- धर्मराज हल्लाळेहोला महल्ला निमित्त नांदेडमध्ये आयोजित सोहळ्यात परवानगीची सीमा ओलांडून काही तरुणांनी पोलिसांवर केलेला हल्ला निषेधार्ह आहे. परंतु, घटनेची दुसरी बाजू पोलिसांचा आणि शीख बांधवांचा संयम दाखविणारी आहे. कोरोनामुळे सबंध जनजीवन विस्कळीत झाले आहे. अधूनमधून व्यापार, रोजगारावर येणारी बंधने आणि संचारावरील मर्यादेमुळे अशा कोणत्या तरी प्रसंगात तरुणांचा उद्रेक होत आहे की काय, असा प्रश्न पडतो. नांदेडमध्ये होला महल्ला, दसरा महल्ला, दिवाळी महल्ला असे उत्सव शीख बांधव साजरा करतात. नगर कीर्तन, अरदास (प्रार्थना) झाल्यानंतर शहरातील महावीर स्तंभापासून दोनशे मीटरपर्यंत शीख बांधव शस्त्र घेऊन जातात. हे सर्व प्रतीकात्मक असते. सुमारे तीनशे वर्षांची ही उज्ज्वल परंपरा आहे. त्यामध्ये सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. देश-विदेशातून भाविक येतात. निश्चितच कोरोनामुळे सर्वच सोहळ्यांवर मर्यादा आल्या. त्या परिस्थितीची समाजातील सुजाण नागरिकांना जाणीवही आहे. ते प्रशासनाच्या सोबत आहेत. त्यामुळेच होला महल्ला परिसराबाहेर होणार नाही, याबद्दल सहमती होती. घटनेदिवशी महिला, लहान मुले आणि परगावातील भाविक उपस्थित होते. त्याचवेळी पाच-पन्नास जणांनी सुरक्षा कडे भेदून पोलिसांची वाहने आणि पोलीस जवानांनाच लक्ष्य केले. मात्र जमेची आणि चांगली बाजू म्हणजे धार्मिक उत्सवात सहभागी झालेल्या बहुतांश बांधवांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य केले. किंबहुना कायदा हातात घेणाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर हल्ले झाले. त्यांच्या वाहनांची नासधूस झाली. परंतु, लाठीचार्ज वा साधा अश्रुधुराचाही वापर पोलिसांनी केला नाही. बहुतांश समाज बांधवांचे सहकार्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या संयमामुळे काही मिनिटांतच सर्वकाही पूर्वपदावर आले. नांदेडमधील घटनेचे जे वाहिन्यांवर चित्रीकरण दिसले, ते काही मिनिटांचे होते. त्यात परिस्थिती आटोक्यात आणणारे हात दिसू शकले नाहीत. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत पोलिसांनी थोडाही संयम सोडला असता तर मोठा अनर्थ झाला असता. एकीकडे थरकाप उडविणारा हल्ला दिसत असताना दुसरीकडे पोलीस आणि शांतताप्रिय शीख बांधव ज्या तऱ्हेने सर्व सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत होते, त्यामुळे उद्रेक वेगळ्या वळणाला गेला नाही. जे घडले त्याचा शीख धर्मगुरु पंचप्यारे साहेबांनी व गुरुद्वारा प्रशासनाने निषेधच केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आणि जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका धर्मगुरुंनी आणि बांधवांनी घेतली आहे. याच सद्विचारांमुळे अपप्रवृत्तीवर यंत्रणेला अल्पावधीत नियंत्रण मिळविता आले. पुढे नगर कीर्तन शांततेत गेले आणि इतर कोणालाही, कोणतीही हानी झाली नाही. कोरोनामुळे प्रशासन जारी करीत असलेले निर्बंध आपल्या स्वातंत्र्यावर, परंपरेवर बंधने घालीत आहे, ही भावना काही तरुणांमध्ये निर्माण झाली अन् त्यातून असा उद्रेक घडला असावा. त्यावर संवाद हाच उपाय आहे. नांदेडच्या दुर्घटनेतून आम्ही काय शिकले पाहिजे? ही वेळ एकमेकांना साथ देण्याची आहे. जात-धर्म-पंथ, पक्ष या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना समजून घेण्याची अतिशय गरज आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. साचलेपण आले आहे. त्याला वाट मोकळी करून देणारे सण-उत्सव यावरही बंधने आहेत. त्यातूनच एकमेकांवर चालून जाण्याची वृत्ती वाढीला लागत आहे. नांदेडच्या दुर्घटनेचा संबंध धर्म आणि धार्मिकतेशी तसूभरही नाही. उद्रेकाची भावना हा सामाजिक प्रश्न आहे आणि तो सर्व समाजघटकांमध्ये आहे. त्याला कोणीही अपवाद नाही. आता त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, हा सर्वांत महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षाचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या तरुण पिढीची समाजाला गरज आहे.
नांदेडच्या दुर्घटनेत पोलिसांच्या संयमाने अनर्थ टळला !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:54 AM