नितीश गेले तरी विरोधक ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:37 AM2017-09-06T01:37:10+5:302017-09-06T01:38:00+5:30
नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या राजकीय घोडदौडीमुळे सारे विरोधी पक्ष गारद व हतबल झाले असावे या समजाला लालूप्रसादांनी पाटणा येथील गांधी मैदानावर...
नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या राजकीय घोडदौडीमुळे सारे विरोधी पक्ष गारद व हतबल झाले असावे या समजाला लालूप्रसादांनी पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ या सभेला जो विराट जनसमुदाय उपस्थित होता त्याने एक जबर उत्तर दिले आहे. या सभेला देशातील १७ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते आणि त्यात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यासह राष्ट्रवादी व अन्य पक्षांचे वरिष्ठ पुढारी यांनी त्यांची हजेरी लावलेली दिसली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी या सभेला हजर नसले तरी सोनिया गांधींचा संदेश त्या सभेला ऐकविला गेला. लालूप्रसाद यादव यांच्यावर सध्या अनेक खटले सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबातील अनेकांवर कोर्ट कारवाया चालल्या आहेत. नितीशकुमारांसोबत त्यांच्या पक्षाने बिहारमध्ये स्थापन केलेले आघाडी सरकार कधीचेच पायउतार झाले आहे. नितीशकुमारांनी थेट पक्षांतर व मूल्यांतर करून भाजपशी नवा घरठाव केला आहे.
लालूप्रसादांच्या मदतीने सत्तेवर येऊन त्यांना दगा दिलेल्या व ज्या पक्षाचा पराभव केला त्या भाजपशी संधान जुळविल्याचा नितीशकुमार यांच्यावर असलेला आरोप बिहारमधील जनतेला खरा वाटत असावा असे सांगणारे त्या सभेचे स्वरूप विशाल होते. या सभेने लालूप्रसाद यांच्यावर तेथील जनतेचा विश्वास अजूनही कायम असल्याचे दाखविलेही आहे. नितीशकुमारांनी आपला पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधला तेव्हा आपले पक्षाध्यक्ष शरद यादव यांना विश्वासात घेतले नव्हते. शरद यादव हे एक निष्ठावान समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष वृत्तीचे नेते आहेत. त्यांना नितीशकुमारांनी भाजपशी जुळविलेला संबंध आवडणारा नव्हता. आपल्या निष्ठेसाठी त्यांनी अध्यक्षपदासोबतच आपल्या संसद सदस्यत्वावरही पाणी सोडण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्या सभेनंतर दुसºयाच दिवशी जनता दल (यू) या पक्षातील नितीशकुमारांच्या गटाने शरद यादव यांचे पक्ष सदस्यत्व रद्द केल्याचा व त्यांचे संसदेतील पद रिक्त केल्याचा दावा संबंधित अधिकाºयांसमोर मांडला आहे. त्यांना सत्तारुढ भाजपची साथ असल्यामुळे तो यथाकाळ मंजूरही होऊ शकेल. मात्र त्यामुळे शरद यादव यांचे दुबळेपण वा नितीशकुमारांचे सच्चेपण सिद्ध होणार नाही. जनतेला जी वचने देऊन नितीशकुमारांनी बिहारची सत्ता मिळविली त्या साºयाच वचनांना त्यांनी हरताळ फासला आहे. ते मुख्यमंत्री आहेत व त्यांना भाजपच्या मदतीने त्या पदावर राहताही येणार आहे. मात्र लालूप्रसादांसोबत असताना त्यांना जे निर्णय स्वातंत्र्य होते ते यापुढे त्यांना असणार नाही. त्यांची यापुढची वाटचाल कुणालाही समजावी अशी राहणार आहे. नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांचे एनडीएत मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या सहकाºयांना स्थान मिळेल असे वातावरणही त्यामुळे निर्माण झाले होते, पण प्रत्यक्षात नितीश यांच्या हाती काहीही पडले नाही. त्यांच्या एकाही सहकाºयाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यापुढे भाजपासोबत जाऊ इच्छिणाºयांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा इशाराच म्हटला पाहिजे.
पाटण्याच्या सभेने त्यांच्याविषयीच्या जनमानसात असलेल्या लोकप्रिय प्रतिमेसमोरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. याच काळात बिहारमधील सृजन हा महाघोटाळा उघडकीला आला असून ज्या काळात तो झाला तो नितीशकुमारांच्या सत्तेचा काळ आहे. पाटण्याच्या सभेने सिद्ध केलेली आणखी एक बाब ही की जनतेच्या मनात सध्याच्या सत्ताधाºयांविषयी समाधानाची पुरेशी भावना नाही. दिल्ली व अनेक राज्यांतील भाजप सरकारांनी जनतेला दिलेली आश्वासने अजून जमिनीवर उतरायची राहिली आहेत. महागाई तशीच आहे. गेल्या दहा दिवसांत पेट्रोलचे दर पाच रुपयांनी तर डिझेलचे तीन रुपये ६७ पैशांनी वाढले आहेत. इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही पूर्वीएवढ्याच किंवा त्याहून अधिक उंचीवर राहिलेल्या आहेत. बेरोजगारीत कमतरता आली नाही. बँकांजवळ पैसा आहे पण लोकांच्या हातात तो खेळत नाही. या असंतोषाचे परिणामही अनेक जागी आता दिसले आहेत.
बंगालमध्ये झालेल्या साºया पोटनिवडणुका ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत. प्रत्यक्ष दिल्लीत बनावा या विधानसभा क्षेत्रात झालेली पोटनिवडणूक केजरीवालांच्या आप पक्षाने भाजपचा २४ हजार मतांनी पराभव करून जिंकली आहे. धर्म आणि जाती यांच्या नावावर आजवरच्या अनेक निवडणुका झाल्या. यापुढे लोक आपल्या गरजांच्या पूर्तीची व त्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची मागणी करतील असे दिसू लागले आहे. विकासाचा मुद्दा महत्त्वाचा होत आहे आणि पुढाºयांच्या राजकीय हालचालींवर व त्यांच्या खरेखोटेपणावर लोकांची यापुढे बारीक नजर राहणार आहे. पाटण्याच्या सभेने लालूप्रसादांना स्वच्छतेचे प्रमाणपत्र दिले नाही. मात्र त्यांच्याविषयी त्या राज्यात अजूनही आस्था शिल्लक आहे हे तिने सिद्ध केले आहे. त्याचवेळी या सभेने नितीशकुमारांच्या दोन वर्षांपूर्वीच्या लोकप्रियतेला लागलेली ओहोटीही उघड केली आहे. राजकारणात जयपराजय होत राहणार आणि लोकही आपले राज्यकर्ते आपल्या मर्जीने निवडत राहणार. त्यामुळे एका निवडणुकीच्या निकालाने देशाचे भवितव्य कायमचे ठरत नाही हे उघड होते. कालचे लोकप्रिय पुढारी आज लोकांच्या विस्मरणात जातात आणि कालपर्यंत कुणाला ठाऊक नसलेली माणसे लोकशाहीत सरळ सत्तेवर आलेलीही पाहता येतात. पाटण्याच्या सभेने सर्व राज्यकर्त्यांना दिलेला हा इशारा सत्ताधाºयांएवढाच विरोधकांनीही लक्षात घ्यावा असा आहे.
-सुरेश द्वादशीवार
(संपादक, लोकमत, नागपूर)