शाळेत जाणारे आजचे मूल चार ओळी धड वाचू किंवा लिहू शकत नाही, मग आकडेमोड करणे तर दूरच राहिले. आजच्या अभियंत्यातही कौशल्याचा अभाव जाणवतो. ही स्थिती नक्कीच चिंताजनक म्हणावी लागेल. एक काळ असा होता, जेव्हा मुले चांगली क्रमिक पुस्तके वाचायची. प्रश्नांची उत्तरे ती स्वत:च शोधायची, पण आता मुलांनी वाचनाला फाटा दिला आहे. ती आदर्श प्रश्नांची आदर्श उत्तरे वाचूनच परीक्षा देऊ लागली आहेत. या व्यवस्थेत गुणवान शिक्षकांचाही अभाव जाणवू लागला आहे. युनेस्कोच्या २०१५च्या अहवालानुसार जगातील ७४ देशांत गुणवान शिक्षकांचा तुटवडा निर्माण असून, त्यात भारताचा क्रमांक दुसरा आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शिक्षक-विद्यार्थी प्रमाणानुसार प्राथमिक शिक्षणासाठी ३० विद्यार्थ्यांना एक शिक्षक, तर त्यापुढील वर्गांसाठी ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हवा. सार्वजनिक शाळांत हे प्रमाण अजिबात पाळले जात नाही. खासगी शाळा बऱ्याच प्रमाणात त्याचे पालन करताना दिसतात. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने डिसेंबर, २०१६ला लोकसभेत सादर केलेल्या माहितीनुसार, देशातील शासकीय प्राथमिक शाळांत शिक्षकांच्या १८ टक्के तर माध्यमिक शाळात १५ टक्के जागा रिक्त आहेत. उच्चशिक्षण देणाºया चांगल्या शिक्षण संस्थांत शिक्षकांच्या ३० ते ५० टक्के जागा रिक्त असल्याने, विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी वर्गाकडे वळावे लागते. मुलांचे दोन्ही पालक नोकरदार असल्याने, घरी कुणी लक्ष देण्यासाठी नसल्याने निर्माण झालेली पोकळी शिक्षणाचे वर्गच भरून काढतात. या शिकवणी वर्गात विद्यार्थी पिळून निघतात. त्यामुळे पालकही तणावात असतात. कारण मुलांसमोर चांगली कामगिरी दाखवा किंवा संपून जा, हे दोनच पर्याय शिल्लक असतात.
खासगी शिकवणी वर्गांची बाजारपेठ २०१७ साली १६० कोटी डॉलर्सची होती. ती दरवर्षी वाढतच आहे. गेल्या काही वर्षांत ही वाढ वार्षिक ३०-३५ टक्के आहे. त्यामुळे २०२० सालापर्यंत ती ३०० कोटी डॉलर्सची होण्याची शक्यता आहे. उद्योग नसूनही शिकवणी वर्गांना उद्योगाचा दर्जा मिळाला आहे! नॅशनल सॅम्पल सर्व्हेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, प्रत्येक चार विद्यार्थ्यांतील एक विद्यार्थी हा शिकवणी वर्गात जातो! खासगी शिकवणी वर्गाचे निरनिराळे प्रकार आहेत. कुठे क्लासरूम कोचिंग, कुठे लहान स्टडी सर्कल, कुठे घरची शिकवणी, तर कुठे आॅनलाइन शिकवणी. त्यातील ९६ टक्के शिकवणी समोरासमोर असते. एकूण १.२ लाख कोटींच्या शिकवणी वर्ग उद्योगापैकी आॅनलाइन शिकवणीचा वाटा ३,५०० कोटींचा आहे. जसजसा शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात इंटरनेटचा प्रभाव वाढेल, तसा आॅनलाइन शिक्षणाचा विस्तार होईल, पण त्यासाठी अर्थातच तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या तज्ज्ञांची गरज मोठ्या प्रमाणात लागेल.शिक्षणाचे क्षेत्र अस्ताव्यस्त असले, तरी ते देण्याच्या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातही बदल होणे अपेक्षित आहे. एकाच संस्थेत शिकून त्या संस्थेला विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय मिळण्यात अनेकांचे श्रम असतात. त्यात कौशल्य विकासाचा कार्यक्रम आणि निरनिराळ्या विद्यापीठांचे आॅनलाइन शिक्षण यांचाही मोठा वाटा असतो. विद्यार्थीही सतत पर्यायांचा शोध घेत असतात. त्या दृष्टीने आजच्या महाविद्यालयांनीसुद्धा अधिक तत्परता दाखवायला हवी. ती विद्यार्थी केंद्रित, उद्योजकता वृद्धिंगत करणारी आणि उत्तरदायित्व बाळगणारी असावी. मूल्यवाढीसाठी खासगी शिकवणी वर्ग आणि आॅनलाइन शिक्षण या दोन्हीची गरज राहील. याशिवाय विद्यार्थी व शिक्षक यांना जोडणारे व्यासपीठ, शिक्षणाच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे पृथक्करण करण्याची व्यवस्था यातूनच स्पर्धात्मक शिक्षणप्रणाली विकसित होईल.
आजच्या शिक्षणाचे भवितव्य काय राहील? व्हिडीओच्या माध्यमातून प्रत्यक्ष फळ्याचा वापर करून आॅनलाइन शिक्षण मिळणे हे शिक्षणाचे भविष्य असेल का? त्या पद्धतीत शिक्षणाच्या एखाद्या सत्राचे पुनर्प्रसारण करता येऊ शकेल. आॅनलाइनच्या व्यासपीठावर तज्ज्ञांचे पॅनेल नोंदवून ठेवता येईल. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या गरजांची पूर्तता करू शकणाºया शिक्षकाची निवड करता येईल. प्रवासी वाहन निवडताना ओला किंवा उबेरची आपण निवड करू शकतो, तसाच हा प्रकार असेल. आॅनलाइन अभ्यासासाठी आॅनलाइन पेमेंटचा पर्याय असेल. अभ्यासाविषयीचा स्वत:चा फीडबॅक शिक्षकाच्या माहितीसाठी आॅनलाइन नोंदवून ठेवता येईल.अशा शिक्षणामुळे निरनिराळ्या संधी उपलब्ध होणार असल्या, तरी त्यामुळे परंपरागत विद्यापीठांचे अस्तित्व धोक्यात येईल. वास्तविक, आॅनलाइन शिक्षणामुळे सध्याची शिकवणीची केंद्रे नष्ट व्हावीत, अशी अपेक्षा नाही, तर अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त पर्याय म्हणूनच त्याकडे बघायला हवे. विद्यापीठांनी स्वत:च्या दर्जात सुधारणा घडवून आणायला हवी. त्यासाठी त्यांना आॅनलाइन शिक्षणाची मदत घेता येईल. उच्चशिक्षण घेणे ज्यांना आर्थिक दृष्टीने परवडत नाही, त्यांच्यासाठी इंटरनेटवर आधारित शैक्षणिक संधी उपयुक्त ठरतील, पण शिकवण्यासाठी किंवा स्पर्धात्मक परीक्षांना तोंड देण्यासाठी आॅनलाइन शिक्षण हे व्यक्तिसाक्षेप करता येईल का, याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे शिक्षण पद्धतीत अपेक्षित बदल घडून येऊ शकेल.डॉ. एस. एस. मंठा( लेखक माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू )