बुद्धाच्या समतावादी विचारांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 01:53 AM2019-10-08T01:53:57+5:302019-10-08T01:54:23+5:30
‘धर्मांतराने काहीही साध्य होणार नाही.’
- बी.व्ही. जोंधळे
(दलित चळवळीचे अभ्यासक)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी भारतातच जन्मलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार आपल्या लक्षावधी अनुयायांसह विजयादशमीच्या दिवशी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपूर मुक्कामी केला, त्या ऐतिहासिक घटनेस आता ६३ वर्षे पूर्ण झाली. हिंदू धर्मग्रंथाचा आधार असलेली जातीव्यवस्था आणि माणुसकीचे हक्क मारून माणसाला गुलाम करणारी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी समता आंदोलने उभारली; पण हिंदू धर्ममार्तंडांनी बाबासाहेबांच्या समतेच्या हाकेस सकारात्मक प्रतिसाद न देता त्यांचे दगड-धोंड्यांनी स्वागत केले. हिंदू धर्मात राहून माणुसकीचे हक्क मिळविणे शक्य नाही हे अनुभवांती कळले, तेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला.
बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या निर्णयावर टीका करताना त्या वेळी हिंदुत्ववाद्यांनी म्हटले होते, ‘धर्मांतराने काहीही साध्य होणार नाही.’ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले होते, ‘बाबासाहेबांची उडी अखेर हिंदू धर्माच्या रिंगणातच पडली. बाबासाहेबांचे चिरंजीव परत हिंदू धर्मातच येतील.’ पण असे काही घडले नाही. घडणे शक्यही नव्हते. हिंदुत्ववाद्यांनी असेही म्हटले होते की, ‘धर्मांतर करू इच्छिणाऱ्यांचे पूर्वज आजवर हिंदू धर्मात होते, ते काही वेडे नव्हते. मग अस्पृश्य लोक धर्मांतर का करीत आहेत, असा सवाल करून हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा बाबासाहेबांना सल्ला दिला होता की, त्यांनी धर्मांतर न करता हिंदू धर्मातच राहून जातीअंताचा लढा लढावा.’
बाबासाहेबांनी या टीकेला उत्तर देताना म्हटले होते, ‘हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही, तर आमचे स्वातंत्र्य मिळविणे, हे आमचे ध्येय आहे. धर्मांतर करून जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळत असेल, तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या खांद्यावर घ्यावा? अशा लढ्यात आमच्या सामर्थ्याची, द्रव्याची काय म्हणून आहुती द्यावी? हिंदू समाजाची सुधारणा करणे हा अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य उद्देश नाही, तर अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य उद्देश अस्पृश्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा आहे आणि ते स्वातंत्र्य धर्मांतराशिवाय प्राप्त होणार नाही.’ त्यांनी असेही म्हटले होते की, ‘शंकराचार्यांच्या गादीवर एखादा संस्कृत भाषेत तज्ज्ञ असलेला दलित बसविण्याची हिंदू धर्मीयांची तयारी असेल, तर धर्मांतराचा विचार सोडून द्यायला मी तयार आहे.’ पण असे घडणे शक्य नव्हते.
परिणामी, बाबांना धर्मांतर करावे लागले. तेव्हा प्रश्न असा की, बाबासाहेबांनी ज्या माणुसकीपूर्ण समतेच्या उद्दिष्टासाठी धर्मांतर केले ते धर्मांतर हिंदू समाजाने धर्मांतराच्या ६३ वर्षांनंतर तरी समजून घेतले आहे का? कट्टरतावादी हिंदूंच्या सामाजिक वर्तणुकीत काही बदल होऊन त्यांचे मन अपराधी भावनेने पश्चात्तापदग्ध झाले आहे काय? उत्तर आहे, नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच अमेरिकेच्या दौºयात असे म्हणाले की, भारताने जगाला समता-शांतीचा बुद्ध दिला. खरे आहे. पंतप्रधानांच्या प्रामाणिकपणाविषयी शंका घेण्याचे काहीच कारण नाही; पण प्रश्न असा आहे की, बुद्धाच्या शिकवणुकीनुसार खरेच का देशातील दीनदलितांना माणुसकीची वागणूक मिळते? जर मिळत असेल, तर मग गेल्या पाच-सहा वर्षांत गोरक्षणाच्या नावाखाली दलितांवर जे अत्याचार झाले, त्याची संगती कशी लावायची? सनातनी बहुसंख्याक हिंदू समाजाच्या दृष्टीने जातीयता-अस्पृश्यता पाळणे हा त्यांच्या धर्मश्रद्धेचाच भाग आहे. ही बाब सामाजिक समतेच्या दृष्टीने चिंत्यच नव्हे काय? दलितांची आजची अवस्था काय आहे? खेडोपाडी आजही अस्पृश्यता पाळली जाते. दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरता येत नाही. त्यांना मंदिर प्रवेश नाकारला जातो.
दलित तरुणाने दलितेतर मुलीशी प्रेमविवाह केला, तर त्याला संपविण्यात येते. दलित सरपंचाला खुर्चीवर बसता येत नाही. स्त्रियांवर अत्याचार होतात. मनुस्मृतीचे गोडवे गायले जातात. बुद्धाच्या मानवतावादी शिकवणुकीशी आपले हे सामाजिक वर्तन विसंगतच ठरत नाही काय?
म. गौतम बुद्धाच्या अहिंसेशी नाते सांगणाºया म. गांधींची १५० वी जयंती अलीकडेच जगभर साजरी झाली. म. गांधींना जाऊन आता ७० वर्षे झाली; पण तरीही त्यांचा विचार मरत नाही म्हणून म. गांधींच्या कापडी पुतळ्याला गोळ्या घालण्यात येतात. नथुराम गोडसेचे देव्हारे माजविण्यात येतात. गांधींनी आयुष्यभर हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार केला. अस्पृश्यता हा जर हिंदू धर्माचा भाग असेल, तर असा हिंदू धर्म आपणाला मान्य नाही, असे निक्षून सांगितले. बुद्धाने जातीव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार केला. बुद्धाचा विचार गांधींनी स्वीकारला; पण बुद्ध-गांधींच्या मानवतावादी शिकवणुकीचाच आपणाला विसर पडला. अहिंसेचा जीवनमूल्य म्हणून स्वीकार करायला तयार नाही.
बुद्ध-गांधींच्या प्रेमाची पेरणी करण्याची आपली मानसिकता नाही. सर्वत्र एक द्वेष पसरला आहे. हिंसाचार हाच आपला धर्माचार ठरत आहे. मनगटशाहीला बरकत आली आहे. विषमतेने समाज दुभंगला आहे. नैतिकता नीतिमत्ता पणाला लागली आहे. आपले समाजजीवन निसरड्या, धोकादायक मार्गावरून वाटचाल करीत आहे. अशा वेळी म्हणूनच बुद्ध-गांधी-आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांचे स्मरण सदोदित करीत राहणे हेच अंतिमत: समाजहिताचे ठरेल, असे वाटते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हाच खरा संदेश आहे.