नको शाळा, नको पाटी : होम स्कूलिंगची पहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 06:10 AM2018-12-28T06:10:54+5:302018-12-28T06:10:59+5:30

मुक्त विद्यालय ही संकल्पना सध्या भारताच्या शिक्षणक्षेत्रात रुंजी घालत आहे. गेली काही वर्षे यावर चर्चा सुरू आहे. दोनएक वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केंद्रीय मुक्त विद्यालयाच्या धर्तीवर राज्य मुक्त विद्यालय मंडळ सुरू करण्याची घोषणा केली होती.

No school, no dash: the dawn of home schooling | नको शाळा, नको पाटी : होम स्कूलिंगची पहाट

नको शाळा, नको पाटी : होम स्कूलिंगची पहाट

Next

- हर्षद माने
(शैक्षणिक प्रश्नांचे अभ्यासक)

मुक्त विद्यालय ही संकल्पना सध्या भारताच्या शिक्षणक्षेत्रात रुंजी घालत आहे. गेली काही वर्षे यावर चर्चा सुरू आहे. दोनएक वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केंद्रीय मुक्त विद्यालयाच्या धर्तीवर राज्य मुक्त विद्यालय मंडळ सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा याविषयी थोडी विचारणा होऊ लागली. मूल तीन वर्षांचे झाले की त्याला शाळेत टाकायचे आणि बालवर्ग ते दहावी असे शालेय शिक्षण पूर्ण करायचे असे ‘शालेय’ संस्कार आपल्यावर इतके रुळले आहेत, की वर्षानुवर्षे आपल्या कित्येक पिढ्यांच्या जगण्याचा ते अविभाज्य भाग झाले आहेत. कुणी शाळेत जायची गरज नाही असे सांगितले तर आपण हसू! शाळेला सुट्टी फक्त आपल्याला ‘सांग सांग भोलानाथ’च्या गाण्यात आणि खरेच शाळेभोवती पाणी साचल्यावर मिळाली आहे.

वरवर पाहता, मुक्त शिक्षण केवळ शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी आहे असे तुम्हाला वाटेल. पण कित्येक पालक आपल्या मुलांना शाळेतून काढून मुक्त शालेय शिक्षणाची वाट चोखाळत आहेत. असे का होत आहे? कारण सध्याचे शालेय शिक्षण मुलांच्या नैसर्गिक वाढीस पोषक नाही, आपल्या मुलाच्या विकासात त्याचा उपयोग होत नाही असे त्यांना वाटते. कुणी भारतातल्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेत लहान मुलांसोबत घडलेल्या खून आणि बलात्काराच्या घटनांनी धास्तावले आहेत. आणि आपल्या मुलाला असे बंदिस्त वातावरणात न शिकवता, आपल्या नजरेखाली आपण अधिक चांगले शिकवू शकतो, असा विश्वास या पालकांना वाटतो.

तुमच्या मुलाला आता याचा कसा फायदा होऊ शकेल? पहिली आणि महत्त्वाची गोष्ट शिक्षणाची भाषा. विद्यार्थ्याला मातृभाषेतच शालेय शिक्षण मिळाले पाहिजे, याचे शास्त्रशुद्ध विवेचन अनेक तज्ज्ञांनी दिले आहे. मुक्त शिक्षणामध्ये तोपर्यंत हे मराठी माध्यम-इंग्रजी माध्यम हा भेद राहणार नाही. भाषेचे बंधन त्याला आड येत नाही. पालकांनी मुक्त शिक्षण घेत असताना योग्य मदत घेतली तर मूल मराठी, हिंदी, इंग्रजीच काय पण भारतीय भाषा आणि परदेशी भाषांतही निपुण होऊ शकते.

तुम्ही तुमचा जरी विचार केलात तर तुम्हाला कळेल, अनेक गोष्टी आपण अनौपचारिकरीत्याच शिकलो आहोत आणि औपचारिकरीत्या शिकलो त्याचा व्यावहारिक जीवनात उपयोग होतोच असे नाही. मग मूल शिकेल कसे? गणित, विज्ञान ते त्याच्या रोजच्या व्यवहारात शिकू शकेल. भाषेसाठी कित्येक पर्याय आहेत, अगदी परदेशी भाषांसाठीसुद्धा. महाराजांचा इतिहास राजगडावर शिकेल, वाळिंबेंची कादंबरी वाचून भारताचा स्वातंत्र्य इतिहास शिकेल, नेहरू तारांगणात जाऊन खगोलशास्त्र शिकेल, वाचनालयात जाईल, विज्ञान केंद्रात जाईल. अगदी गावात जाऊन शेतीही शिकेल. ज्याला आपण ‘लाइफ स्किल्स’ म्हणतो तेही शिकेल. ‘सॉफ्ट स्किल्स’ शिकेल आणि ‘व्यवसाय स्किल्स’सुद्धा. बरे! पारंपरिक शिक्षणातील सगळे ज्ञान तो घेऊ शकेल तेही, कुठल्याही विशिष्ट बोर्डाच्या पुस्तकांचे बंधन न पाळता आणि हे करताना तो त्याला आवडणारी कला शिकेल किंवा क्रीडा प्रावीण्य मिळवेल.

तुमचा मुलगा-मुलगी शालेय जीवनाचे जोखड दूर केल्यास अधिक सुखाने आनंदाने आणि स्वातंत्र्याने जगू शकेल. शाळेत घातले नाही म्हणून तो आळशी होणार नाही, आणि शाळेत जातो म्हणजे त्याचे मडके योग्य घडते आहे असेही नाही. संकल्पना थोडी पचण्यास अवघड आहे खरे, पण तुमच्या मुलाच्या विकासाला शिस्तबद्ध आकार देण्याची प्रचंड ताकद या संकल्पनेत आहे, तेही तुमच्या नजरेसमोर, आणि त्याची कोणतीही फरपट न करता. त्याचे ‘बाल्य’ हरवू न देता!

Web Title: No school, no dash: the dawn of home schooling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.