मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरुद्ध लढायला सज्ज व्हा, हा शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी सेनेला दिलेला आदेश महत्त्वाचा असला तरी त्या सेनेत कितीसे बळ उरले आहे याचा अदमास त्यांनी घेतलेला दिसत नाही. निवडणुका जवळ आल्याची व लोकसभेसोबत विधानसभेच्याही निवडणुका होणार असल्याची शक्यता पवारांना दिसते. त्यासाठी पक्ष उभा करणे त्यांना गरजेचे वाटते. गेल्या काही वर्षातील पावसाने त्यांच्या पक्षात फार मोठी पडझड केली आहे. भुजबळ हे त्याचे एकेकाळचे उपमुख्यमंत्री सध्या तुरुंगात राहतात. त्यांच्या सुटकेच्या शक्यताही संपल्यागत आहेत.
अजित पवार आणि तटकरे यांच्या डोक्यांवर ईडीच्या तलवारी लटकलेल्या आहेत. सुप्रिया सुळ्यांना त्यांचा प्रभाव वाढवणे जमत नाही आणि प्रफुल्ल पटेलांची निष्ठा तूर्तास वादातीत दिसत असली तरी त्यांचा मोदींकडे असलेला ओढाही लपून राहिलेला नाही. पक्षाचे कार्यकर्ते व मतदार यांच्यात खुद्द पवारांविषयीच संशय आहे. ते काँग्रेसच्या आघाडीसोबत असतील की भाजपच्या आघाडीसोबत जातील याची स्पष्टता त्यांच्या चाहत्यांच्याही मनात नाही. मनात संशय, नेतृत्वाविषयी अविश्वास आणि धोरणशून्यता ही स्थिती पक्षाला बळ कशी देणार आणि त्याला लढायला सज्ज तरी कसे करणार? उद्याची लढत काँग्रेसशी की भाजपशी हेच जर ठाऊक नसेल तर सामान्य कार्यकर्त्याने अखेरची आज्ञा येतपर्यंत वाट पहायची असते काय? पवारांनी फिरून काँग्रेससोबत जावे व त्या पक्षात राहून राज्य व पक्ष यांच्या नेतृत्वात सहभागी व्हावे असे त्यांचेच अनेक जुने व ज्येष्ठ सहकारी आता खासगीत बोलतात.
पवारांची आजवरची प्रवृत्ती पाहिली तर ते भाजप वा संघ यांच्यासोबत मनाने व विचाराने कधी जाणार नाहीत असे वाटते. पण राजकारणात विचार नसेल आणि ते नुसतेच लाभाचे क्षेत्र झाले असेल तर या गोष्टींना फारसे महत्त्व उरत नाही. पवारांना स्वत:चे मोल कळते. आताच्या भाजपला त्यांची गरज नाही हे त्यांना समजते. त्या पक्षासोबत जाऊन कुठली तरी ‘तीन हजारी मनसबदारी’ घेण्यापेक्षा अडचणीत असलेल्या व उभारी धरत असलेल्या काँग्रेससोबत राहणे अधिक श्रेयस्कर आहे हे त्यांना दुसºया कोणी सांगण्याचे कारण नाही. तसे ते एकेकाळी राजीव गांधींसोबत गेलेही आहेत. आताची निवड समोर आहे आणि त्यांच्यापुढची वेळेची निकडही मोठी आहे. निवडणुकांना दीड वर्ष राहिले आहे. त्यात नवी उभारणी करायची, पक्ष सावरायचा, नवी माणसे व संघटना जोडायच्या तर त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, त्यांचा पक्ष स्वबळावर देशात सोडा, महाराष्ट्रातही कधी सत्तेवर येणार नाही. त्यासाठी त्याला देशातील दोन आघाड्यांपैकी एकीत जावेच लागेल. काँग्रेसचे राजकारण त्यांच्या परिचयाचे आहे. त्यांनी ते केलेही आहे. भाजप ही आतून बंद असलेली संघटना आहे हे राण्यांच्या अनुभवाने साºयांना दिसले आहे. पक्ष नेत्याच्या बळावर उभे राहतात मात्र तो नेता सत्तेची पदे मिळवून देणार अशी आशा असेल तरच ते टिकतात. पवारांनाही आपल्या पक्षानुयायांची परीक्षा फार काळ घेता येणार नाही.
प्रत्येक गावात काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेगळे ओळखता न येण्याएवढे ते एकमेकांच्या जवळचे आहेत. काँग्रेसजवळ प्रबळ नेता नाही हेही त्यांच्या सामर्थ्याचे एक कारण आहे. मात्र ही स्थिती फार काळ टिकणारी नसते. मोदी काही काळातच देशाचे नेते झाले. या स्थितीत पवारांची पावले जलद गतीने पडली पाहिजेत. प्रादेशिक पक्ष प्रासंगिक असतात ही इतिहासाची शिकवण आहे. म्हणून म्हणायचे, ज्यांचा जीव लहान त्यांनी आपली दिशा आताच ठरवली पाहिजे. त्यातून राष्ट्रवादीचा जीवही लहान म्हणावा असाच आहे.