आता एकच हुंकार मी का बेरोजगार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:22 AM2018-02-21T05:22:21+5:302018-02-21T05:22:25+5:30
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक तरुण मराठवाड्यातील आहेत़ लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात़ जागा निघत नाहीत़ निवड होणे तर दूरच़ या अस्वस्थतेतूनच मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांचे
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक तरुण मराठवाड्यातील आहेत़ लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात़ जागा निघत नाहीत़ निवड होणे तर दूरच़ या अस्वस्थतेतूनच मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाले़ सरकार त्याची दखल घेईल, अशी अपेक्षा आहे़ परंतु, बेरोजगारांना दिलासा मिळणारे चित्र दिसत नसल्याने मोर्चानंतर आता तरुणांनी विशेषत: मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी बेरोजगार पदयात्रेचा एल्गार पुकारला आहे़ पुण्यातील भिडेवाडा ते मुंबईमध्ये विधान भवनापर्यंत ही पदयात्रा ११ ते १९ मार्च दरम्यान जाईल, असा प्रचार विद्यार्थीच सोशल मीडियातून करीत आहेत़ ‘ना धर्मासाठी ना जातीसाठी, ना पक्षासाठी ना नेत्यासाठी, चल येऊ या रस्त्यावर बेरोजगारी संपविण्यासाठी, असा नारा दिला आहे़
आता एकच हुंकार मी का बेरोजगार? असा सवाल करीत विद्यार्थ्यांनी पदयात्रेतील सहभागासाठी आॅनलाईन अर्ज भरणे सुरू केले आहे़ कुठलाही पक्ष नाही वा कुठलीही संघटना नाही़ उत्स्फूर्तपणे विद्यार्थी एकत्र येऊन विरोधाची मूठ आवळत आहेत़ केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे़ कष्ट केले तर १०० टक्के यश मिळते़ परंतु, गेल्या काही वर्षांपासून भरतीच्या जाहिराती नाहीत़ वर्षानुवर्षे विद्यार्थी गाव सोडून जिल्ह्यांच्या ठिकाणी, ज्यांना परवडत नाही असे काहीजण अर्धवेळ नोकरी करीत पुण्यात ठाण मांडून आहेत़ यश अपयश दूर संधीही मिळत नाही, अशा विचित्र अवस्थेतून तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना जावे लागत आहे़
मराठवाड्यात रोजगाराच्या अन्य संधी दुर्मीळ असल्याने पदवीधर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत़ शिवाय, शिक्षक, प्राध्यापक पदांच्या रिक्त जागाही भरल्या जात नाहीत़ जवळ-जवळ भरती प्रक्रिया बंद आहे़ एकीकडे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे, असा आग्रह धरला जातो़ मात्र विद्यार्थी निवृत्तीचे वय वाढू नये, अशी भूमिका मांडत आहेत़ शिक्षित बेरोजगारांना अद्यापि बेरोजगार भत्ता मिळण्याची तरतूद नाही़ नोकर कपातीचे धोरण, रिक्त जागा न भरण्याचे धोरण़ यामुळे खासगी शिक्षण संस्थांमध्येही संधी नाहीत़ धर्मादाय शिक्षण संस्था आता कुटुंब संस्था बनल्या आहेत़ उरले-सुरले सरकारने कंपनीकरण करण्याचा घाट घातला आहे़ त्यामुळे जवळपासही रोजगाराची संधी नाही़ मराठवाड्यात एखादा प्रकल्प येईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा आशावादही निर्माण केला जात नाही़ दरम्यान, लातूरला रेल्वे डबे निर्मितीचा मोठा प्रकल्प आणि हजारो रोजगार उपलब्ध होतील, अशी दिलासा देणारी बातमी बेरोजगारांचे मोर्चे निघत असतानाच उमटली आहे़ मुळात अशा प्रकल्पातील रोजगार हा कौशल्याधारित असतो़ ते कौशल्यच मराठवाड्यातील तरुणांकडे नसेल तर पुन्हा मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणांनाही रेल्वेतील नोकºया कशा मिळतील़ कपूरथला, रायबरेली, चेन्नई या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांमध्ये अपवादानेही महाराष्ट्रीयन नाव कर्मचाºयांच्या यादीत दिसत नाही़ एकंदर, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना तरुणांकडे संबंधित रोजगाराचे कौशल्य शिक्षण असले पाहिजे, याची काळजी धुरीणांनी घेतली पाहिजे़ त्यामुळे बेरोजगार पदयात्रा मंच स्थापन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी पुणे-मुंबई पायी प्रवास करणार आहे़ त्यांना आश्वासक उत्तरे न मिळाल्यास सत्ताधाºयांचा उलटा प्रवास सुरू व्हायला वेळ लागणार नाही़
- धर्मराज हल्लाळे