नवरात्रातील आरतीमध्ये नऊ दिवसांचे माहात्म्य, माळ सहावी
By दा. कृ. सोमण | Published: September 26, 2017 04:30 AM2017-09-26T04:30:16+5:302017-09-26T04:30:33+5:30
आज मंगळवार, दि. २६ सप्टेंबर, आश्विन शुक्ल षष्ठी! आज देवीची पूजा करून देवीसमोर सहावी माळ बांधावयाची आहे.
आज मंगळवार, दि. २६ सप्टेंबर, आश्विन शुक्ल षष्ठी! आज देवीची पूजा करून देवीसमोर सहावी माळ बांधावयाची आहे.
इसवी सन १२व्या शतकापासून १८व्या शतकापर्यंत रचल्या गेलेल्या आणि उपलब्ध असलेल्या आरत्यांची संख्या सुमारे सात-आठशे आहे. संत ज्ञानेश्वरांनी थोड्याच आरत्या रचलेल्या आहेत. त्यांची ‘फळले भाग्य माझे’ ही आरती खूप चांगली आहे. त्या आरतीमध्ये सद्गुरूंना-उपदेशाची महती सांगून पंढरीरायाच्या रावळात आलेला दिव्य अनुभव त्यांनी मार्मिकपणे सांगितलेला आहे. संत नामदेवांनी बºयाच आरत्या लिहिलेल्या आहेत. त्या आरत्या विठ्ठलाच्या आहेत. तसेच नित्यारती, काकडारती, शेजारतीही त्यांनी रचल्या आहेत. त्या काळी गंगाधरस्वामी, दासोपंत, पाठकमंडळी, नरहरी, विष्णुदासनामा, त्र्यंबक, कृष्णदास इत्यादी कवींनी आरत्या रचलेल्या आहेत. पुढे सोळाव्या शतकात संत एकनाथ, रामाजनार्दन, जनी जनार्दन, विठा रेणुकानंद, कृष्णदास, अनंतसुत इत्यादी कवींनी आरत्यांची रचना केलेली आहे. इसवी सनाच्या १७व्या शतकात संत तुकाराम, संत रामदास, वामन रघुनाथ यांनी आरत्यांची रचना केलेली आहे. त्यानंतर श्रीधर, मोरोपंत, कृष्णदयार्णव, जगजीवन, परशुराम, तुका विप्र, मोरेश्वरसुत, नरहरी, निरंजन, विप्रनारायण महिपती, ठाकूरदास यांनी आरत्यांची रचना केलेली आहे.
नवरात्रात दुर्गादेवीची पूजा झाल्यावर देवीची ‘आश्विन शुद्धपक्षी अंबा’ ही आरती म्हटली जाते. या आरतीमध्ये नवरात्रातील नऊ दिवसांचे वर्णन केलेले असून, दहाव्या दिवशी देवी सीमोल्लंघन करते असे म्हटले आहे. आज आपण या आरतीचा अर्थ जाणून घेणार आहोत. आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अंबामाता सिंहासनावर बसली असून, या दिवशी मंत्र, जप, जाप्य करून घटस्थापना केली जाते असे म्हटले आहे. ब्रह्मा, विष्णू, रुद्र हे तिघेही अंबामातेची पूजा करतात. अशा या अंबामातेचा उदोउदो करावा असे पहिल्या चरणात कवीने सांगितले आहे. दुसºया चरणात द्वितीयेला चौसष्ट योगिनींचे स्मरण करताना परशुरामाची माता रेणुका भांगामध्ये शेंदूर भरल्याने अतिशय सुंदर दिसते असे म्हटले आहे. तसेच चामुंडामातेचा उदो उदो केलेला आहे. तिसºया चरणात अंबामातेच्या साजशृंगाराचे वर्णन केलेले आहे. चौथ्या दिवशी विश्वास व्यापून टाकणारी अंबामाता प्रसन्न अंत:करणाने भक्ताकडे पाहत असल्याचे म्हटले आहे. तिला कवीने भक्तांची माउली असल्याचे म्हटले आहे. पंचमीला उपांगललिता व्रत केले जाते. याचा उल्लेख करून रात्री हरिकथा ऐकल्याने मन प्रसन्न होते असे म्हटले आहे. सहाव्या दिवशी गोंधळाचे वर्णन केलेले आहे. सातव्या चरणात सप्तशृंगगडाचे वर्णन केलेले आहे. आठव्या चरणात देवी सह्याद्री पर्वतावर उभी असून, भक्ताला सुखी कसे करते त्याचे वर्णन केलेले आहे. नवव्या दिवशी नऊ दिवसांचे पारणे फेडून सप्तशती, जप, होम-हवन करून षड्रस अन्नाचा नैवेद्य अर्पण केला जातो त्याचे वर्णन आहे. अशा रीतीने नऊ दिवसांचे महत्त्व सांगून दहाव्या म्हणजेच दसºयाच्या दिवशी अंबामाता सीमोल्लंघन करते आणि शुंभ-निशुंभ राक्षसांना ठार मारते. विप्र रामदासाने केलेली ही आरती बरीच अर्थपूर्ण आहे.
अशा महान शक्ती असलेल्या देवीला आपण नमस्कार करू या.
यादेवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोऽनम:।।