दुष्काळावर दीर्घकालीन उपायांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:01 AM2018-10-17T06:01:41+5:302018-10-17T06:02:47+5:30
- सयाजी शिंदे सध्या महाराष्ट्रात पाऊस कमी पडला, म्हणून दुष्काळ असल्याचे सांगितले जात आहे, परंतु पाऊस कमी पडणे हा ...
- सयाजी शिंदे
सध्या महाराष्ट्रात पाऊस कमी पडला, म्हणून दुष्काळ असल्याचे सांगितले जात आहे, परंतु पाऊस कमी पडणे हा जर दुष्काळ असेल, तर इस्रायलमध्ये महाराष्ट्राच्या पावसाच्या निम्म्यासुद्धा पाऊस पडत नाही, पण तिथे कधीच दुष्काळ पडलेला नसतो. मग पाऊस कमी पडणे म्हणजे दुष्काळ ही आपली विचार करण्याची पद्धत कधीतरी बदलण्याची गरज आहे. आपण ज्याला दुष्काळ म्हणतो, तो शास्त्रीय भाषेत बोलायचे झाल्यास दुष्काळ नसतो, तर ती असते अनावृष्टी.
अनावृष्टी म्हणजे कमी पाऊस पडणे. कमी पाऊस म्हणजे दुष्काळ असे काही नाही. निसर्गात कमी पाऊस पडतो आणि त्यामुळे आपल्या मनात दुष्काळ निर्माण होतो, परंतु पाऊस कमी पडला, तरीसुद्धा शेती व्यवसायाचे व्यवस्थापन कौशल्याने केले, तर या अनावृष्टीतही मनामध्ये सुकाळ निर्माण करता येतो. तेव्हा दुष्काळ-सुकाळ या मनाच्या भावना आहेत. मनाचा हिय्या करून दुष्काळावर मात करायचा प्रयत्न केला, तर दुष्काळ आपल्या जीवनातून हद्दपार होऊ शकतो, पण तसे करण्याऐवजी दुष्काळावर नेहमीच वरवरची मलमपट्टी केली जाते. शासकीय पातळीवर किंवा राजकीय पातळीवर कोठे तरी दुष्काळाचे कायमचे उच्चाटन करण्याचा विचार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या मलमपट्टीवरचा खर्च सुरूच राहणार आहे. सर्वप्रथम दुष्काळात कोणासमोर हात पसरण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दिवडी गावातील निसर्गाशी, झाडांशी नाते जोडत आम्ही सह्याद्री देवराई या संस्थेद्वारे वृक्षारोपण, संवर्धनाचा प्रकल्प प्रत्यक्षात आणला. देवराई ही संकल्पना फार प्राचीन असून, गावागावांतून अतिशय महत्त्वाचे जीवनदायी वृक्ष देवळाच्या परिसरात आवर्जून लावले जायचे आणि त्यांची निगा व संरक्षण गावकरी करायचे, तसेच एखादा वृक्ष स्वत:साठी अथवा गावासाठी तोडायचा झाल्यास अगोदर देवाला कौल लावायचे व कौल मिळाला, तरच तोडत. आता मात्र देवराया गेल्या. मानवाने आपल्या हव्यासापोटी सर्व देवराया तोडल्या. कुणीही त्याचे पुनर्वसन केले नाही. आज महाराष्ट्रात काहीच गावांत देवराया अस्तित्वात आहेत. हाच धागा पकडून निसर्ग जागर प्रतिष्ठानने देवराया निर्माण करण्यासाठी सह्याद्री देवराई प्रकल्प हाती घेत राज्यभर त्याचा प्रचार व प्रसार केला जो अतिशय यशस्वी ठरला.
पाणीटंचाई, दुष्काळ या समस्या जशा भौगोलिक आहेत, तशाच मानवनिर्मितही आहेत आणि या समस्यांवर दीर्घकालीन उपायही आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. दुष्काळी भागाच्या विकासासाठी नेमके काय करायचे, याचा विचार करीत असताना अभ्यासाअंती काही गोष्टी लक्षात आल्या. सातारा जिह्यातील माण तालुक्यातील कोळेवाडी, पांढरवाडी, गोडसेवाडी, दिवडी या गावांमध्ये ४५ हजार देशी झाडे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून लावण्यात आली. निसर्गाशी आपणच चुकीचे वागू लागलो की, त्याची भरपाई आपल्याला करावी लागतेच. दुष्काळ, पाणीटंचाई, हवामानातला कमालीचा बदल हे या ओघाने येतेच. या चुका सुधारण्यासाठी वृक्षारोपणाला प्राधान्य देण्याची फार गरज आहे. टँकरमुक्त महाराष्ट्र हे तर अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेले स्वप्न. हे स्वप्न केवळ स्वप्नच राहू नये, यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था सध्या हातभार लावत आहेत. जलसंधारणाची अनेक कामे आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात होताना दिसतात. साताऱ्यातील वावरहिरे आणि परिसरातील गावे टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आणि या गावांतील पाण्याचा साठा वाढविण्यात आम्हाला यश आले आहे. राज्यातील अनेक गावांत गावकरी एकत्र येत आहेत. श्रमदान करत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशमधील गावकरी, शेतकºयांनी वृक्षलागवड, श्रमदान, पाणीबचतीचे महत्त्व ओळखले, तर अनेक समस्या नक्कीच सुटतील.
पाऊस कमी-जास्त पडत राहणारच, पण म्हणून आपण सतत दुष्काळ दुष्काळ म्हणून ओरडत राहणार का, हा प्रश्न आहे. मलमपट्टी सुरू असतानाच खोल जखमांवर कायमचा इलाज करण्याचे उपायही सुरू राहिले पाहिजेत, दरसाल पडणारा पाऊस जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढवत असतो, परंतु पातळी वाढविण्याच्या वेगापेक्षा जमिनीतले पाणी उपसण्याचा वेग मोठा आहे. त्यामुळे दरसाल एक फूट पाणी वाढते आणि आपण दोन फूट पाणी उपसतो. आपण दरवर्षी जेवढे पाणी उपसतो, त्यापेक्षा अधिक पाणी पावसाळ्यात जमिनीत मुरविले, तरच जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढणार आहे. प्रत्येक जण ट्युबवेल खोदून आणि त्यावर मोटारी बसवून पाणी खेचत आहे, पण तेवढेच पाणी जिरविण्याची दक्षता मात्र घेत नाही.
दुष्काळावर मात करायची तर गरज आहेच, पण लोकसहभागातून ही लोकचळवळ यशस्वी करण्याची, पर्यावरण व जैवविविधता संवर्धनाचा हा प्रयोग म्हणजे हिरवाईची चळवळ आहे. ही हिरवाई निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे व ते जगवावे अशी अपेक्षा आहे.