कळतं; पण वळत का नाही?

By किरण अग्रवाल | Published: December 7, 2017 07:50 AM2017-12-07T07:50:34+5:302017-12-07T07:52:32+5:30

‘लग्न म्हणजे लईभारी लाडू; पण भलतं जोखमीचं लचांड, तेव्हा सांभाळून रे बाबाऽऽ...’, असे अनेक अनुभवसंपन्न रथी-महारथी सांगत असतानाही कुणी ऐकतं का त्यांचं? नाही ना?

mobile phones cause cancer | कळतं; पण वळत का नाही?

कळतं; पण वळत का नाही?

Next

‘लग्न म्हणजे लईभारी लाडू; पण भलतं जोखमीचं लचांड, तेव्हा सांभाळून रे बाबाऽऽ...’, असे अनेक अनुभवसंपन्न रथी-महारथी सांगत असतानाही कुणी ऐकतं का त्यांचं? नाही ना? मग तस्सच स्मार्ट फोनचं आहे. त्याच्या अतिवापराने मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, वगैरे काहीही संशोधन पुढे येऊ द्या; पण ते वापरल्याखेरीज हल्लीच्या युगात राहणण्यास आपण पात्र नसल्याचीच प्रत्येकाची भावना झाली आहे जणू. त्यामुळे धोका स्वीकारून प्रत्येकजण त्यासंबंधीच्या अतिरेकाकडे दुर्लक्ष करतो. कळतं; पण वळत का नाही, असा प्रश्न सुजाण मनाला पडतो तो त्यामुळेच !

मोबाइल क्रांतीने जग माणसाच्या मुठीत आणले आहे हे खरेच; पण या तंत्राच्या अतिरेकी वापराने आपण स्वत:हून मृत्यूला कसे आमंत्रण देत आहोत, याबद्दल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा एक अहवाल नुकताच समोर येऊन गेला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांच्या संदर्भाने केंद्रीय दूरसंचार विभागाने स्थापन केलेल्या एका समितीने हा अहवाल सादर केला असून, त्यानुसार स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता तब्बल ४०० टक्क्यांनी वाढली आहे. अर्ध्या तासाहून अधिककाळ स्मार्ट फोनचा वापर करणे धोक्याचे असून, या फोनमधून होणारा किरणोत्सर्ग शरीरावर विपरीत परिणाम करीत असल्याचे व त्यातून निद्रानाश, पार्किन्सन व अल्झायमरसारख्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याचेही निरीक्षण या अहवालात नोंदविले गेले आहे. सदान्कदा मोबाइल फोनला चिपकून असलेल्या तरुणपिढीच्या आरोग्याबद्दलची चिंता वाढविणाराच हा अहवाल असला तरी तो गांभीर्याने घेतला जाणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण, धोक्याचा इशारा देणारा हा असा एकमेव अहवाल नाही. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनीही संशोधनाअंती एक अहवाल अलीकडेच सादर केला असून, त्यानुसार स्मार्ट फोनवर जेवढा वेळ घालविला जातो, तेवढी त्या व्यक्तीमधील नैराश्यग्रस्तता वाढून आत्महत्येचा धोका वाढतो. दररोज पाच किंवा त्यापेक्षा अधिक तास इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर घालविणा-या मुलांपैकी ४८ टक्के मुलांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती आढळून आल्याची बाबही या शास्त्रज्ञांनी नोंदविली आहे. मुलांच्या भवितव्याबद्दलच्या चिंतेत भर घालणा-या या बाबी आहेत. कारण, एकीकडे ही अशी वास्तविकता समोर येत असली तरी, नवीन पिढी यातून काही बोध घेण्याचा प्रयत्नसुद्धा करताना दिसत नाही. चिंतेत भर पडते आहे ती त्यामुळे.

महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वीही याबाबत अनेकांकडून बरीच चर्चा करून झाली आहे, सांगून झाले आहे; पण ऐकतो कोण? उलट दिवसेंदिवस नवनवीन तंत्र विकसित होत असून, तरुणपिढी आहे त्यापेक्षा अधिक ‘स्मार्ट’ बनण्यासाठी धावताना दिसत आहे. 4G (फोर जी) सेवेचे तंत्रज्ञान अजून सर्वदूर पोहोचायच्या आतच त्यापुढील 5Gचे वेध या पिढीला लागले आहेत. सर्वापेक्षा पुढे, सबसे तेज... धावण्याचा अट्टाहास यामागे आहे. काळानुरूप तो आवश्यकही आहे, अन्यथा तुम्ही स्पर्धेत मागे पडाल किंवा बाहेर फेकले जाल. पण, म्हणून जिवाची पर्वा न करता धावायचे? शेवटी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो, हा साधासोपा समाजनियम आहे. खाण्या-पिण्यातला असो की वापरातला; अतिघाई संकटात नेई म्हणतात त्याप्रमाणे, अतिरेकी, अनिर्बंध, अवाजवी व अविवेकी व्यवहार-वर्तन जिवाशी गाठ आणल्याखेरीज राहात नाही; पण लक्षात घेतो कोण?

तरुण पिढी तर मोबााइल वेडात अक्षरश: वेडावली आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे  ठरू नये, इतके हे ‘फॅड’ आवश्यकतेच्या सबबीखाली फोफावले आहे. मोबाइल वापराला विरोध, असा हा विषय नाही. त्याच्या अतिरेकी वापरावर बंधने हवीत, अशा दृष्टीने याकडे बघायला हवे. हा अतिरेकी अगर अनावश्यक वापर कसा, तर स्वत:च्या हाताने स्वत:ची चड्डी नेसता न येणाºया बालकांच्या हाती स्मार्ट फोन देऊन ‘आमचा बबड्या बघा किती हुश्शारऽ...’ अशा फुशारक्या मारणारी तरुण जोडपी हल्ली समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात. अशा बालकांच्या आजी-आजोबांनाही आपल्या नातवंडांचे असे काही कौतुक असते की विचारू नका! कारण, राजा-राणीच्या, परीच्या नीती वा बोधकथा सांगण्याऐवजी पोरांच्या हाती मोबाइलचे खेळणे सोपविले की, आजी-आजोबा आपले मोकळे होतात शेजारच्याला किती पेन्शन बसली याच्या गप्पा मारायला! रात्री उशिरापर्यंत पुस्तकात डोके घालून बसणारे कारटे पाहिले की पालकांचा ऊर कसा अभिमानाने भरून येतो. हल्ली पोरांच्या जिवापेक्षा अभ्यासच अधिक भारी बुवाऽ... असे छान तोंड वेंगाळून ते समाजात बोलतानाही दिसतात. पण ते कारटं पुस्तकात मोबाइल ठेवून व कानात ‘इअर फोन’ घालून गाणं ऐकत किंवा भलतच काही पाहात बसलेलं असतं हे अनेक पालकांच्या लक्षातही येत नाही. याचसंदर्भात एक विनोद नेहमी सांगितला जातो. लग्नाच्या मांडवात खाली मान घालून बसलेल्या नव-या मुलीकडे पाहात एक आजीबाई मोठ्या कौतुकाने आपल्या समवयस्काला सांगतात, ‘मुलगी किती सुशील, संस्कारी व लाजाळू आहे बघा, की मान वर करीत नाही.’ तेव्हा नवरीची करवली सांगते, ‘आजीबाई, ती मोबाइलवर तिच्या मित्रांशी चॅटिंग करतेय’. आता बोला !!

थोडक्यात, अशी अनेक उदाहरणे देता येणारी आहेत. ती तशीच घडतात असेही नाही. केवळ स्मार्ट फोनचे वाढते अतिरेकी वेड लक्षात यावे म्हणून ती उल्लेखिली आहेत. मुद्दा एवढाच की, मोबाइलवरून काढल्या जाणा-या ‘सेल्फी’ व त्या सेल्फीमुळे अपघात होऊन गमावणारे जीव, हा जसा संशोधनाचा व चिंतेचा विषय बनला आहे, त्याचप्रमाणे स्मार्ट फोनचा अनावश्यक व अतिरेकी वापर हा कसा मेंदूच्या कर्करोगाला, नैराश्याला व आत्महत्यांना निमंत्रण देणारा ठरू शकतो याचे संशोधन पुढे आल्याने त्याबाबत सक्तीने का होईना, पाऊले उचलली जाणे गरजेचे ठरावे. कळते; पण वळत नाही हा यातील मुद्दा असल्याने ही सक्तीची अपेक्षा गैरवाजवी ठरू नये. अन्यथा, प्रारंभी केलेला लग्नाच्या लाडूचा उल्लेख हा तसा गमतीचा भाग असला तरी, घरातील कारभारणीच्या हाती असलेल्या स्मार्ट फोनच्या वापरावर वेळेच्या मर्यादा घालणे कुणाला शक्य आहे?

Web Title: mobile phones cause cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.