- वसंत भोसलेराष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आता दोन दशके होत आली, त्यापैकी दीड दशक हा पक्ष महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेत सामील होता. ज्या पार्श्वभूमीवर या पक्षाची स्थापना करण्यात आली, तो उद्देश संपला आहे, अशी एक धारणा असतानाही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागात हा पक्ष प्रभाव राखून होता. अलीकडे सत्ता गेल्यानंतर या पक्षाची प्रतिमाही संपत चालली आणि अंतर्गत गटबाजीने पक्ष पुरा पोखरून गेला आहे. अशा पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड झाली आहे. त्यांना प्रतिमा सुधारण्याचे आणि पक्षातील गटबाजी संपविण्याच्या या दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्राचे राजकारण स्थिर आणि उत्तम प्रशासन देणारे अशी ख्याती होती. कॉँग्रेस या एकाच पक्षाचा प्रचंड दबदबा होता. मात्र, आता हा इतिहास झाला आहे. १९८५ नंतर महाराष्ट्रात एकाही पक्षाला स्वत:च्या ताकदीवर विधानसभेत बहुमत मिळविता आलेले नाही. १९९० मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि यशवंतराव चव्हाण तसेच वसंतदादा पाटील यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीच्या वातावरणात कॉँग्रेसने जेमतेम बहुमतापर्यंत मजल मारली होती. अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला. याच काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. प्रथमच कॉँग्रेसला समर्थ विरोध करणारी ही राजकीय आघाडी होती. या युतीने (सेना ५२ आणि भाजप ४२) ९४ जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून तीन प्रमुख राजकीय पक्षांनी महाराष्ट्राचे राजकारण व्यापले होते. या युतीला १९९५मध्ये यश मिळाले. कॉँग्रेसचा प्रथमच पराभव झाला. शिवशाहीच्या नावाने विरोधकांचे सरकार आले. मात्र, त्यांना यशस्वी राज्यकारभार करता आला नाही. १९९९ मध्ये कॉँग्रेसच्या अखिल भारतीय पातळीवर नेतृत्वात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. श्रीमती सोनिया गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास शरद पवार, पी. ए. संगमा आदींनी नकार देऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्याचा सर्वांत मोठा परिणाम महाराष्ट्रावर झाला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेस पक्षात फूट पडूनही शिवसेना-भाजप युतीला बहुमत गाठता आले नाही. याउलट कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस हे एकमेकांविरुद्ध लढत १३३ जागा जिंकल्या होत्या. (कॉँग्रेस ७५ आणि राष्ट्रवादी ५८).कॉँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, महत्त्वाची पदे राष्ट्रवादी कॉँग्रेसने पटकाविली. त्यात शरद पवार यांच्या डावपेचांचा भाग अधिक होता. हे आघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी बारा दिवसांच्या चर्चेचे गुऱ्हाळ चालू होते. शरद पवार यांच्या डावपेचांमुळे जी महत्त्वाची पदे राष्ट्रवादीने मिळविली त्या जोरावर या पक्षाने महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळविले.
तरुणांचा आशावाद, महिलांचा आधार, शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव, शहरी मध्यमवर्गीयांना दिलासा अशा विविध पातळींवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील मात्र मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणाºयांनी एक दबदबा निर्माण केला. शरद पवार यांची ही टीम नव्या दमाची होती. त्यांचे अनुभवी नेतृत्व आणि मार्गदर्शन त्यांना होत होते. छगन भुजबळ, अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, अनिल देशमुख, राजेश टोपे, बबनराव पाचपुते, आदींनी सरकारचा चांगला कारभार पाहात राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठी उभारी दिली. यांच्याकडे अत्यंत महत्त्वाची खाती होती. त्या आधारे गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत संस्थात्मक रचनेतही त्यांचा प्रभाव वाढत गेला. शिवाय सहकारी साखर कारखानदारीची लॉबी त्यांच्याबरोबर होती. अशी राष्ट्रवादी कॉँग्रेसची वाटचाल दमदार होती. परिणामी, २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसशी आघाडी करून निवडणुका लढविण्यात आल्या. त्याचाही लाभ राष्ट्रवादीनेच लाटला. कमी जागा लढवूनही ७१ जागा जिंकत कॉँग्रेसला (६९ जागा जिंकल्या) मागे टाकले. ज्या पक्षाच्या अधिक जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे तत्त्व बाजूला ठेवून परत दमदार पदे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण त्या दमदार पदांच्या वाटणीनेच राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात पाया निर्माण केला होता.
दुसऱ्या आणि तिसऱ्या आघाडीच्या सरकारनंतर मात्र, ही दुसºया फळीतील टीम स्वत:च नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरू लागली. एकमेकांना काटशह देण्यात गुंतली. एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यापर्यंत मजल गेली. त्यातून पक्षाच्या प्रतिमेला तडा जाऊ लागला. आपण आजन्म सत्ताधारी आहोत. या तोºयात वावरणाºया नेत्यांनी पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचेच राजकारण करण्यात धन्यता मानली. याला मोठे साहेबही (शरद पवार) आवर घालू शकले नाहीत. इतकी या नेत्यांची गटबाजी वाढत चालली होती. कोकणात ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत शिवसेनेला समर्थपणे आव्हान देण्याची ताकद राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येच होती. रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये या पक्षाचा दबदबा होता. मात्र, प्रत्येक ठिकाणी नेत्यांच्या गटबाजीने हा पक्ष पोखरला. सिंधुदुर्गात दीपक केसरकर हा चेहरा होता. त्यांना नारायण राणे यांच्यासाठी बळी दिले. रत्नागिरीत उदय सामंत विरुद्ध भास्कर जाधव विरुद्ध सुनील तटकरे याने हा दुसºया स्थानावरील पक्ष बाजूला फेकला गेला. ठाण्यातही तीच अवस्था झाली.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र, या किल्ल्याला गटबाजीची वाळवी लागली आहे. सातारा जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत अवस्था केविलवाणी झाली आहे. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांचा मतदारसंघ हक्काचा म्हणता येईल. उर्वरित सातही जागांची खात्री कोणालाच नाही. कोल्हापूर आणि साताºयाचे खासदार राष्ट्रवादीत आहेत की, भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर करणे, ही एक औपचारिक बाब राहिली आहे, हे स्पष्ट होत नाही. मराठवाड्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिमा वगळली तर उर्वरित काही शिल्लक राहिले असेल तर दोन-चार आमदारच निवडून आणण्याची ताकद राहिली आहे. खानदेशातील पाच जिल्ह्यांतही राष्ट्रवादी कॉँग्रेस एकेकाळी प्रभावशाली ताकद होती. छगन भुजबळ यांचे नेतृत्व भ्रष्टाचाराच्या आरोपाने संपले. नगरमध्ये कॉँग्रेसशी लढत-लढत अजितदादांनी राष्ट्रवादी संपविली. जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये अनेकांनी भाजपला जवळ केले. त्यांना रोखण्यात यश आले नाही.विदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद पहिल्यापासूनच मर्यादित होती. आर. आर. पाटील वगळता एकाही नेत्याने विदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसला बळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. अमरावती किंवा बुलढाण्यातही गटबाजी होती. पूर्व विदर्भात प्रफुल्ल पटेल आणि आत्राम सरकार वगळता कोणीही या पक्षाला बळ दिले नाही.
अशा पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाच्या रूपाने महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आली आहे. यापूर्वी छगन भुजबळ, बबनराव पाचपुते, मधुकरराव पिचड, आर. आर. पाटील, सुनील तटकरे, भास्करराव जाधव, आदींनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. यापैकी भुजबळ आणि आर. आर. पाटील यांनीच राजकीय भूमिका घेत सत्ताधारी पक्षाची तसेच विरोधकांचा स्पर्धक पक्ष म्हणून खंबीरपणे काम केले. पक्षाला जनाधार मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
पुन्हा ते दिवस आणण्यासाठी जयंत पाटील यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सत्तेची महत्त्वाची पदे (हत्यारे) आता राहिली नाहीत. शिवाय काही नेत्यांवरील आरोपांमुळे पक्षाची एक आशादायक वाटणारी प्रतिमा आता राहिलेली नाही. १९९९ मध्ये सत्तेवर आल्यानंतर सुमारे डझनभर नेते दमदारपणे राज्यकर्ते वाटत होते. ते सर्व युवक होते. आता ते साठीकडे वळले आहेत. त्यांची जागा घेऊ शकतील, असे नवे नेतृत्व तयार करण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. वास्तविक प्रथम सत्तेवर येताना अनेक वरिष्ठांना बाजूला ठेवून या तरुणांकडे सत्ता देण्याचा धाडसी निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. या तरुण मंडळींनी एका मर्यादेपर्यंत सरकार चालवून पक्षाला बळ दिले, पण त्यांच्या तालेवार वागण्याने आणि गैरव्यवहार केल्याच्या आरोपाने पक्षाची या तरुण नेतृत्वाची प्रतिमा धुळीला मिळाली.
आशादायक सुरुवात केलेल्या या पक्षाला नव्याने उभारणी देण्यासाठी जयंत पाटील यांच्यापुढे अडचणीचे डोंगर आहेत. करपलेल्या प्रतिमेतून बाहेर येऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी राजकीय भूमिका मांडावी लागणार आहे. हे काम केवळ आर. आर. पाटील यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात केले होते. आता दोन पावले मागे जावून आणि करपलेले चेहरे बाजूला करून पक्ष बांधावा लागेल. त्यासाठी गटबाजीवर कधीही निर्णय न घेणाºया नेतृत्वालाही सकारात्मक पावले टाकावी लागतील.