हवामान नोंदीला आधुनिकतेची जोड, खात्याच्या कामाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 02:18 AM2019-03-29T02:18:56+5:302019-03-29T02:19:12+5:30

आपल्या संपूर्ण जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी आहे तो सूर्य. हवामान विभागाच्या लोगोमध्येसुद्धा आदित्यात जायते वृष्टि असे आहे. जे उपनिषिदांमध्येसुद्धा संबोधित केलेले आहे. सूर्यापासून पाऊस, पावसापासून जीवसृष्टी.

Modern entries to the weather records, success of the work of the department | हवामान नोंदीला आधुनिकतेची जोड, खात्याच्या कामाचे यश

हवामान नोंदीला आधुनिकतेची जोड, खात्याच्या कामाचे यश

Next

- शुभांगी भुते
(संचालिका, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई)

आपल्या संपूर्ण जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी आहे तो सूर्य. हवामान विभागाच्या लोगोमध्येसुद्धा आदित्यात जायते वृष्टि असे आहे. जे उपनिषिदांमध्येसुद्धा संबोधित केलेले आहे. सूर्यापासून पाऊस, पावसापासून जीवसृष्टी. आपण जे पृथ्वीवर वातावरण अनुभवतो त्याला कारणीभूत आहे तो सूर्य. सूर्यापासून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा ही बदलत्या ऋतूची मूळ कारणे आहेत. सौरऊर्जा फार मोठ्या प्रमाणात वायूला उष्णता देत असते आणि वातावरण तापत असते. ज्यात मोठ्या आणि लहान हवामान प्रणालींचा समावेश होतो. त्याचमुळे हवामानात दिवस-रात्र आणि उन्हाळा-हिवाळा-पावसाळा ही चक्रे स्पष्टपणे दिसतात.
सूर्यप्रकाशात झालेल्या बदलांचे परिणाम प्रकाश, सौरकण प्रवाह, चुंबकीय क्षेत्रातील घटनांमध्ये लहान बदल आपल्याजवळील स्तरामध्येसुद्धा अनुभवायला मिळतात. आपल्या सभोवतालच्या वायूमध्ये वेगवेगळे वायू आणि कण असतात. पृथ्वीचे वातावरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवेचे हे स्तर गुरुत्वाकर्षणाने राखले जातात. नायट्रोजन (७८ टक्के) आणि आॅक्सिजन (२१ टक्के) हे दोन मुख्य घटक आहेत. आॅक्सिजन मनुष्यासह इतर जीवांनाही जगण्याची गरज आहे. वातावरणात बरीच वैशिष्ट्ये आहेत. जसे सूर्यापासून अल्ट्राव्हायोलेट किरणे शोधून ओझोन थर आणि ग्रीनहाउस इफेक्ट म्हणून ओळखली जाणारी उष्णता रोखणे. या नैसर्गिक ग्रीनहाउस प्रभावाशिवाय आपण तापमान १४ अंश सेल्सिअस अनुभवतोय. नाहीतर ते १८ अंश सेल्सिअस अनुभवले असते. म्हणूनच ग्रीनहाउस इफेक्टसोबत आपल्याद्वारे उत्सर्जित वायू जसे कार्बनडायआॅक्साइड, मिथेन आणि नायट्रस आॅक्साइड यांचे केंद्रीकरण मर्यादित ठेवणे आपल्या हातात आहे. आपण जी 0.५ अंश सेल्सिअसची तापमानवाढ अनुभवतोय त्याचे केवळ उन्हाळ्यातच दुष्परिणाम नाहीतर पावसाळ्यात आणि हिवाळ्यातसुद्धा पाहायला मिळतात. पावसाळ्याचा पॅटर्न बदललाय. ज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची वारंवारता वाढली. कमी पावसाचे दिवस घटलेत, आगमनाची तारीख आणि परतीची तारीखसुद्धा बदललीय. हिवाळ्यातील शीतलता वारंवारता - तीव्रतासुद्धा बदलली आहे. जसे त्याचा परिणाम केवळ त्या वर्षापुरता न राहता दुसऱ्या वर्षीसुद्धा पाहायला मिळतो. जसे २0१५, २0१६, २0१७ आणि २0१८ सलग चार वर्षे उष्ण म्हणून नोंदविली गेली आहेत.
या वर्षीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात शीतलहर तापमान न्यूनतम नोंदविले गेले. भारतीय हवामान विभागाने परिस्थितीनुसार पूर्वानुमान उन्हाळ्यात देण्यास गेल्या ३ वर्षांत सुरुवात केलेली आहे. नागपूर, अहमदाबाद अशा शहरांमध्ये हीट अ‍ॅक्शन प्लॅन यशस्वीरीत्या राबविला जात आहे. भारतीय हवामान विभाग मान्सूनसाठीसुद्धा विशेष प्रयत्न करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अचूक पूर्वानुमान देण्याचा सचोटीने प्रयत्न करत आहे. २०१९ च्या हिवाळ्यात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातसुद्धा तीव्र शीतलहर पसरलेली होती आणि त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील विदर्भात हीच शीतलहर दीर्घकाळ राहिली आणि कित्येक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ४ अंश सेल्सिअसच्या पण खाली गेले. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम आपल्या जीवनावर झाला. थंडीच्या लाटेची तीव्रता वाढलेली आहे. दिवसाचेसुद्धा कमाल तापमान कमीच नोंदवले गेले आहे. कोकणातसुद्धा कमाल आणि किमान तापमानात घट झालेली होती. मार्च महिना हा संक्रमणाचा महिना असतो. ज्यामध्ये तापमानातील चढउतार अनुक्रमे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातसुद्धा कमाल तापमान ४0 अंश सेल्सिअसच्या पार नोंदवले गेले. म्हणजेच उष्ण दिवसांचीसुद्धा तीव्रता वाढलेली आहे आणि उन्हाळासुद्धा तीव्र स्वरूपाचा असतो. हेच बदलते हवामान आणि त्याच्यासाठीच हवामान खाते अशा परिस्थितीनुसार हीट अ‍ॅक्शन प्लॅन गेल्या तीन वर्षांपासून राबवत आहे. जेव्हा एप्रिलमध्ये कमाल तापमान सरासरी तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सिअस अधिक असते आणि उष्णलहरीसाठी सूचना दिल्या जातात तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांना याची माहिती दिली जाते.
जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर सातत्याने हवामानात बदल होत असतात. हवामान खाते या बदलाची नोंद सातत्याने ठेवत असते. त्यात अगदी बारीकसारीक तपशिलांचा समावेश असतो. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी वर्गासह समाजातील प्रत्येक घटकाला बदलत्या हवामानाची इत्थंभूत माहिती कशी मिळेल, यासाठी हवामान खाते कार्यरत असते. हवामानाच्या बदलाची नोंद ठेवताना हवामान खात्याला येथील प्रत्येक प्राधिकरणाशी संपर्कात राहावे लागते. त्यांच्या संपर्कात राहून काम अधिक वेगाने होते. हे काम करताना हवामान खाते आणि उर्वरित प्राधिकरणे मोलाची भूमिका वठवत असतात. गेल्या काही वर्षांपासून हवामान खाते अत्याधुनिक झाले आहे.
अत्याधुनिक तंत्राची जोड घेत हवामान खात्याने आपल्या कार्यपद्धतीत बदल केले आहेत. पाऊस असो, थंडी असो वा उन्हाळा असो; अशा प्रत्येक ऋतूमधील बदलत्या हवामानाचा वेध घेत हवामान खात्याने अपडेट ठेवण्याचे काम केले असून, उत्तरोत्तर यात आणखी वेगाने काम होईल. हे हवामान खात्याच्या कामाचे यश म्हटले पाहिजे.

Web Title: Modern entries to the weather records, success of the work of the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान