जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय अधूनमधून चर्चेत येत असतो. तसा शरद पवार यांच्या उपस्थितीतील विद्यापीठाच्या कार्यक्रमातही त्याचा उल्लेख झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांनी विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा अनुभव पवार यांच्या गाठीशी असल्याने स्वकीय आमदाराने आणखी एका विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय त्यांच्यासमोर मांडला असावा. नागपूर, पुणे, नांदेड आदी विद्यापीठांना महापुरुषांची नावे दिली, तसे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठालाही द्यावे, असे त्यांचे समर्थन होते. परंतु ही मागणी अस्थानी होती, अशी जनभावना कार्यक्रमस्थळी उमटली. कारण पवार हे सत्तेत नाहीत हे एक कारण आहे. दुसरे म्हणजे पंधरवड्यापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विद्यापीठाला संत मुक्ताईचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. अमळनेर कर्मभूमी असलेले साने गुरुजी यांचे नाव द्यावे, अशीदेखील मागणी मध्यंतरी झाली होती. एकापेक्षा अधिक नावांची चर्चा असल्याने त्याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांच्या मागणीकडे खडसे यांना विरोध या स्वरूपात पाहिले जात आहे. पवार हे मुरब्बी नेते असल्याने त्यांनी स्वकीय आमदाराच्या मागणीकडे पूर्णत: काणाडोळा केला. परंतु विद्यापीठ स्थापनेच्यावेळी २५ वर्षांपूर्वी झालेल्या संघर्षाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. विद्यापीठ कोठे व्हावे, याविषयी आंदोलने झाली होती. नाशिक-नगरने पुणे विद्यापीठात राहण्याचे ठरविल्याने विद्यापीठ जळगावला दिल्याचे पवार म्हणाले. अर्थात त्या बदल्यात नाशिकला मुक्त विद्यापीठ देण्यात आले. धुळ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. नाव उत्तर महाराष्ट्र असले तरी केवळ दोन (नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर तीन) जिल्ह्यांचे विद्यापीठ म्हणून ‘खान्देश’ हे नाव सार्थ ठरले असते, असाही एक मतप्रवाह आहे. अर्थात नामकरणाच्या वादात न अडकता रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या या विद्यापीठाने प्रगतीच्या दृष्टीने चांगली वाटचाल केली आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीत विद्यापीठाने ५९ वे स्थान पटकावले. संशोधन आणि पेटंटच्या क्षेत्रात विद्यापीठाचा २४ वा क्रमांक आहे आणि नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. जपानसह काही देशांमधील विद्यापीठांशी करार करण्यातदेखील विद्यापीठाला यश आले आहे. खान्देशातील शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देण्याचे काम विद्यापीठ करीत असताना राजकीय मंडळी मात्र नामकरणाच्या सीमित गोष्टींमध्ये अडकली आहे.
नको ते नामकरण!
By admin | Published: June 22, 2016 11:39 PM