- किरण अग्रवाल
कोरोनाच्या संकटाने सार्वजनिक जीवन अस्ताव्यस्त करून प्रत्येकाच्या मनात भीती पेरून ठेवली आहेच, शिवाय या आजाराने व्यवहार व वर्तनासोबतच जगण्याची परिमाणेसुद्धा बदलून ठेवली आहेत. याकाळात लॉकडाऊनला सामोरे जावे लागल्याने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसून गेला असतानाच दीर्घकाळ घरात बसून राहावे लागल्याने काही कुटुंबांत प्रापंचिक कलह उद्भवल्याचीही उदाहरणे समोर येत आहेत. कोरोनाचा इवलासा विषाणू किती पातळीवर त्रासदायी ठरला आहे, हेच यातून अधोरेखित व्हावे.
जगणे सोपे वा सुसह्य करण्यासाठी सकारात्मकतेचा म्हणजेच पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला दिला जात असतो; पण कोरोना चाचणीच्या संदर्भाने पॉझिटिव्ह अहवाल आला की भीतीची छाया गडद होऊन जाणे स्वाभाविक ठरते. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या होत असलेल्या चर्चा पाहता सकारात्मकता कशी बाणवावी हा प्रश्नच ठरावा. अर्थात असे असले तरी या संकट काळातही काही गोष्टींकडे पॉझिटिव्हपणे पाहता यावे असे नक्कीच आहे. लाॅकडाऊनमुळे व्यापार-उदिमाच्या दृष्टीने मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले, विशेषतः हातावर पोट असणाऱ्यांचे तर खूपच हाल झाले. पोटाला चिमटा घेऊन राहण्याची वेळ अनेकांवर आली. बहुतेकांचे अर्थकारण कोलमडले हे खरेच, परंतु एरवी कामाच्या व्यापात व धकाधकीच्या रहाटगाडग्यात कुटुंबाकडे लक्ष देऊ न शकणाऱ्यांना सक्तीने घरात बसावे लागल्याने कुटुंबीयांसोबत वेळ घालवता आला, याकडे सकारात्मकतेनेच पाहता यावे. अर्थात याची दुसरी बाजूही आता समोर येते आहे, जी निगेटिव्ह म्हणता येईल.
संसार आला तिथे भांड्याला भांडे लागणे आलेच, परंतु लॉकडाऊनच्या काळातील वाद विकोपाला गेल्याची व त्यातून काडीमोडपर्यंत प्रकरणे पोहोचल्याची उदाहरणे पाहता कोरोनाचा कौटुंबिक सौख्याच्या पातळीवरील फटका समोर येऊन गेला आहे. लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागलेल्या व हाताचे काम सुटलेल्या कमावत्या व्यक्तीची घरातील चिडचिड वाढल्यामुळे वैवाहिक जीवनात कलहाला प्रारंभ होऊन गेल्याच्या तक्रारी आहेत. घरात अधिक वेळ घालवावा लागलेल्या पुरुषांकडून खाण्या-पिण्याबाबत नित्य नव्या फर्माईशी वाढल्यानेही या कलहात भर पडल्याची उदाहरणे आहेत. बाहेर पडण्यावर बंधने आल्यामुळे मोबाईलवरील संभाषण वाढले, त्यामुळे कुटुंबाकडे लक्ष द्यायचे सोडून पत्नी मोबाईलवरच जास्त बोलत बसते म्हणून कुटुंबात वाद झाल्याच्याही तक्रारी जागोजागच्या पोलीस खात्याअंतर्गतच्या भरोसा सेलकडे आल्याच्या नोंदी आहेत. विशेष म्हणजे कडक निर्बंधाच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते, यात दारूची दुकानेही बंद असताना दारू पिऊन वाद घातला गेल्याच्या किंवा मारहाणीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्याचे आढळून येते. अशी उदाहरणे अनेक व त्यामागील कारणे विविध असली तरी कोरोनाने अर्थकारणाव्यतिरिक्त अपवादात्मक संख्येत का असेना, परंतु कौटुंबिक स्वास्थ्यालाही कशी हानी पोहोचवली आहे तेच स्पष्ट व्हावे. तेव्हा कोरोनाचे संकट मोठे असले व त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत असले तरी कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याच्यादृष्टीने विचार व वर्तनाने पॉझिटिव्ह होऊया इतकेच यानिमित्ताने.