्यक्रमात आपल्याला व्याह्याचा मान मिळावा अशी शिवसेनेची अपेक्षा होती. पण दुर्लक्षून एखाद्याची कशी उपेक्षा करावी याचा जणू वस्तुपाठच या निमित्ताने मोदींनी घालून दिला. ‘मी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात तिसऱ्या कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही’ असेही मोदी यांनी यावेळी दाखवून दिले. यातून एकप्रकारे कखित शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्यात दुभंग निर्माण झाल्याचे चित्रही समोर आले. अर्थात शिवसेनेला मोदींपेक्षा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचे मोल अधिक वाटावे ही त्यातल्या त्यात एक चांगली आणि स्वागतार्ह बाब मानावी लागेल. मोदींनीही तिचे स्वागत करुन टाकावे.