जैन धर्माने वाढवावा विश्वशांतीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 05:10 AM2019-10-19T05:10:28+5:302019-10-19T05:11:33+5:30

विजयकुमार चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंसाचार आणि दहशतवाद जितक्या जवळून अनुभवला आणि त्याची किंमत मोजली, तेवढी या देशात खूप कमी कुटुंबांनी मोजली असेल.

The path of world peace should be increased by Jainism | जैन धर्माने वाढवावा विश्वशांतीचा मार्ग

जैन धर्माने वाढवावा विश्वशांतीचा मार्ग

Next

काही दिवसांपूर्वी पंजाब केसरी वृत्तपत्र समूहाचे सर्वेसर्वा विजयकुमार चोप्रा पुण्यात एका कार्यक्र मासाठी आले होते. तेव्हा म्हणाले की, जैन धर्माचे आचार्य शिवमुनी पंजाबच्याच फरीदकोटचे आहेत. ते पंजाबी तर आहेतच. मात्र, केवळ जैन धर्मीयच नाहीत, तर जगभरच्या शांतता, अहिंसा या तत्त्वांवर विश्वास असणाऱ्या सर्व धर्मियांमध्ये त्यांचा मोठा सन्मान आहे. त्यांना भेटले पाहिजे. फाळणीची सर्वात जास्त झळ पंजाब आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना बसली. मात्र, कोठेही गेलो, तेथे धर्म वेगळा जरी असला, तरी भाषा एकत्र आणण्याचे माध्यम आहे, याची जाणीव झाली. आम्ही पंजाबी असलेल्या आचार्य सम्राट शिवमुनी यांची पुण्यात चातुर्मासस्थळी प्रत्यक्ष भेट घेतली.


विजयकुमार चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंसाचार आणि दहशतवाद जितक्या जवळून अनुभवला आणि त्याची किंमत मोजली, तेवढी या देशात खूप कमी कुटुंबांनी मोजली असेल. वडील लाला जगतनारायण, भाऊ रमेशचंद्र यांच्यासह या समूहाचे साठपेक्षा अधिक लोक दहशतवाद्यांकडून मारले गेले. ज्यांनी रक्ताचे पाट वाहताना पाहिले, बॉम्बस्फोटापासून गोळीबाराच्या आवाजात आणि बातम्यांमध्ये ज्यांचा दिनक्रम आजही सुरू होतो, ज्यांनी आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना हिंसाचाराचे बळी ठरताना पाहिले, त्यांच्या मनात हे युद्ध आणि संघर्ष पाकिस्तानला धडा शिकवेपर्यंत नेहमी चालला पाहिजे, अशी भावना असेल, असे मला वाटायचे आणि अशी भावना असणे ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. मात्र, एकीकडे दहशतवादाविरोधात भूमिका घेताना शहीद रमेशचंद्र यांनी स्थापन केलेल्या शहीद परिवार फंडद्वारा विजयकुमार चोप्रा यांनी हजारो परिवारांचे, विधवांचे आणि अनाथांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न केले.


विजयकुमार चोप्रा आणि आचार्य शिवमुनी यांची बराच वेळ चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा हे आचार्य शिवमुनी यांचे आशीर्वाद घ्यायला आले होते. त्याचा धागा पकडून विजयजी म्हणाले की, त्यांना आणि पंतप्रधानांना आता फक्त तुमच्यासारखे संतच काही सांगू शकतील. द्वेष आणि शत्रुत्व कायमस्वरूपी असू नये. सध्या एकूणच जगामध्ये महत्त्वाचे देश दहशतवादाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत, ती घेतलीच पाहिजे. मात्र, हळूहळू ती भूमिका दहशतवादाच्या विरोधात न राहता, विविध धर्म आणि जातींच्या विरोधात होऊ लागली आहे, हे मात्र काळजी वाटावी असेच आहे. ३४0 वे कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती किंवा या प्रश्नावरून पाकिस्तानात निर्माण झालेली परिस्थिती, एनआरसीच्या मुद्द्यावरून आसामात निर्माण झालेली परिस्थिती आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न अशा विषयांकडे पाहताना एक वेगळीच अस्वस्थता देशात आहे. नक्की आपण कोणत्या
दिशेने चाललो आहोत? याच्यातून आपण जगातल्या शस्त्रांत्रांच्या व्यापाऱ्यांच्या हातात तर जाणार नाही ना?


आम्ही जगाला बुद्ध दिला आहे आणि आम्हाला युद्ध नको, असे पंतप्रधान जाहीरपणे म्हणतात. मात्र, त्याच वेळी हा नवा भारत आहे. घुसून मारेल, अशीही घोषणा करतात. देश चालविताना सामर्थ्यवान राहावेच लागते. मात्र, युद्ध अथवा प्रतिशोध हे सरकारचे धोरण होऊ नये, यासाठी जैन धर्मीयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण शांतता आणि विकासाची भूमिका मांडणाºया जैन तत्त्वज्ञानाला सर्व धर्मीयांमध्ये मान्यता आहे, असे जेव्हा विजयकुमार चोप्रा म्हणाले, तेव्हा आचार्य शिवमुनी महाराज उत्तरले, खरेच ही आज जगाची गरज आहे. मात्र, यासाठी माध्यमांनीही पुढाकार घ्यायला हवा. यावर वृत्तपत्रसृष्टीचे भीष्माचार्य समजले जाणारे विजयकुमार चोप्रा यांनी सद्यस्थितीत माध्यमांना अशा भूमिका घेणे अवघड असल्यानेच, जैन धर्मीयांनी विशेषत: जैनांमधील सर्व गटतटांनी व संतांनी ठामपणे आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत, असे सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘जैन धर्म हा देशाच्या आणि जगाच्या राजकारणावर, तसेच अर्थकारणावर प्रभाव टाकणारा आहे. त्याच वेळी वैदिक धर्माच्या अथवा इतर कुठल्याही धर्माच्या विरोधात न जाता आपल्या धर्मातील विश्वशांतीच्या मूळ तत्त्वाची जपणूक करीत जैन धर्मीयांनी आपली वाटचाल केली आहे.’ आज अर्थव्यवस्था संकटाकडे वाटचाल करीत आहे. उद्योगधंदे मोडकळीस येत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. अशा काळात समन्वयाची भूमिका मांडणाºया शक्ती शिल्लक राहिलेल्या नाहीत. समाजासाठी समर्पितपणे काम करण्याची भावना जैनांच्या रक्तातच आहे. मी माझ्या पंजाबमधील अनुभवानंतर सांगतो की, या देशातील सौहार्द, शांतता आणि बंधुभाव टिकला असेल, तर त्यात जैन धर्मीयांचे सर्वात मोठे योगदान आहे.


विजयकुमार चोप्रा यांची जैन धर्माचे श्वेतांबर स्थानकवासी आचार्य शिवमुनी यांच्याशी झालेली चर्चा आणि बैठक म्हणजे केवळ विश्वशांतीचा इव्हेंट नव्हता. आज भारतात जागतिक शांततेसाठी दरमहा दोनशेहून अधिक इव्हेंट होतात, पण अशा इव्हेंटमधून शांतता निर्माण होत नसते. आता शांततेच्या विचारांची पुन्हा एक वैश्विक चळवळ होणे आवश्यक आहे आणि ती क्षमता जैन धर्मीयांमध्ये निश्चित आहे. म्हणूनच जागतिक शांततेसाठी जैन धर्मीयांनी सर्व धर्मीयांना सोबत घेऊन घेतलेला पुढाकार हा बुद्ध आणि महावीरांच्या देशाने जगाला पुन्हा एकदा दिलेली देणगीच ठरणार आहे. ही देणगी दुर्बलतेचे नाही, तर सामर्थ्याचे प्रतीक असेल.


- संजय नहार
संस्थापक अध्यक्ष, सरहद

Web Title: The path of world peace should be increased by Jainism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.