मनाचिये गुंथी - गोड बोला, पण...

By admin | Published: January 13, 2017 12:19 AM2017-01-13T00:19:29+5:302017-01-13T00:19:29+5:30

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते.

Mind forbidden - sweet, but ... | मनाचिये गुंथी - गोड बोला, पण...

मनाचिये गुंथी - गोड बोला, पण...

Next

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते. विसरण्याची शक्यता असते तिथे आठवण करून देण्याची गरज असते. हा आठवण करुन देण्याचा कालावधी तीनशे पासष्ट दिवसांचा आहे. म्हणजे गोड बोलण्याचा संदेश वर्षभर आपल्या लक्षात राहू शकतो असा त्यामागे पूर्वसुरींचा अंदाज असणार. त्यात काही बदल करण्याची गरज आहे का, हे पाहिले पाहिजे. व्यवहाराला प्राथम्य देणारी नवी मूल्य व्यवस्था उदयाला आली असल्याने गोड या शब्दाला काही नव्या अर्थछटांचा स्पर्श झाला आहे का, हे पाहिले पाहिजे.
सामान्यपणे कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. गोड या शब्दाची दुसरी बाजू म्हणजे कडू ! गोड आणि कडू हे दोन्ही शब्द परस्परांना पूर्णत्व देण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. एकाला वगळून दुसऱ्याचा विचार करता येत नाही. म्हणजे गोडात थोडे कडू मिसळणे आलेच. कडू गोष्टी बऱ्याचदा औषधी असतात. औषध तर उघड उघड कडू असते, म्हणून त्याच्या गोळ्या साखरेत घोळून दिल्या जातात. औषध कडू असले तरी माणसाची प्रकृती सुधारावी म्हणून आवश्यक असते. हेच तत्व बोलण्यातही आपल्याला लागू करता आले पाहिजे. अती गोड म्हणजे विष आणि अती कडू म्हणजेसुद्धा विषच. त्यामुळे बोलताना या दोन्हीचे प्रमाण किती ठेवायचे याचे तारतम्य प्रत्येकाने बाळगले पाहिजे.
आपण जरी गोड बोलत असलो तरी कधी ते तोंडदेखले, कधी वरवरचे, कधी तिरकस, कधी अतिशयोक्तीपूर्ण, तर कधी कुचेष्टापूर्ण देखील असू शकते. समोरच्या माणसाची आकलनक्षमता लक्षात घेऊनच यातील कोणता शब्दालंकार वापरायचा हे ठरवता आले पाहिजे, नाही तर गैरसमजुतीचा घोटाळा होणार हे नक्की ! एखाद्याच्या स्तुतीचा पतंग आकाशात उडवताना त्याचे जमिनीवरचे पाय तर सुटत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवणे हीसुद्धा आपली जबाबदारी ठरते.
आपल्याविषयी इतरांनी गोड बोललेले आपल्याला आवडते मात्र आपण इतरांच्या बाबतीत तसेच वागतो का, याचाही विचार करणे तितकेच महत्वाचे आहे. त्याही पलीकडे जाऊन तीळगुळ समारंभ हा केवळ एक उपचाराचा भाग तर झालेला नाही ना, हेही तपासून बघण्याची वेळ आली आहे. तोंडातली तीळगुळाची चव लुप्त व्हायच्या आतच माणसे पुन्हा कडू बोलायला सुरुवात करणार असतील तर रोजच्या रोज तीळगुळ समारंभ करूनही त्याला काही अर्थ राहणार नाही.
- प्रल्हाद जाधव

Web Title: Mind forbidden - sweet, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.