शांतता...नाटक चालू आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:15 PM2018-05-18T23:15:13+5:302018-05-18T23:15:13+5:30
कर्नाटकातील महानाट्य अजून संपले नाही. नाटकाचा पहिल्या अंकात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपले हात...
- दिलीप तिखिले
कर्नाटकातील महानाट्य अजून संपले नाही. नाटकाचा पहिल्या अंकात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपले हात...सॉरी तोंड धुवून घेतले. यांनतर दुसरा अंक सुरू झाला तो निकालानंतर. या अंकाचे हिरो होते कनार्टकचे राज्यपाल वजुभाई वाला. विशेष म्हणजे खलनायकही तेच होते.
या अंकाचा पडदा उठण्यापूर्वीच त्याची दिल्ली दरबारी लिहिलेली स्क्रीप्ट आमच्या हाती पडली. ती अशी होती...
‘नायक नही खलनायक हू मैं’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर पडदा उठतो...
स्टेजवर राज्यापालांचे केबीन. वजुभाई आपल्या आसनावर चिंतीत मुद्रेने बसलेले. तेवढ्यात शिपाई धावत येतो...सर...वो अपने लोक आये है...
येडियुरप्पा अॅण्ड कंपनी आत प्रवेश करतात.
येडियुरप्पा : उद्या १७ तारीख. एक चिठ्ठी पुढे करीत...हे घ्या १०४ आमदार. उद्या शपथ घ्यायची आहे.
राज्यपाल : आणखी आठ कुठायंत...! ते कोठून आणणार?
येडियुरप्पा : फिकीर नॉट, आणू की? अमितभाई त्यासाठीच तर येत आहेत. १५ दिवसांचा वेळ द्या!
राज्यपाल : १५ दिवस...?
येडियुरप्पा : वजुभाई.. आमदार फोडायचे आहेत. ते एव्हाना कुठल्यातरी गुहेत लपले असतील. त्यांना शोधायचे आहे. मग पैशाचीही व्यवस्था करावी लागेल. प्रत्येकाला १०० कोटी तरी द्यावे लागतील. मागे प्रचारात पैसा ओतला तेव्हा संपूर्ण देशातील एटीएममध्ये दोन दिवस ठणठणाट होता. पब्लिक ओरडत होती.
राज्यपाल काही बोलणार तेवढ्यात फोनची रिंग वाजते. पलीकडून काही सूचना मिळतात. राज्यपाल ओके म्हणून फोन खाली ठेवतात.
राज्यपाल : अच्छा येदीजी... दिले १५ दिवस. उद्याच्या शपथविधीची तयारी करा.
थोडा वेळ जात नाही तोच शिपाई येतो. सर..उनके लोग आये है!
कुमारस्वामी आणि सहकारी आत येतात.
कुमारस्वामी : सर, हे आमचे ११७ आमदार. आम्ही सरकार स्थापन करू.
राज्यपाल काही बोलणार तेवढ्यात पुन्हा फोन. तिकडून काहीतरी विचारणा झाली. राज्पालांचे उत्तर...हो... १५ दिवसांचा दिला.
हो... आठ आणायचे आहेत ...फोन बंद.
राज्यपाल कुमारस्वामीकडे वळून..चहा घेणार?
कुमारस्वामी : (संशयाने) फोन कुणाचा होता?
राज्यपाल : चायवाला का!
चायवाला म्हणताच, समोरच्यांनी कान टवकारले. सिच्यूएशन पाहून राज्यपालांनीच मग खुलासा केला. चायवाला म्हणजे, आमचा तो कोपऱ्यावरचा टपरीवाला. चहा आणायचा का म्हणून विचारत होता.
कुमारस्वामी : (संशय कायम) ‘१५ दिवसांचा दिला’ असे का म्हणालात तुम्ही?
राज्यपाल : अरे...ते आम्ही चहावाल्याला दर १५ दिवसांनी पैसे देतो ना! तो पैसा दिला.
कुमारस्वामी : अन् ‘आठ आणायचे म्हणजे?’
राज्यपाल : अरे बाबांनो...८ चहा आणायला सांगितले. बरं आता तुमची ती चिठ्ठी द्या, चहा घ्या आणि निघा.
कुमारस्वामी शंकित मनानेच बाहेर पडले.
दुसºया दिवशी शंका खरी ठरली. काँग्रेसचा एक नेता म्हणाला. काल वजुभार्इंनी आपल्याला मामा बनविले. तो फोन चायवाल्याचा होता, पण तो कोपºयावरचा नक्कीच नव्हता. आणि ‘१५ दिवसाचा’ पैसा नाही तर येडियुरप्पांना तेवढा वेळ दिला. आठचा अर्थ आठ चहा नव्हे तर तेवढे आमदार फोडायचे असा होता.
वजुभाई वस्ताद निघाले. गुजराचेच ना ते! बरं झाले...तेथे त्यांची चहाची टपरी नव्हती. नाहीतर आज त्यांचीच ‘मनकी बात’ लोकांना ऐकावी लागली असती. तशाही स्थितीत कसंनुसं का होईना सर्वांना हसू फुटले.