मनोमन

By admin | Published: July 4, 2016 05:37 AM2016-07-04T05:37:31+5:302016-07-04T05:37:31+5:30

मन काय आहे? म्हटलं तर सर्व काही नाही तर काहीच नाही म्हणून ते आकार, रंगहीन असतं म्हणतात.

Mind | मनोमन

मनोमन

Next


मनाच्या डोहात । टाकला मी खडा
एकही शिंतोडा । उडेचिना
मनावर अशी । कोरली पापणी
तरी कसे पाणी । वाहेचिना
मनावर कशी । दाटू लागे साय
तरी कशी माय । दिसेचिना
आता कसे आले । आटलासे डोह
तरंगांचे मोह । खुळ्यालागी
मन काय आहे? म्हटलं तर सर्व काही नाही तर काहीच नाही म्हणून ते आकार, रंगहीन असतं म्हणतात. ते उचलून दाखविता येत नाही. ते हवेसारखं न दिसता जाणवतही नाही. पण तरी आपण जखमी झालो की मनही जखमी होतं. आपल्याला राग येतो, कंटाळा येतो आणि हे सारं आपण मनापासून होतं, असं म्हणतो. पण मनापासून म्हणजे कुठून? त्याला आदि, मध्य, अंत आहे? सगळेच हवेत हवेमधून बोलत राहाणार. मनाची आकृती काढताना त्यात इद, इगो, सुपरइगो शास्त्रीय पद्धतीने दाखविता येतो. तरीही प्रश्न उरतोच मन म्हणजे काय?
मन अथांग, अनावर डोह वरवर प्रगाढ शांत असलेला, परंतु आत प्रचंड खळबळ असलेला. डोह म्हटलं की खोली आली. त्या खोलीत काय काय साठवलंय कळत नाही, पण एक खरं ह्या डोहात उतरावसं वाटतंच. नव्हे नव्हे आपण उतरतोच. डुबकी मारतो. बुडून जातो. त्यात सूर मारावासा वाटतो. कधी कुणाला त्यात सूर गवसतो म्हणतात. मनात, मनापासून, मनावर, मन लागणे, मन उडणे ह्या सगळ्या मनाच्या प्रत्ययांना कृतीचे अर्थ असतीलही, परंतु कोरड्या ठक्क कृतींचा शेवटही अंतिमत: मनाशी येऊन थांबतो. मग तुम्ही मनात खडा टाकला तरी शिंतोडा उडायचा नाही. मनावर पापणी कोरली तरी पाणी वाहणार नाही. मनावर साय दाटून आली तरी माय दिसणार नाही. कारण हा भरगच्च डोह कधी आटतो कळत नाही मग आपण वेडे खुळे ह्या कोरड्या डोहात तरंगांची वाट पाहातो. लाटा उसळण्याची वाट पाहातो आणि उसळण्याच्या आभासात हेलकावत राहतो. हा प्रवास वेडं लागण्यापासून खुळं होण्यापर्यंतचा असतो. म्हणून संत म्हणतात, ‘वेड लागले वेड लागले । ह्या जनासी वेड लागले.’ ह्या वेडाचं मनाकार होत जाण्याचा आरंभबिंदू मनाला आकार देणं हा आहे! मनाच्या खोड्या अगणित. ते असते आणि नसतेही. मानावे तर मन नाही तर जगण्याचे घण. आपण आपल्याला कितीही खरवडले, उगारले, ताडित केले, कुस्करले वा पुकारले तरी मन सतत हुलकावणी देतच राहते. ते लपंडाव खेळते. वाकुल्या दाखवून आधी जखमी करते आणि नंतर फुंकर घालते.
मी मनाशी बोलतो म्हणजे कुणाशी? माझ्याशी? माझ्यातल्या तिच्याशी? समाजाशी? स्वत:शी? की परात्पर भावनातीत अस्तित्वाशी? तुम्ही त्याला निर्गुण निराकार म्हणा वा सगुण साकार मन त्यांच्या बेचकीतून बाहेर पडते आणि सतत संत, योगी, कवींपासून विचारवंतांना कोडे बनून राहते. म्हणूनच तर स्वत:ला खोदत बोलत राहायचे मनाबद्दल, मनाशी, मनावर!
-किशोर पाठक

Web Title: Mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.