अस्सल मातीतली कविता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 03:48 AM2018-04-15T03:48:47+5:302018-04-15T03:48:47+5:30
१९३४ मध्ये उत्तर प्रदेशात जन्मलेले केदारनाथ सिंह हे हिंदीतले महत्त्वाचे कवी तर आहेतच, पण भारतीय भाषांच्या पातळीवरचे हे गौरवास्पद नाव आहे. नुकतेच त्यांचे निधन झाले, पण या कवीची कविता कालातीत आहे. त्यांच्याविषयी या आठवणी...
- डॉ. वीणा सानेकर
१९३४ मध्ये उत्तर प्रदेशात जन्मलेले केदारनाथ सिंह हे हिंदीतले महत्त्वाचे कवी तर आहेतच, पण भारतीय भाषांच्या पातळीवरचे हे गौरवास्पद नाव आहे. नुकतेच त्यांचे निधन झाले, पण या कवीची कविता कालातीत आहे. त्यांच्याविषयी या आठवणी...
मी परततो तुझ्यात
जेव्हा गप्प राहता...राहता थकून जाते
माझी जीभ
आणि दुखू लागतो माझा आत्मा
असे आपल्या भाषेला साद घालत म्हणणारा केदारनाथांसारखा कवी, मायभाषेवर प्रेम करणाऱ्या कुणालाही आपलासा वाटेल.
केदारनाथ सिंहांची कविता मातीची नि अस्सल देशी वाणाची कविता आहे. जगरनाथ या कवितेत एका बालमित्राशी संवाद आहे. खूप वर्षांनी झालेली त्या मित्राची भेट कवीला व्याकूळ करते. नायक आस्थेने त्याची चौकशी करतो आहे. त्याची बकरी ज्या निंबाच्या झाडाला बांधलेली असायची, त्या निंबाच्या झाडाविषयी प्रेमाने विचारतो आहे. आंब्याचा गंध, पाऊसपाण्याची चौकशी अशा बारीकसारीक गोष्टींबद्दल तो हळवेपणाने बोलतो, पण त्यावर जगरनाथ काहीच उत्तर देत नाही. आपल्या बोलण्यातून जगरनाथला खोट्याचा गंध येतो आहे का? असा प्रश्न नायकाला पडतो. मात्र, जगरनाथ कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता सरळ निघून जातो, तो अजिबात मागे वळून पाहात नाही. या कवितेत केवळ एकतर्फी संवाद आहे. या संवादात आपलं गाव, आपलं बालपण हातातून सुटत चालल्याची जाणीव आहे. शहरात गेलेल्या माणसांपासून गावातली माणसं कशी तुटत जातात, याचं अतिशय हृद्य चित्र या कवितेत उमटलं आहे. शहरात राहणारा केदारनाथांच्या कवितांचा नायक सतत खूप काही हरवल्याची जाणीव व्यक्त करतो, शहरातही तो गावातल्या खुणा शोधत राहतो. कधीतरी आकाशात एखादा परिचित हिरवा पिवळा पक्षी उडताना दिसला, तरी त्याचं मन शांत होतं.
यहां तक आते आते
मैं बहुत कुछ भूल चुका हूं
बहुत कुछ जिसे याद रखना
बहुत जरूरी था
असे म्हणणारा हा कवी खरे तर छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो.
शहरात आल्यानंतरही आपल्या अस्तित्वाशी जोडला गेलेला गाव कवीला महत्त्वाचा वाटतो. या दृष्टीने ‘कालीसदरी’ ही कविता मुळातूनच वाचायला हवी. केदारनाथ या कवितेत म्हणतात, खूप वर्षांआधी या महानगरात मी पहिल्यांदा आलो, तेव्हा माझ्या शरीरावर एक फाटकं जाकीट होतं, जे गावातल्या म्हाताºया शिंप्याने शिवलं होतं. त्याला एक छोटा खिसा होता, जो मक्याच्या दाण्यांच्या गंधाने भरलेला होता. तो गंध अनेक दिवस परक्या महानगरात कवीबरोबर राहिला आहे. तिथल्या बाजारातून खरेदी केलेल्या चपलांनी दीर्घकाळ त्याला सोबत केली आहे आणि त्याच्या सफेद कुर्त्यावरच्या काळ्या जाकिटात अडकलेली त्याच्या गावातली धूळ सांभाळून ठेवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण ती हळूहळू केव्हा घरंगळत गेली, त्याला कळलेच नाही.
मैंने बहुत कोशिश की
...कि वह जरासी धूल बची रहे महानगर में, पर पता नहीं कैसे
धीरे धीरे उतरती रही वह
उतरती रही मेरी पहचान धीरे... धीरे
गावातली ती माती ही त्याची ओळख होती. ती शहरात हळूहळू पुसली गेली. गावी परतताना कोणती भेट न्यावी, या विचाराने कवी जवळचाच मॉल तासन्तास पालथा घालतो, पण त्याला नेण्यायोग्य काहीच सापडत नाही. मग त्याला वाटतं की, तो गावातली ती धूळ तर वाचवू शकला नाही, पण तेच जीर्ण झालेलं जाकीट घालून तो गावी परतेल एकदा नि याहून चांगली भेट असूच शकणार नाही. राज कपूरच्या चित्रपटातला राजू ‘श्री ४२०’ मध्ये जे जुने कपडे घालून शहरात आला होता, त्याच कपड्यांनिशी परत गावाची वाट धरतो, त्या दृश्याची मला आठवण झाली. केदारनाथ सिंह हा कवी सतत आपल्या मुळांकडे जाण्याकरिता आसुसलेला आहे.
छोट्या-छोट्या गोष्टी जपल्या पाहिजेत, असं कवीला वाटते. यातूनच या ओळी येतात,
कच्चा बांस कभी काटना मत
नहीं तो सारी बांसुरीया
हो जायेगी बेसुरी
एक जो मिला था राहों में
हैरान परेशान
उसकी पूछती हुई आंखें भूलना मत
नहीं तो सांझ का तारा
भटक जायेगा रास्ता....
अस्वस्थ माणसांचे डोळे नि ते...ते सारंच जे कोवळं, नाजूक आहे, ते कवीला विसरता येत नाही. निसर्गातल्या छोट्या-छोट्या गोष्टी जशा त्याला जपून ठेवायच्या आहेत, तशी मानवी नातेसंबंधातली बांधीलकीही कवीला मौल्यवान वाटते.
किसी को प्यार करना
तो चाहे चले जाना
सात समुंदर पार
पर भूलना मत
कि तुम्हारी देहने एक देहका नमक खाया है
मिठाला जागणं जितकं आवश्यक, तितक्या सच्चेपणानं प्रेमाचं नातं निभावलं पाहिजे, ही नातेसंबंधातली कमिटमेंट या ओळींतून सूचित होते.
ही मुळांची ओढ इतकी तीव्र आहे की, ती त्याला निर्जीव वस्तूंच्या ठिकाणीही दिसते. घरात शिरल्या-शिरल्या बिछाना कापसामध्ये परत शिरण्याची इच्छा व्यक्त करतो. खुर्ची नि टेबलाला त्यांची मूळ झाडं आठवतात...ती म्हणतात,
हमें बेतरह याद आ रहे हैं हमारे पेड
और उनके भीतरका वह जिंदा द्रव
जिसकी हत्या कर दी आपने
कपाटातली पुस्तकेही ओरडून ओरडून विद्रोह करतात,
खोल दो, हमें खोल दो
हम जाना चाहती हैं
अपने बांसके जंगल...
माणसांचा तुरुंग जणू झाडांकरिता परक्या शहरासारखा नि त्यांना मुक्त व्हायचंय, परत अस्तित्वाच्या गाभ्यात शिरायचंय.
वस्तू नि पशुपक्ष्यांच्या लहान...मोठ्या हालचालींचा अर्थ जाणून, या कवीच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे नांगर ओढून थकून गेलेले बैल नि त्यांच्या खांद्यांमध्ये साठलेला वर्षानुवर्षांचा थकवा कवीला वाचता येतो. ते जणू पुन्हा उठतील, अशी आशा बाळगणाºया, त्यांना टक लावून पाहणाºया कुत्र्याचे डोळेही त्याला विसरता येत नाहीत. एखाद्या जुनाट वृक्षाच्या सालीखालच्या दबलेल्या कहाण्या त्याला जाणून घ्यायच्या आहेत. स्थलांतरित पक्ष्याला पाहून तो हरखतो, पण त्याचे नाव आठवत नाही म्हणून हिरमुसतो, त्याचं नाव आपण विसरलो, या विचाराने आत कुठेतरी तो घाबरुन जातो. शहरातली पक्ष्याची ‘वापसी’ त्याला भर रस्त्यात हेलावून टाकते आणि माणसांचे चेहरे तर कायम त्याच्या स्मरणात राहतात. किंबहुना, ते कवीचा पाठलाग करतात.
जिवंत चेहरे सामावून घेणारी केदारनाथ सिंहाची कविता माणसांविषयीची असोशी व्यक्त करते. एका नदीकाठी पाहिलेल्या म्हाताºया मेंढपाळाचा. चेहरा त्यांच्या एका कवितेत उमटला आहे. त्याच्या चेहºयावर सुरकुत्यांचे जाळे कवीला लख्ख आठवते आहे आणि हेही आठवते आहे की, त्याच्या चेहºयावरील सुरकुत्यांमध्ये एक चिमणी घरटं बांधू शकेल, अशी जागा होती. हा चेहरा किती निकट आहे, हे सांगताना केदारनाथ म्हणतात,
मेरे संग संग चला आया
पानी और कीचडसमेत वह जिन्दा
चेहरा.....
जिससे इतने बरस बाद भी
मेरे अंदर बुंदे टपक रही है
कुठे-कुठे भेटलेल्या अशा माणसांचे जिवंत चेहरे घेऊन फिरत राहणे सोपे नाही, पण केदारनाथ त्यांच्या उदासी... अस्वस्थतेसकट, त्यांच्या असण्याच्या उबेसकट त्यांना लक्षात ठेवतात.
माणसाचा हात हातात असण्याचे म्हणूनच त्यांना अप्रूप वाटते. ते म्हणतात,
उसका हाथ अपने हाथ में लेते हुए मैंने सोचा
दुनिया को हाथकी तरह गर्म और सुंदर होना चाहिए
माणूसपणाच्या नितळ स्पर्शाचा असा शोध हे केदारनाथ सिंह यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. विशेषत: आताच्या भोवतालात या शोधाचं महत्त्व मोठे आहे. केदारनाथ या काळाला ‘बाजारों का समय’ असे म्हणतात. या काळात कविताही पणाला लागली आहे. लिहून फार काही घडणार नाही, या काळात असे वाटावे इतके आजचे वास्तव कठोर असले, तरी आपल्या शब्दांच्या पूर्ण ताकदीनिशी माणसांबद्दल लिहीत राहिले पाहिजे, हा विश्वास त्यांची कविता व्यक्त करते.