सिग्नलचे भीषण घोळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 07:31 AM2023-06-05T07:31:02+5:302023-06-05T07:31:27+5:30
आता या सिग्नल हाताळणाऱ्या माणसाने असे का केले याची पुढील चौकशीत स्पष्टता होईल.
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी तीन रेल्वे गाड्यांच्या झालेल्या अपघाताचे कारण स्पष्ट होत आहे. अति वेगाने धावणाऱ्या या लांब पल्ल्याच्या गाड्यांना चुकीचा सिग्नल देणे आणि चालकाची दिशाभूल होईल असा तो तातडीने बंद करणे, हे कारण समोर आले आहे. आता या सिग्नल हाताळणाऱ्या माणसाने असे का केले याची पुढील चौकशीत स्पष्टता होईल.
पण, मानवी चुकांच्या कारणांनी मुख्य मार्गावरील कोरोमंडल एक्स्प्रेस गाडी अपलूपवर गेली आणि सिग्नल बंद होताच चालकाचा गोंधळ उडून तातडीचे ब्रेक लावल्याने डबे रुळावरून घसरले आणि लूप मार्गावर थांबलेल्या मालगाडीवर ते धडकले. विस्कळीत झालेल्या कोरोमंडल गाडीने मुख्य मार्गही अडविला गेला. त्याचवेळी बंगळुरू ते हावडा धावणारी सुपरफास्ट गाडी ताशी ११६ किलोमीटर वेगाने आली ती या डब्यांवर आदळली. एका चुकीच्या सिग्नलमुळे हा सर्व प्रकार घडला. यात २८८ लोक मृत्युमुखी पडले. दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी होते. त्यापैकी बहुसंख्य जखमी झाले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व येऊ शकते.
पूर्वोत्तर आणि दक्षिण-पूर्व हा रेल्वेचा एक महत्त्वाचा आणि नेहमी वाहतुकीने गजबजलेला मार्ग असतो. आसाम, पश्चिम बंगाल, तेलंगणा ते पुढे तामिळनाडू आणि कर्नाटकास जोडणारा हा मार्ग आहे. गेल्या काही दशकांपासून आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिशामधून दक्षिण भारतात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रमाण वाढले आहे. या गाड्यांनी हे मजूर प्रवास करतात, रेल्वेने सुरक्षेचे अनेक उत्तम उपाय योजले आहेत. मात्र काही महत्त्वाचे मार्ग असूनही सुरक्षेचे 'कवच' ही प्रणाली या मार्गावर अवलंबिण्यात आलेली नाही.
कवच प्रणालीनुसार सुमारे ३८० मीटर अंतरावरील समोरासमोर आलेल्या गाड्यांची माहिती होते. शिवाय हवामानातील बदलामुळे सिग्नल न दिसणे किंवा मार्गावरील काही अपघातसदृश गोष्टी नजरेस न पडणे याची पूर्वकल्पना मिळते. त्यानुसार गाडीचा वेग कमी करीत तातडीची मदत किंवा मार्गदर्शन मिळविता येते. ती व्यवस्था या उत्तर-पूर्व रेल्वे मार्गावर उपलब्ध नाही. तेदेखील एक महत्त्वाचे कारण या अपघातामागे आहे. केवळ सिग्नल देण्याचा घोळ झाल्याने इतका भीषण अपघात व्हावा आणि काही क्षणांत २८८ जणांचे आयुष्य संपून जावे हे फार क्लेशदायक आहे. अशा परिस्थितीत शासन यंत्रणा जागी होते. सुरक्षा दलांचे प्रचंड मदतकार्य सुरू होते. ही फार महत्त्वाची बाब आहेच.
या सर्व यंत्रणा कामाला लागण्यापूर्वी आजूबाजूचे सामान्य लोक मदतीला धावतात ही मानवी नात्यातील रेशीमगाठ आहे. जखमी झालेले, अपघातात सापडलेले अनेक जण आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत असताना शेकडो लोक हातातील काम सोडून अपघातस्थळी धाव घेतात, याचे उत्कृष्ट दर्शन बालासोर जिल्ह्यातील जनतेने घडविले, अपघात सहा वाजून पन्नास मिनिटांनी झाला होता. सात वाजून पाच मिनिटांनी शेकडो पाय धावत गेले होते. अपघात झाला आहे एवढीच जाणीव त्यांना होती. ही भावना खूप काही सांगून जाते. रेल्वे प्रशासनात काम करणारे आणि त्यांच्या कामासाठी वापरली जाणारी यंत्रणा अपुरी आहे का, यासंदर्भात या गंभीर अपघाताने शिकता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रत्येक गाडी कोठे धावते आहे, तिचा पुढील मार्ग सुलभ आहे ना, याची खात्री करणे शक्य आहे.
जगभरातील बहुतांश सर्वच देशांतून चोवीस तास विमानांची उड्डाणे होत असतात. ज्या देशातून उड्डाणे घेतली जातात तेथे बऱ्याचदा रात्र असते आणि पोहोचतात तेथे दुपार झालेली असते. कोठून कोणते विमान कोठे जात आहे, याची माहिती त्या त्या विमानचालकांना असते. आकाशात धडक होत नाही. आपली भारतीय रेल्वे एकाच देशात जमिनीवरून धावत असते. तिचे उत्तम पद्धतीने नियोजन करणे अशक्य नाही. या तिहेरी अपघातांतून नवे काही शिकता येईल, सिग्नल देण्यातल्या चुका झाल्या त्या टाळता येतील याची खात्री करून घ्यायला हवी. सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करणारी 'कवच' सारखी यंत्रणा प्रत्येक मार्गावर अद्ययावत करायला हवी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तम समन्वय करीत अपघातग्रस्तांना मदत दिली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ओडिशा प्रशासनाने उत्तम सोय केली. अशा सुविधा रेल्वे विभागानेदेखील निर्माण कराव्यात. केवळ अपघातप्रसंगीच नव्हे, तर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीही या सुविधा कायमच्या वापरता येतील. सिग्नल घोळाने बरेच काही शिकविले आहे. आता तरी सुधारणा करायला हव्यात.