चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेते, श्रीकृष्ण-संत ज्ञानेश्वर-श्रीविठ्ठलाच्या भूमिका केवळ साकारणारा, नव्हे तर तशी संतवृत्ती, अध्यात्म जगणारा देवमाणूस, अशी शाहू मोडक यांची ओळख आहे. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. त्याच्या सांगतेनंतर ‘शाहू मोडक प्रतिष्ठान’चे काम थांबणार आहे. प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षात हा चुटपूट लावणारा निर्णय होत आहे. त्यानिमित्त...आपल्या चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत शाहू मोडक यांनी अर्धशतकाहून अधिक काळ योगदान दिले. यात १५० हून अधिक हिंदी चित्रपट आणि २२ मराठी चित्रपटांत विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. सतेज, सात्विक पुरुषी सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे शाहू मोडक! शाहू यांचे कुटुंब मूळचे कोकणस्थ ब्राह्मण. त्यांच्या पणजोबांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. शाहू मोडकांचे वडील रामकृष्ण अहमदनगरच्या चर्चमध्ये रेव्हरंड म्हणून काम पाहत. तेथेच शाहंंूचा जन्म झाला. रामकृष्णपंत नाताळच्या सणानिमित्त होणाऱ्या उत्सवात ख्रिस्तपुराणातील कथाविषयांवर आधारित नाटकांवर भूमिका करत. तसेच कीर्तनही करत. शाहू मोडकांना अभिनय आणि संगीताचे शिक्षण लहानपणापासूनच मिळाले होते. १९३२ मध्ये ‘श्यामसुंदर’ चित्रपटात बाल श्रीकृष्णाची भूमिका साकारून मोडक यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट प्रचंड गाजला. रौप्यमहोत्सव साजरा करणारा भारतातील तो पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर शाहू मोडक यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘आवारा शहजादा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दुहेरी भूमिका साकारली. भारतीय बोलपटातील दुहेरी भूमिका सर्वप्रथम साकारण्याचा मान मोडक यांना मिळाला. शाहूंचे ‘माणूस’, ‘संत ज्ञानेश्वर’ हे प्रभात फिल्म कंपनीचे चित्रपट खूपच चालले. शाहू मोडक यांनी चित्रपटात साकारलेल्या संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच ज्ञानेश्वरांची चित्रे आणि मूर्ती आजही निर्माण होतात, एवढा या त्यांच्या भूमिकेचा प्रभाव आहे. त्यांनी २४ वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. असा हा प्रतिभावान कलावंत प्रत्यक्ष जीवनातही सर्वधर्मसमभाव आचरणारा होता. त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी सांगितले आहे, की हा माणूस अंतर्बाह्य आध्यात्मिक होता. माणूस म्हणून त्यांचा प्रवास, त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान, त्यांच्या स्मृती नव्या पिढीला अनुभवता याव्यात, यासाठी शाहू मोडक प्रतिष्ठानतर्फे ‘शाहू मोडक : प्रवास एका देवमाणसाचा’ ही चित्रफीत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया आणि अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते नुकतीच प्रकाशित करण्यात आली. शाहू मोडक यांच्याबरोबर भूमिका साकारलेल्या सुलोचनादीदी, रमेश देव, सीमा देव, फैयाज, सचिन पिळगावकर आदी कलावंतांनी या चित्रफितीत शाहू यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच डॉ. के. एच. संचेती, उल्हास पवार यांनीही आठवणी जागवल्या आहेत. मात्र, याबरोबरच शाहू मोडक यांच्या चाहत्यांना हळहळ वाटायला लावणारा निर्णय प्रतिभातार्इंनी सांगितला. प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षात शाहू मोडक यांच्या जन्मदिनी म्हणजे २५ एप्रिलला शाहू मोडक प्रतिष्ठानतर्फे शेवटचा कार्यक्रम आयोजित करून त्याचे काम थांबवण्यात येणार आहे. प्रतिभातार्इंचे वय आता ८० वर्षे आहे. हे प्रतिष्ठान समर्थपणे सांभाळणारे विश्वस्त चारूकाका सरपोतदार यांच्यासारखे अनेक विश्वस्त या जगात नाहीत. पुढे हे काम समर्थपणे अन् निष्ठेने कुणी सांभाळू शकेल, असे दिसत नसल्याने हा निर्णय घेत आहे. एका टप्प्यावर थांबले पाहिजे अन् कुठे थांबले पाहिजे, हे कळले पाहिजे, अशी भावना प्रतिभातार्इंनी व्यक्त केली. एका अर्थाने त्यांचा हा निर्णय योग्यच आहे. प्रतिष्ठान-संस्था नंतर दयनीय-उपेक्षित अवस्थेत बंद पडण्यापेक्षा स्वत:हून त्यांचे काम थांबवणे कधीही चांगलेच. तरी अजूनही असे वाटते, की आजही अनेक शाहू मोडकप्रेमी संवेदनशील व्यक्ती अस्तित्वात आहेत. त्या पुढे येतील आणि या प्रतिष्ठानची धुरा समर्थपणे सांभाळतील, अशी आशा वाटते.- विजय बाविस्कर
‘शाहू मोडक प्रतिष्ठान’च्या संभाव्य पूर्णविरामाच्या निमित्ताने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:59 AM