‘अरे पुन्हा स्वातंत्र्याच्या पेटवा मशाली’, दुष्टत्वाचा नायनाट होवो...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 02:06 AM2019-10-08T02:06:00+5:302019-10-08T02:06:27+5:30
बौद्ध धर्म हा पंचशीलेवर आधारित आहे.
आज नवरात्रपर्वाची सांगता विजयादशमीने होत आहे. वाईटावर चांगल्याचा विजय, दुष्टांवर सुष्टांचा विजय म्हणून हा दिवस भारतभर उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्यातील दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक असलेल्या रावण दहनाने हा प्रतीकात्मक विजय साजरा केला जातो. श्रीरामचंद्र हे सद्गुणांचे प्रतीक मानून त्यांचे पूजन करण्यात येते. याचदिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनही साजरा करण्यात येतो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले.
बौद्ध धर्म हा पंचशीलेवर आधारित आहे. बौद्ध धर्म जेथे जेथे आहे तेथे तेथे या पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला जातो. डॉ. बाबासाहेबांनीही त्या तत्त्वांचा पुरस्कार आपल्या अनुयायांसाठी केलेला असला तरी जागतिक शांततेसाठी सर्वच नागरिकांनी या तत्त्वाचे पालन करण्याचा संकल्प करायला हवा. माणूस हा मूलत: सहिष्णूच असतो. परस्परांविषयी बंधुभाव बाळगून समूहाने राहण्याची माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. त्यातूनच शहरे निर्माण झाली. ही शहरे स्मार्ट करण्याचा संकल्प सध्याच्या सरकारने केला आहे. त्यासाठी माणसातच परिवर्तन घडवून आणायला हवे. ते घडवण्यासाठी स्वच्छतेचे अभियान चालविण्यात येत आहे.
महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून हे स्वच्छतेचे अभियान सरकारतर्फे चालविण्यात येत आहे. वास्तविक नागरिकांनीच स्वेच्छेने पुढे येऊन हे काम हाती घेतले तर हे अभियान यशस्वी होईल. परिसराची स्वच्छता राखण्याचा संकल्प नागरिकांनी केला तर शहरे स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. सार्वजनिक मालमत्ता म्हणजे बेवारस मालमत्ता समजून या मालमत्तेचे नुकसान करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पण ही मालमत्ता समाजाची असते, तेव्हा तिची निगा राखणे हे समाजाचे कर्तव्य आहे ही भावना समाजात निर्माण करण्याची खरी गरज आहे. त्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हा विचार लोकांनी समजून घ्यायला हवा व त्याप्रमाणे संयमाने वागायला हवे.
आपल्या घटनेने स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना बहाल केला आहे. त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आज स्वातंत्र्याच्या रक्षणाच्या नावाखाली स्वातंत्र्याचा संकोच करण्यात येत आहे. अलीकडे काही नागरिकांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मॉब लिचिंगच्या नावाखाली कायदा हातात घेण्याच्या वाढत्या प्रकारावर चिंता व्यक्त केली. पण असे पत्र लिहिणे म्हणजे शासनास विरोध करणे आहे आणि शासनास विरोध करणे म्हणजे देशद्रोह, असे म्हणत पत्र लिहिणाऱ्या या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा प्रकार मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारा आहे. अलीकडे आयएनएक्स मीडियाप्रकरणी वित्त मंत्रालयातील चार माजी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिल्यावर देशातील सेवानिवृत्त अधिकाºयांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आता या अधिकाºयांवरही देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणार का?
राजकारणी मनमानी करू लागले तर अधिकाºयांना काम करणे कठीण होईल. केवळ सत्ता हातात आहे म्हणून काहीही करायचे ही हुकूमशाही झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तेथील गोरखनाथ मंदिराचे पीठाधीश आहेत. त्यामुळे नवरात्रौत्सवात त्यांचा मुक्काम गोरखनाथ मंदिरात आहे. तेथून ते उत्तर प्रदेशचा कारभार सध्या चालवीत आहेत. हे सत्तेच्या गैरवापराचे ढळढळीत उदाहरण असून केंद्राने त्यांना याबद्दल जाब विचारायला हवा. देशद्रोहाच्या आरोपाखाली व्यक्तिस्वातंत्र्यावर टाच आणली जात असेल तर ते स्वातंत्र्य जपण्यासाठी पुन्हा लढा देण्याची गरज आहे.
‘अरे पुन्हा स्वातंत्र्याच्या पेटवा मशाली’ असा एल्गार पुकारण्याची आवश्यकता आहे. विजयादशमीच्या पावन पर्वावर राज्यकर्त्यांना ती सुबुद्धी सुचो आणि दृष्ट शक्तींचा नायनाट होऊन सुडाच्या राजकारणापासून लोकांची मुक्तता होवो, तसेच निर्भेळ विकासाच्या दिशेने राष्ट्राची वाटचाल सुरू होवो, असे इच्छाचिंतन करण्यापलीकडे आपल्या हातात काय आहे?