कोणताही पुरस्कार किंवा गौरव हल्ली मिळत नाही तर तो ‘मिळवावा’ लागतो आणि त्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी आणि लटपटी कराव्या लागतात व त्यामध्ये देशातील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांचाही अपवाद नाही अशी दबक्या आवाजातील चर्चा नेहमीच कानी पडत असते. पण केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही चर्चा उघड्यावर आणताना, त्यांच्यासारखे नेतेदेखील यामध्ये कसे सहभागी होत असतात याची कबुली दिली. एखाद्याच्या बदलीसाठी नेते मंडळी जसे येईल त्याला शिफारसपत्र देतात त्याच धर्तीवर पद्म पुरस्कारांसाठीदेखील अशी पत्रे देत असतील तर प्रतिष्ठेच्या पुरस्कारांना आजची अवकळा नेमकी कोणी कोणी आणली हा संशोधनाचा विषय ठरु शकतो. तरीही गडकरी यांनी सत्य उघड करताना किंवा पश्चात्ताप व्यक्त करताना तो मोघमपणे न करता आशा पारेख या मधल्या काळातील हिन्दी सिनेमातील नटीचे नाव घेतले व आपल्या राहात्या इमारतीचे उद्वाहन बंद पडलेले असताना धापा टाकत आशाबाई आपल्याकडे शिफारशीसाठी कशा आल्या हे सांगितले. त्यांचे कथन चुकीचे ठरवून आशा पारेख यांनी त्यावर फार काही बोलण्यास जो नकार दिला त्यावरुन गडकरी जे म्हणाले त्याला एकप्रकारे पुष्टीच मिळते. पण मुद्दा तो नाही. गडकरींनी जे काही सांगितले ते ढीग खरे असले तरी ते बरे नव्हते हे मात्र नि:संशय. आशा पारेख यांना पद्मश्रीचा किताब अगोदरच मिळाला होता आणि त्या पद्मभूषण मिळावे म्हणून म्हणे गडकरींना भेटल्या होत्या. यातून एक अर्थ असाही निघू शकतो की शिफारस असेल तरच पद्म पुरस्कार मिळू शकतो, त्यासाठी देशाच्या कोणत्याही का होईना क्षेत्रात असामान्य कामगिरीची गरज नसते.
खरं पण बरं नव्हे?
By admin | Published: January 05, 2016 12:06 AM