पेट्रोल भडक्याचा ट्रोल !
By सचिन जवळकोटे | Published: May 24, 2018 12:50 AM2018-05-24T00:50:48+5:302018-05-24T12:44:16+5:30
पेट्रोल वाचविण्याच्या नादात उतारावर बंद केलेली गाडी खांबाला धडकल्यानं पिंट्याचा पाय लचकलेला.
पेट्रोल वाचविण्याच्या नादात उतारावर बंद केलेली गाडी खांबाला धडकल्यानं पिंट्याचा पाय लचकलेला. घरी विश्रांती घेत असतानाही त्याला पेट्रोलच्या महागाईचीच चिंता लागलेली. त्याच तिरीमिरीत त्यानं अंगावरची चादर झटकत एकेका नेत्याची भेट घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नारायणदादांना गाठलं, ‘दादाऽऽ पेट्रोलचे भाव कधी कमी होणार? या प्रश्नावर दादा भलतेच गोंधळले. गेल्या दोन वर्षांत ‘तुम्ही मंत्री कधी होणार?’ या प्रश्नावरही कधी दचकले नसतील तेवढा विचित्र चेहरा त्यांचा झाला. ‘आम्हीच गॅसवर,’ या त्यांच्या उत्तरातून नेमका कोणता अर्थ काढावा, हे पिंट्याला समजलं नाही. सध्याच्या ‘सत्ता टंचाई’त बहुधा त्यांची गाडी ‘सीएनजी’वर चालत असेल, अशी भाबडी समजूत करून घेऊन पिंट्या सोलापूरच्या सुभाषबापूंकडं गेला. मात्र, त्यांच्या लाडक्या अविनाशनं त्याला बाहेरच थांबवलं. ‘बापू आतमध्ये कारवाईचा अभ्यास करताहेत,’ असं सांगितलं जाताच पिंट्या हसला. ‘कारवाई नेमकी कोणती? बापूंच्या लोकमंगलवर झालेली कारवाई की बापूंनी मार्केट कमिटीवर केलेली कारवाई...’ असा प्रतिप्रश्न करत पिंट्या बारामतीकडं गेला.
बंगल्यात थोरले काका बारामतीकर आरशासमोर उभारून शर्टाची कॉलर उडवायची प्रॅक्टिस करीत होते. त्यांना पेट्रोलबद्दल विचारताच त्यांनी पार्टीचा व्हॉटस्अॅप ग्रुप दाखविला. त्यातला एक मॅसेज सर्वत्र गराऽऽगरा फिरविला जात होता. ‘मोठ्या साहेबांची चाणक्यनीती. त्यांच्या मध्यस्थीमुळं मंगळावरचं पेट्रोल व्हाया चंद्रावरून भारतात आणलं जाणार. साहेबांच्या दूरदृष्टीमुळंच पेट्रोलचे दर कमी होणार,’ हा मेसेज वाचताच घाम पुसत पिंट्या साताऱ्याकडं गेला. मात्र, तिथं नेहमीप्रमाणं थोरले राजे भेटलेच नाहीत. त्यांच्या म्हणे मुंबईत देवेंद्रपंतांसोबत बैठकांवर बैठका झडत होत्या. ‘एकवेळ पेट्रोलचे दर कमी होतील की नाही, हे आम्ही सांगू शकतो; पण साताºयाचे राजे हातात घड्याळ बांधणार की कमळाचं फूल घेणार, हे ब्रह्मदेवही सांगू नाही शकत.’ असा दावा खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला.
पिंट्या देवेंद्रपंतांकडं गेला. ते कुणाशी तर मोबाईलवर बोलत होते. ‘भविष्यात महाराष्टÑातही कर्नाटकसारखीच परिस्थिती उद्भवल्यास किती आमदार कसे गोळा करावे लागतील,’ या विषयावर पंत बोलत असल्याचं पिंट्याच्या लक्षात आलं. तिकडचा आवाजही पिंट्यानं बरोबर ओळखला. चक्क रायगडातल्या सुनीलभाऊंचा तो आवाज होता. ‘मातोश्री’वर ‘कुमारस्वामी’ निर्माण व्हायला नको, म्हणून आत्ताच्या विधान परिषदेपासूनच पंतांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं पिंट्याच्या लक्षात आलं.
अखेर पिंट्या अमितभार्इंना भेटायला गुजरातेत गेला. ‘ओ भैऽऽ पेट्रोल के भाव कब पडेेंंगे?’ असं मोडक्या-तिडक्या हिंदीत विचारताच भाई एका वाक्यात उत्तरले, ‘इलेक्शन कमिशनर को पुछना पडेगा,’ गोेंधळलेला पिंट्या पुटपुटतच बाहेर पडला. ‘आता पेट्रोल दराचा अन् निवडणुकांचा काय संबंध?’ एवढ्यात त्याला कुणीतरी गदागदा हलवलं. ‘अरे ये पिंट्याऽऽ उठ की झोपेतून. स्वप्नात कसलं पेट्रोल स्वस्त होणार म्हणून बडबडतोय? आजचा पेपर बघ. पेट्रोलचे दर अजून दोन रुपयांनी वाढलेत.’