मुख्यमंत्री महोदय, कोकण महाराष्ट्रात येत नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:11 AM2021-07-06T07:11:02+5:302021-07-06T07:12:58+5:30

मुंबई - गोवा चारपदरी रस्त्याची पहिली कुदळ डिसेंबर २०११ मध्ये मारली गेली. दहा वर्षे उलटली तरीही या रस्त्याचे काम अजून पूर्ण होत नाही, याचा अर्थ काय? 

Mr. Chief Minister, isn't Konkan coming to Maharashtra | मुख्यमंत्री महोदय, कोकण महाराष्ट्रात येत नाही का?

मुख्यमंत्री महोदय, कोकण महाराष्ट्रात येत नाही का?

googlenewsNext

शरद कदम - सामाजिक कार्यकर्ते -

कोकणात रेल्वे आली, सिंधुदुर्गात विमानतळ झाले. आता प्रतीक्षा रत्नागिरी विमानतळाची आणि मुंबई - गोवा चारपदरी रस्ता पूर्णत्वाला जाण्याची!      या रस्त्याची जुलै २०२१ पर्यंतची  स्थिती काय? कुठपर्यंत काम झाले आहे? आणखी किती वर्षे या कामाला लागणार? खड्डे आणि अपघात यातून सुखरूप असा प्रवास कधी सुरू होणार? - यासारखे असंख्य प्रश्न कोकणातील लोकांच्या मनात आहेत. चौपदरी रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी या मुंबई-गोवा महामार्गावर दररोज एक-दोन अपघात होऊन यामध्ये काहींनी जीव गमावला, काही जण गंभीर जखमी होऊन अपंग झाले तर काहींची कुटुंबे  उद्ध्वस्त झाली.   डिसेंबर २०११ मध्ये या चारपदरी रस्त्याच्या कामाची  पहिली कुदळ मारली गेली. पुढे काय झाले?- या प्रश्नाचे उत्तर संतापजनक आहे.  ना कोकणच्या लोकांना विकासाच्या कामात रस, ना इथल्या लोकप्रतिनिधींना! कोकणी माणूस जाता-येता सरकारला दोष देत, काय करायला पाहिजे हे गाडीत बसलेल्या आजूबाजूच्या माणसाला सांगत गावी येईल. मग, गावात आल्यावर गावकी आणि भावकीमध्ये गुंतला की या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल. पण, आता संबंधित यंत्रणेला प्रश्न विचारीत राहिले पाहिजे.     

पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरच्या कामाला सुरुवात होऊन दहापेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. काँग्रेसच्या राजवटीत या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर युतीचे शासन सत्तेवर आले; आणि आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. पण,  इतक्या वर्षांत हा रस्ताही पूर्ण होऊ शकला नाही. जून २०२२ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल, असे शासनाने माननीय उच्च न्यायालयात सांगितले  असताना खरेच हा मार्ग या वेळेत  पूर्ण होईल का, याची शंका येते.   पहिल्या टप्प्याच्या या रस्त्याच्या कामाचा वेग जर दरवर्षी फक्त ९ ते १० किलोमीटर एवढाच असेल तर आणि दहा वर्षांनंतरही पळस्पे ते इंदापूर हे ८४ किलोमीटरचे अंतर पूर्ण होत नसेल तर या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा?   मुंबई ते गोवा या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या  कामाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते धुळे आणि औरंगाबाद हे चारपदरी मार्ग सुरूही झाले. मग, कोकणच्या वाट्याला ही उपेक्षा का?   

इंदापूर ते हातखंबा, पालीपर्यंत काम ज्या गतीने सुरू आहे ते पाहिल्यानंतर कोकणच्या माणसाच्या सहनशीलतेला सलाम करावासा वाटतो. कशेडी घाट उतरल्यानंतर  खवटीपासून भरणा नाका, खेड रेल्वे स्टेशन इथला अपवाद सोडला तर आवाशी फाटापर्यंत रस्ता खरंच सुंदर आणि देखणा झाला आहे. लोटेपासून मात्र परशुराम घाट, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, हातखंबापर्यंत आनंदीआनंद आहे. आरवली ते लांजा या टप्प्यातील काम तर किती तरी दिवस बंदच होते. आता कुठे या कामाला सुरुवात झालेली दिसते आहे. पनवेलपासून सावंतवाडीपर्यंतच्या टप्प्यातले सर्वपक्षीय  आमदार, खासदार कोकणातल्या या रस्त्याच्या प्रश्नावर कधी  एकत्र येणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन केंद्रीय रस्ते मंत्र्यांना कोकणातील जनतेची फिर्याद कधी ऐकवणार? ही राजकीय इच्छाशक्ती कोणताच  राजकीय नेता आणि पक्ष यांच्याकडे नसल्यामुळेच १० वर्षांहून अधिक काळ या रस्त्याचे काम कूर्मगतीने सुरू आहे.    

पळस्पे ते झाराप हा चारपदरी मार्ग सरकारनेच न्यायालयाला  दिलेल्या जून २०२२ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. सागरी महामार्ग, जल वाहतूक, रत्नागिरीचे विमानतळ आणि रामवाडीपासून सावंतवाडीपर्यंतची सर्व एस.टी. स्थानके नव्याने बांधली पाहिजेत. राष्ट्रीय महामार्गाची ही दुरवस्था तर कोकणातले अंतर्गत  रस्ते हा तर चीड आणणारा प्रश्न आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्य आणि केंद्र सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. कोकणची माणसं साधी भोळी... हे गाण्यात जरी ठीक असले तरी त्यांचा फार अंत बघू नका. मुकी बिचारी कुणीही हाका अशी त्यांची अवस्था करू नका, एवढीच विनंती.
 

 

Web Title: Mr. Chief Minister, isn't Konkan coming to Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.