वेध - परीक्षेचा हंगाम
By admin | Published: March 29, 2017 12:51 AM2017-03-29T00:51:36+5:302017-03-29T00:51:36+5:30
गावागावात कॉपीची कंत्राटे घेणारे टोळभैरव आणि त्यांच्या कच्छपी लागलेली शिक्षण यंत्रणा यांनी शिक्षण आणि ज्ञान यांची दिवाळखोरी काढली
गावागावात कॉपीची कंत्राटे घेणारे टोळभैरव आणि त्यांच्या कच्छपी लागलेली शिक्षण यंत्रणा यांनी शिक्षण आणि ज्ञान यांची दिवाळखोरी काढली. त्याची एवढी दहशत की प्रामाणिक शिक्षक एक तर परीक्षेचे कामच स्वीकारत नाही आणि कॉपी पकडण्याचे धारिष्ट्य करीत नाही.
परवा सहज मित्राच्या दुकानात गप्पा छाटत बसलो होतो. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वातानुकूलित यंत्रे, कूलर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तंूची त्याची ही मोठी शोरूम आहे. तो पक्का व्यापारी असला तरी सामाजिक बांधीलकी वगैरे मानणाऱ्यांपैकी असल्याने सेन्सेबल गप्पा मारतो. तर त्यावेळी एक गृहस्थ तेथे आले. त्यांना पाहताच ‘या गुरुजी’ असे म्हणत मित्राने त्यांचे स्वागत केले. स्थिरस्थावर झाल्यानंतर मित्र म्हणाला, ‘गुरुजी काय म्हणतो हंगाम’ त्यावर ते उत्तरले ‘चांगलाच आहे’ जरा यंदा एअरकंडिशनर खरेदी करायची कुटुंबाची इच्छा आहे. म्हटलं हंगाम चांगला तर होऊन जाऊ दे’. पुढे त्यांचे व्यवहारी बोलणे झाले आणि चांगल्या प्रतीचे, जबर किमतीचे ते वातानुकूलित यंत्र गुरुजींनी खरेदी केले. आजच संध्याकाळपर्यंत बसवा. शाळेहून परत येईपर्यंत सुरू करा, असे बोलत ते निघून गेले. पुन्हा आमच्या गप्पांचा सिलसिला सुरू होताच. मी त्याला प्रश्न केला की कसला हंगाम बुवा गुरुजींचा; काही शेती वगैरे करता वाटते? त्यावर तो हसला आणि म्हणाला शेतीचा नाही बाबा परीक्षेचा हंगाम. शेतीच्या उत्पन्नात एअरकंडिशनर खरेदी करणारा शेतकरी तू तरी पाहिला का? गुरुजी एका परीक्षा केंद्रावर प्रमुख आहेत आणि दरवर्षी असतात. कॉपी करू देण्यासाठी काही केंद्र प्रसिद्ध आहेत. अशाच ठिकाणी त्यांची नियुक्ती होते. तेथे दर ठरलेला असतो. त्यातून जी वरकमाई होते तो या गुरुजींचा हंगाम. मित्र बोलत होता, पण माझे लक्ष नव्हते. माझ्या डोळ्यापुढे दहावी, बारावीच्या परीक्षा, परीक्षा केंद्राभोवती पडलेला गराडा. कॉप्यांचा सुकाळ, भरारी पथकांचा देखावा हे चित्र उभे राहिले. बातम्या छापल्यानंतरही त्यातील फोलपणा जाणवला.
मराठवाड्यात सगळीकडे सध्या हेच चित्र आहे. परीक्षा दहावीची असो की पदव्युत्तर. कॉपी हे सर्वत्र समान सूत्र आहे. औरंगाबाद शहराजवळील एका तालुक्याच्या ठिकाणी असलेले महाविद्यालय तर यासाठी राज्यभर ओळखले जाते. अगदी भंडारा, चंद्रपूरपासून ते सावंतवाडीपर्यंत त्याची ‘कीर्ती’ पसरल्याने तेथील विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. औरंगाबादमध्ये शिकणारी मुलेही हेच परीक्षा केंद्र निवडतात. या महाविद्यालयाच्या दर्जाविषयी कोठे ऐकिवात नाही; पण परीक्षा केंद्र म्हणून ते मशहूर आहे; पण असे का, असा प्रश्न विद्यापीठाला कधी पडला नाही.
परीक्षेत कॉपी ही मराठवाड्यात सहज आणि सर्वत्र आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कुलगुरु, अधिकारी यापैकी कोणालाही वैषम्य वाटत नाही. एवढा बेशरमपणा या यंत्रणेत शिगोशिग भरला आहे. ज्यांनी कॉपी रोखायला पाहिजे तेच दिवसाढवळ्या त्याला प्रोत्साहन देऊन तुंबड्या भरत असतील तर यंत्रणा सडायला किती वेळ लागणार? मराठवाड्यात यंत्रणा नावाची गोष्टच शिल्लक नाही. तर सडणार काय? परीक्षा पाहणे हा त्यांच्यासाठी मनस्ताप असतो. यामुळे शिक्षणाचे मातेरे झाले; पण याची काळजी कोणी करावी हाच प्रश्न आहे. एखादा अधिकारी कारवाई करतो, पण ते तेवढ्यापुरतेच. यामुळेच परीक्षेचा काळ ऐवजी हंगाम बनला आहे. जशी थंड हवेची ठिकाणं तशी मुक्त कॉपी केंद्र ठिकठिकाणी उगवली आहेत. केंद्र निवडणे, तेथील कडक शिस्तीची शिक्षक मंडळी या प्रक्रियेपासून दूर ठेवणे, आपल्या सोयीची माणसे निवडणे हे सारे बिनदिक्कत चालते.
२०१०-११ मध्ये मराठवाड्यात कॉपीमुक्त अभियान राबविले होते. तत्कालीन विभागीय आयुक्त भास्कर मुंडेसारख्या संवेदनशील अधिकाऱ्याने ते राबविले आणि संपूर्ण महसूल यंत्रणेला कामाला लावले. श्रीकर परदेशी हे तेव्हा नांदेडचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी हे अभियान धडकपणे राबविले आणि कॉपीला आळा घातला. मराठवाड्यात अभियान पुढची तीन वर्षे यशस्वी ठरली. मराठवाडा कॉपीमुक्त झाला होता. पुढे अधिकारी बदलले, मुंडेही निवृत्त झाले आणि मराठवाडा पूर्व वळणावर पुन्हा आला. आता त्याचे कोणाला काही देणे-घेणे नाही. परीक्षा उरकल्या जातात, निकाल लावले जातात. पुन्हा तोच खेळ सुरू झाला आहे; मराठवाडा कॉपीयुक्त बनला आहे.
- सुधीर महाजन