नागपुरी कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:57 AM2018-05-05T00:57:45+5:302018-05-05T00:57:45+5:30
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.मृणालिनी फडणवीस यांची निवड झाल्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा नागपुरी टॅलेन्टची छाप पडली आहे. कुलगुरुपद आणि नागपूरकर हे समीकरण राज्यातील विद्यापीठात गत १५ वर्षांपासून रुजू लागल्याने कुलगुरुपदाची खाण अशी नागपूरची ओेळख निर्माण होऊ लागली आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.मृणालिनी फडणवीस यांची निवड झाल्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा नागपुरी टॅलेन्टची छाप पडली आहे. कुलगुरुपद आणि नागपूरकर हे समीकरण राज्यातील विद्यापीठात गत १५ वर्षांपासून रुजू लागल्याने कुलगुरुपदाची खाण अशी नागपूरची ओेळख निर्माण होऊ लागली आहे. कुलगुरुपदाच्या निवडीत पडद्याआड राजकीय लॉबिंग असते या आरोपात नवेपण नसले तरी युतीपूर्वीही आघाडी सरकारमध्ये लॉबिंगची परंपरा होतीच. मात्र यातही नागपुरी टॅलेन्टला कुलगुरुपदाची संधी मिळणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठात अलीकडच्या काळात झालेल्या कुलगुरुपदाच्या निवडीत चार नागपूरकरांनी बाजी मारली आहे. मूळचे नागपूरकर असलेले डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले. यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नागपूरकर डॉ.मुरलीधर चांदेकर, मुंबईच्या ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.शशिकला वंजारी आणि आता सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी डॉ.मृणालिनी फडणवीस यांच्या नावाला महामहीम राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी पसंती दर्शविली. या चारही कुलगुरुपदाच्या उमेदवारांचा बायोटाडा संघ मुख्यालयातून स्कॅन करून आला असला तरी निवड समित्यांपुढे तो सरस ठरल्याने पुन्हा एकदा नागपुरी टॅलेन्टची मोहर राजभवनात उमटली हे विशेष. आठवडाभरापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे नाव अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीवर होते. गुणवत्तेत सरस ठरलेल्या येवले यांचे राजकीय गणित बिघडल्याने त्यांची संधी हुकली. मात्र मुंबईतही नागपूरकर भारी ठरल्याने येथे काही काळासाठी का होईना नागपुरी टॅलेन्टचा प्रभाव राहिला. आघाडी सरकारमध्येही कुलगुरुपदाच्या निवडीत नागपुरी टॅलेन्ट सरस ठरले होते. त्या काळात नागपूरकर डॉ. मोहन खेडेकर यांनी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरुपदी बाजी मारली होती. २०११ मध्ये नागपूरकर डॉ.विजय पांढरीपांडे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान झाले. पांढरीपांडे यांच्यासोबतच मूळचे नागपूरकर डॉ.विलास सपकाळ नागपूर विद्यापीठाचे, डॉ.राजन वेळूकर मुंबई विद्यापीठाचे, डॉ. राजू मानकर लोणेरे (रायगड) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे तर दिवंगत डॉ.आर कृष्णकुमार यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवित नागपुरी टॅलेन्टची छाप सोडली होती. त्यामुळे भविष्यात राज्यातील इतर विद्यापीठात होणाऱ्या कुलगुरुपदाच्या नियुक्त्यातही नागपुरी टॅलेन्ट भारी ठरले तर तो निश्चितच गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण ठरेल.