‘नटसम्राट’ क्लासिक असणे-नसणे महत्त्वाचे आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 11:36 PM2018-03-12T23:36:39+5:302018-03-12T23:36:39+5:30

‘ज्ञानपीठ’कार भालचंद्र नेमाडे यांनीही यापूर्वी कुसुमाग्रजांविषयी आपली मते प्रदर्शित केली होती. परंतु, याच नेमाडे यांनी नंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार स्वीकारताना तात्यासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले होते.

Is not it important to have a classic 'nat samrat'? | ‘नटसम्राट’ क्लासिक असणे-नसणे महत्त्वाचे आहे काय?

‘नटसम्राट’ क्लासिक असणे-नसणे महत्त्वाचे आहे काय?

Next

- धनंजय वाखारे
‘ज्ञानपीठ’कार भालचंद्र नेमाडे यांनीही यापूर्वी कुसुमाग्रजांविषयी आपली मते प्रदर्शित केली होती. परंतु, याच नेमाडे यांनी नंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार स्वीकारताना तात्यासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले होते. अमोल पालेकर यांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य जरूर आहे परंतु, व्यासपीठाचे भान ठेवायला नको का ?
‘नटसम्राट या कलाकृतीला मी क्लासिक मानायला तयार नाही. यात नटाची शोकांतिका नाही तर अडगळीच्या खोलीत पाठवल्या गेलेल्या वयस्कर माणसाची ही कथा आहे. यातील स्वगते एकाच पठडीत म्हणावी लागतात. त्यामुळे ती या नाटकाची बलस्थाने नसून कमकुवतपणा आहे’, असे विधान ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार स्वीकारताना केले. पालेकरांनीच सांगितल्यानुसार, त्यांचे हे मत त्यांनी खुद्द तात्यासाहेबांनाच ऐकविले होते आणि ‘तुम्ही माझ्या शब्दांवर एवढा लोभ आणि विचार करता, तेव्हा तुमचा विचार नाकारता कसा येईल’, असा विनम्रभाव तात्यासाहेबांनी त्यावेळी व्यक्त केला होता. पालेकरांनी आपले हेच मत तात्यांच्या गावात येऊन त्यांच्यावर प्रेम करणाºया नाशिककरांपुढे पुन्हा एकदा ऐकविण्याचे धारिष्ट केले. ‘नटसम्राट’ हे नाटक क्लासिक आहे किंवा नाही, हा मुद्दा वेगळा परंतु, या नाटकाने गेल्या पाच दशकात मराठीच नव्हे तर अन्य भाषिक रंगभूमीवर जे गारुड केले आहे, ते पालेकर कसे नाकारू शकतील?. वि.वा. शिरवाडकर तथा तात्यासाहेबांचे हे नाटक रंगभूमीवर येऊन आता ४८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मराठी रंगभूमीवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी ही एक अजरामर कलाकृती ठरली. त्यामुळे ‘नटसम्राट’ या कलाकृतीत क्लासिकची क्षमता आहे किंवा नाही, तसेच त्याच्या कमकुवतपणाची चिकित्सा करण्याची ही वेळ आहे काय, याचे भान कुसुमाग्रजांचा प्रसाद स्वीकारताना तरी पालेकर यांनी ठेवणे गरजेचे होते.
कोणतीही कलाकृती ही ‘क्लासिक’ म्हणून जन्माला येतच नाही. लोकांच्या मनात ती रुजते, वाढते आणि शिखरावर जाऊन पोहोचते, तेव्हा तिला अभिजाततेचा दर्जा प्राप्त होत जातो. ‘नटसम्राट’ हे नाटक ज्या काळात आले, तेव्हा ती त्या समाजाची गरज होती. शहरी कुटुंबीयात घडलेली ही कथा ग्रामीण भागातील खेडोपाडीही जाऊन लोकांना ती आपली वाटायला लागली. विलक्षण लालित्यपूर्ण, काव्यात्म भाषेतील ही कलाकृती आजही रंगभूमीवर साकारताना नटांना आव्हानात्मक वाटते. याच कलाकृतीवर चित्रपट तयार होतो आणि आजची पिढीही त्याला डोक्यावर घेते. ‘नटसम्राट’ नाटकाने मराठी रंगभूमीला श्रीराम लागू, दत्ता भटसारखे ताकदीचे नट दिले. या नाटकातील गणपतरावाच्या भूमिकेला न्याय देताना आपण रिते झालो, अशी भावना नाशिकमध्येच अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केली होती. काळ बदलला की त्या-त्या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलते. कदाचित, ‘नटसम्राट’ ही कलाकृती आजच्या काळात लिहिली गेली असती आणि रंगभूमीवर आली असती, तर तिला कितपत प्रतिसाद मिळाला असता, याबाबत साशंकता आहे. परंतु, आजच्या घडीला ती क्लासिक कलाकृती म्हणून लोकांच्या काळजात ठसलेली आहे आणि हे सत्य कुणीही नाकारू नये. अमोल पालेकर हे चित्रपटसृष्टीत एक चळवळीचे नाव आहे आणि आदरस्थानही आहे. ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी तात्यांविषयी, त्यांच्या प्रतिष्ठानविषयी, त्यांच्या नाटकांविषयी जे काही भाष्य केले, ते पाहता पालेकरांकडून होणारे कौतुकही नाशिककरांना खोटे वाटायला लागले असेल. माणसांच्या मनात घट्टपणे रुजलेल्या श्रद्धास्थानांना हात घालायचा आणि प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळवायचा, अशी टूमच हल्ली फोफावत चाललेली आहे.

Web Title: Is not it important to have a classic 'nat samrat'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.