आण्विक फुशारक्या! अनाधिकार वृत्तीवर प्रकाश टाकण्यासाठी गरज...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:37 AM2019-10-07T05:37:07+5:302019-10-07T05:37:33+5:30
लष्कराचे प्रमुख बिपीन रावत हे तर अशी भाषा आजवर अनेकदा व अकारण बोलले आहेत.
सरकारच्या वतीने बोलण्याचा अधिकार सरकारातील व्यक्तींना म्हणजे मंत्र्यांना वा सरकारच्या प्रवक्त्यांना असतो. भारतात मात्र तो अधिकार लष्कर व प्रशासन या दोहोतलेही अधिकारी हवा तसा वापरतात. आक्षेप आहे तो ते अधिकार खरेखोटेपणाचा जराही विचार न करता कमालीच्या अतिशयोक्त पद्धतीने वापरतात, हा आहे. ‘राफेल विमाने भारताच्या विमानदलात आली की त्याचे सामर्थ्य एवढे वाढेल की ते चीन व पाकिस्तान या दोहोंवरही एकाच वेळी मात करू शकेल’ असे वायुदलप्रमुख आर.के. भदौरिया यांनी परवा सांगून टाकले.
लष्कराचे प्रमुख बिपीन रावत हे तर अशी भाषा आजवर अनेकदा व अकारण बोलले आहेत. शिवाय त्यांना कुणी अडवल्याचेही दिसले नाही. ‘चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना एकत्रितपणे पराभूत करू शकू एवढे आपले लष्कर प्रबळ आहे,’ ही भाषा त्यांनी आजवर अनेकदा वापरली आहे. या भाषेने ते देश घाबरतात वा जगाला त्यातले सत्य कळत नाही या भ्रमात ही माणसे असतात की काय, हे कळायला मार्ग नाही.
वास्तव हे की अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच संसदेच्या संरक्षणविषयक समितीसमोर भारतीय लष्कराच्या अडचणी वाचणारा एक मोठा पाढा त्याचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख लेफ्ट. जनरलच्या पदावरील अधिकाºयाने वाचला. तो ऐकून ती समितीच नव्हे तर सारी संसदीय समिती हादरून गेली. भारताला चीन वा पाकिस्तानशी निकराचे युद्ध करावे लागले तर जेमतेम दहा दिवस पुरेल एवढीच युद्ध सामग्री देशाजवळ आहे, अशी सुरुवात करून (तीन दिवसांत वापरावा लागणारा दारूगोळा एकाच दिवशी वापरावा लागत असेल तर त्या युद्धाला निकराचे युद्ध म्हणतात.) हे अधिकारी म्हणाले, ‘आपले रणगाडे जुने झाले आहेत. त्यातले अनेक निकामीही आहेत. प्रत्यक्ष शस्त्रे व दारूगोळाही अपुरा व अविश्वसनीय बनला आहे. लष्करी साधनांच्या दुरुस्तीसाठी अर्थमंत्रालयाकडे आम्ही ४० हजार कोटींची मागणी केली होती. मात्र त्यातले जेमतेम २६ हजार कोटी त्या मंत्रालयाने आम्हाला दिले. त्या पैशात नवी शस्त्रे आणणे व देशाच्या शस्त्रागारात आधुनिक शस्त्रांची भर घालणे अशक्यप्राय आहे. प्रत्यक्षात लष्करी जवानांना दिलेल्या बंदुकाही फारशा परिणामकारक राहिल्या नाहीत आणि त्यातल्या गोळ्याही कालबाह्य झाल्या आहेत. युद्धाला तोंड द्यावे लागलेच तर देशाला फार मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.’
लष्करी प्रवक्त्याच्या या कबुलीजबाबाने हादरलेले संसद सदस्य त्यांना फारसे प्रश्नही विचारू शकले नाहीत. १ आॅक्टोबरला चीनने त्याचा ७० वा वर्धापन दिन साजरा केला. आपल्या लष्करी व अणुशक्तीचे जे प्रदर्शन त्याने या वेळी जगाला दाखविले ते साऱ्यांच्या मनात धडकी भरविणारे आहे. ९०० लढाऊ विमानांची पथके त्याने एकाच वेळी आकाशात उडविली. त्यातले प्रत्येक विमान अण्वस्त्रे वाहून नेणारे होते. चीनची सैन्यसंख्या ३० लाखांहून अधिक व अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. शिवाय त्याची शस्त्रागारे नवनव्या आधुनिक शस्त्रांनी भरलीही आहेत. या तुलनेत भारताच्या लष्करात साडेतेरा लक्ष सैनिक आहेत हे लक्षात घ्यायचे. चीनचे नाविक दल जगभरच्या समुद्रात आपले अस्तित्व दाखवीत व अणुशक्तीचे प्रदर्शन करीत फिरत आहे. या तुलनेत ‘आमची खांदेरी ही युद्धनौका सा-या जगाला भीती घालायला पुरेशी आहे’ हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे विधान हास्यास्पद असे आहे.
भारताजवळ अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रेही आहेत. मात्र एकट्या पाकिस्तानच्या तुलनेत ती संख्येने कमी आहेत. देशाचा स्वाभिमान व जोम टिकून राहावा म्हणून आपली ताकद वाढवून सांगणे ही बाब समजण्याजोगी आहे. मात्र सा-या जगातील मान्यवर माध्यमे चीनचे लष्करी व आण्विक सामर्थ्य जगाला सप्रमाण दाखवीत असताना हा प्रचारी भाग फसवा आहे हे कुणाही जाणकाराला समजणारे आहे. देशाच्या लष्कराचे दुबळेपण सांगणे हा याचा हेतू नाही. मात्र त्याविषयीची आकडेवारी फुगवून सांगण्याच्या अधिकारी वर्गाच्या अनाधिकार वृत्तीवर प्रकाश टाकण्यासाठी हे सांगणे गरजेचे आहे.