आपत्ती काळात राजकीय रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 01:47 PM2020-05-08T13:47:26+5:302020-05-08T13:48:16+5:30
मिलिंद कुलकर्णी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी कोरोनाच्या आपत्तीकाळात राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. ‘कोरोना’चा सर्वाधिक प्रकोप महाराष्टÑात आहे. ...
मिलिंद कुलकर्णी
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी कोरोनाच्या आपत्तीकाळात राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. ‘कोरोना’चा सर्वाधिक प्रकोप महाराष्टÑात आहे. देशात ५५ हजार रुग्ण आहेत, त्यात महाराष्टÑाचा वाटा १८ हजार आहे. देशातील १८०० मृत्यूंपैकी महाराष्टÑात ७०० पेक्षा अधिक मृत्यू आहेत. लॉकडाऊनदरम्यान मजुरांच्या प्रश्नावर ठाम भूमिका न घेतल्याने मुंबई, पुण्यासह औद्योगिक शहरांमधील मजुरांची घरवापसी सुरु आहे. त्यामुळे उद्योग-व्यापाराचा भविष्यकाळ अंधकारमय राहील, असे चित्र आतातरी दिसत आहे. एवढ्या विपरीत परिस्थितीत महाराष्टÑात राजकीय शिमगा सुरु आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे उध्दव ठाकरे हे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, सहा महिन्यांच्या आत त्यांना सदस्य व्हावे लागणार असून मे महिन्याच्या अखेरीस ही मुदत संपणार आहे. विधान सभेच्या सदस्यांनी निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक कोरोनामुळे प्रलंबित होती. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्याच्या जागेवर ठाकरे यांची नियुक्ती केली जावी, अशी शिफारस मंत्रिमंडळाने केली. परंतु, मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा प्रसंग प्रथमच उद्भवला असल्याने संसदीय कायदे, नियम, प्रघात असा पेच उद्भवला. महिनाभर त्यावर निर्णय होत नसल्याने विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक तरी लावा, असे राज्य सरकारने राज्यपालांकडे गाºहाणे मांडले. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केल्याची चर्चा आहे. त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या. २१ मे रोजी या निवडणुका होत आहे.
कोरोनाच्या संकट काळात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच सर्व राजकीय पक्षांची इच्छा आहे. विधानसभेतील संख्या बळानुसार या ९ जागांपैकी भाजप ४, शिवसेना व राष्टÑवादी प्रत्येकी २ व काँग्रेसला एक जागा मिळू शकते. या जागांसाठी आता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. खान्देशसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. नंदुरबारचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत रघुवंशी व जळगावच्या महिला नेत्या स्मिता वाघ यांच्या विधान परिषदेच्या रिक्त जागांचा या ९ जागांमध्ये समावेश आहे. प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये राहिलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. ज्या नंदुरबारमध्ये शिवसेनेचे फारसे अस्तित्व नाही, तेथे अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघात सेना उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाला. रघुवंशी यांच्यामुळेच हा पल्ला गाठता आला. परंतु, सेनेकडे आता या निवडणुकीत दोन जागाच आहेत. एक जागा ठाकरे यांच्यासाठी तर दुसरी जागा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोºहे यांच्यासाठी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे रघुवंशी यांना प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते.
स्मिता वाघ यांना गेल्यावेळी अचानक आमदारकीची लॉटरी लागली. अमळनेर मतदारसंघासाठी त्या दोनदा इच्छुक असताना उमेदवारीने त्यांना हुलकावणी दिली. त्यांचे पती उदय वाघ यांचे चार महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झाले. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीपासून वाघ दाम्पत्याचे पक्षश्रेष्ठींशी बिनसले होते. त्यामुळे वाघ यांचे नाव आता चर्चेतदेखील नाही, हे वास्तव आहे. त्यांच्याऐवजी जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या नावाची प्राधान्याने चर्चा होत आहे. स्वत: खडसे यांनीही पक्षाकडे जाहीरपणे इच्छा बोलून दाखवली आहे. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्याप्रमाणेच खडसे यांचेही पुनर्वसन होते काय, हा भाजपसाठी कळीचा मुद्दा राहणार आहे.
राष्टÑवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनाही आमदारकीचे स्वप्न पडू लागली आहेत. त्यात माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. पक्षश्रेष्ठींनी आपला विचार करावा, असे सगळ्यांना वाटत आहे, त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. पण ज्या जिल्ह्यात गेल्या दोन निवडणुकांपासून केवळ एक आमदार निवडून येत असेल त्याठिकाणी उमेदवारी देण्यास पक्षश्रेष्ठी का तयार होतील, याचा विचार मात्र करावा लागणार आहे.