जगप्रसिद्ध ताजमहाल पर्यटनस्थळ नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 03:18 AM2017-10-04T03:18:57+5:302017-10-04T03:20:17+5:30
शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या उत्तर प्रदेशातील आग्रास्थित ताजमहालची निर्मिती सतराव्या शतकात शहाजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी केली होती.
शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या उत्तर प्रदेशातील आग्रास्थित ताजमहालची निर्मिती सतराव्या शतकात शहाजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी केली होती. ही वास्तू प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते आणि प्रेमाला धर्म नसतो. हे या कोत्या लोकांना कोण सांगणार?
ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. युनेस्कोने त्याला जागतिक वारसा जाहीर केले आहे. देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक ताजमहालचे अप्रतिम सौंदर्य बघण्याकरिता येत असतात. परंतु उत्तर प्रदेश सरकारच्या लेखी मात्र ताजमहाल काही पर्यटनस्थळ नाही. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीतून प्रेमाचे प्रतीक असलेली ही वास्तू वगळण्यात आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या नव्या पुस्तिकेत ताजमहालचा उल्लेख नसला तरी मथुरा, अयोध्या आणि गोरखपूर येथील मंदिरांचा मात्र समावेश केला गेला आहे. माध्यमे आणि विरोधी पक्षांकडून टीकास्त्रांचा भडिमार झाल्यानंतर राज्याच्या पर्यटन विभागाकडून यासंदर्भात सारवासारवीचा भरपूर प्रयत्न झाला असला तरी, ताजमहालचा उल्लेख हेतुपुरस्सर टाळण्यात आलेला नाही, या सरकारच्या खुलाशावर कुणाचाही विश्वास नाही. भाजपाच्या धर्मांध राजकारणाचा हा कळस असून, देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याच्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्याचाच हा एक भाग असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. ताजमहाल हा केवळ उत्तर प्रदेश अथवा भारताचीच नव्हे तर साºया जगाची शान आहे. असंख्य विदेशी पर्यटक तर केवळ ताजमहाल बघण्यासाठी भारतभेटीवर येत असतात. बिल क्लिंटन असो, मुशर्रफ वा लंडनचे प्रिन्स चार्ल्स सर्वांनाच ताजमहालचे दर्शन आणि तेथील बाकावर बसून फोटो काढणे भावते. शहाजहानद्वारे निर्मित ही वास्तू एकप्रकारे सर्वधर्मसमभावाचेच प्रतीक झाली आहे. परंतु प्रेमाला धर्म नसतो, जात नसते, हे योगी असलेल्या आदित्यनाथांना कोण सांगणार? त्यांना शहाजहानची भावना आणि मुमताजचे प्रेम कसे कळणार? त्यांच्याकडून ती अपेक्षाही केली जाऊ शकत नाही. ‘ढाई अक्षर प्रेमके’ हे सांगणारे संत कबीर यांचीही हीच जन्मभूमी. पण दोघांच्याही दृष्टिकोनात किती फरक असावा? त्यामुळे ताजमहालचे नाव जर उत्तर प्रदेश पर्यटनस्थळांच्या यादीतून गायब झाले असेल तर ते अनावधानाने झाले असणार, यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. त्यामागे आणखीही एक कारण आहे. भारतात येणाºया विदेशी पाहुण्यांनी ताजमहालला भेट देण्याची जुनी परंपरा आहे. परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच ही प्रथा खंडित करून ताजमहाल हा भारतीय संस्कृतीचे प्रतीक नसल्याचे म्हटले होते. तसेही अलीकडच्या काळात भारतवंशात देशभक्तीची भावना ओसंडून वाहत आहे, इतिहास बदलाचे वारेही वेगवान झाले आहेत. राजकारणात देशाचा इतिहास आणि त्यातील नायकांचा आपल्या सोयीनुसार वापर करून घेण्याची प्रवृत्ती बळावली आहे. कोण नायक आणि कोण खलनायक, हे ठरविण्यावरूनही त्यांच्यात स्पर्धा सुरू आहे. परंतु या लोकांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तसेच ताजमहालचे नाव राज्याच्या पर्यटनस्थळांच्या यादीत न घेतल्याने, त्याचे वैभव अथवा लोकप्रियता कमी होणार नाही.
(editorial@lokmat.com)