- राजा माने
साखरपट्ट्यातील राजकारण आणि डावपेच टिपेला पोहचू लागले आहे. भाजपच्या सर्व मोहिमांचे सूत्रधार चंद्रकांतदादा पवार काका-पुतण्यांच्या प्रत्येक चालीला आपल्याला दीड घर उधळणाऱ्या घोड्याच्या चालीने उत्तर देत आहेत. दादांची महादेवराव महाडिक यांचे पुत्र आ.अमल यांना मंत्रिपदाची ऑफर तर.. इकडे डॉ. डी.वाय.पाटील चक्क राष्ट्रवादीत.. तिकडे राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्यात जुंपलेली !..मग कोण कोणाला चेकमेट देणार ?दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या चार लोकसभा मतदारसंघांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लक्ष केंद्रित केले आहे. आघाडीत खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामावून घेण्यात येणार आहे. या आघाडीने सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवरील लोकसभेचे उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र सांगलीसाठी त्यांना तगडा चेहरा मिळालेला नाही. याउलट भाजपने सांगलीसाठी उमेदवारी निश्चित केली असली असली तरी उर्वरित तीन जागांवर त्यांची चाचपणीच सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले असून ते राष्ट्रवादीचे आहेत. त्यांच्या मतदारसंघात चार राष्ट्रवादीचे तर काँग्रेस एक आणि शिवसेनेचा एक असे आमदारांचे बलाबल आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी येथे भक्कम आहे. मतदारसंघनिहाय विचार केला तर बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे कार्यकर्त्यांचे केडरही भक्कम आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांचेच नाव पुढे येते. पवारांची उदयनराजेंच्या नावाला पसंती आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून जर उदयनराजेंची उमेदवारी नको हवी असेलतर त्याला पर्याय देण्याच्या अनुषंगाने पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना उमेदवार देण्याविषयी सूचित केले आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नावाचा विचार केला तरी त्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात पवार ती रिस्क घेण्यास तयार नाहीत. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाचा आग्रह आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लोकसभा लढण्यास नकार आहे. त्यामुळे उदयनराजे हेच राष्ट्रवादीसाठी अंतिम पर्याय आहेत.शिवसेनेतून नितीन बानुगडे-पाटील यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. भाजपकडून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे नाव पुढे आहे. दोन लोकसभा निवडणुका लढलेल्या आणि आता भाजपवासी असलेले पुरुषोत्तम जाधव यांनीही लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेले काही दिवस त्यांनी मतदारसंघातील संपर्क कायम ठेवत लोकांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.जागावाटपात विद्यमान लोकप्रतिनिधींना त्यांचा मतदारसंघ सोडला जातो, तसे संकेत आहेत. दक्षिण महाराष्ट्रात लोकसभेचे कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले आहेत. गेल्या वेळी राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासाठी सोडला होता. पण आता तो त्यांनी आपल्याकडे ठेवला असून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांना देण्याचे निश्चित केले आहे. तर, कोल्हापूर मतदारसंघाचे खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा आखाड्यात उतरवण्याचे ठरवले आहे.भाजप आणि शिवसेनेने गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धडक मारली. काँग्रेस आघाडीला हादरा दिला. सांगलीचा वसंतदादांचा गड भाजपने घेतला. हा काँग्रेसला मोठा धक्का होता. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले संजयकाका पाटील कमळाच्या चिन्हावर खासदार झाले. विधानसभेलाही या पक्षाला चांगला शिरकाव करता आला. कोल्हापूर जिल्ह्यात एकाच्या दोन जागा, तर सांगलीत चार जागा मिळाल्या. भाजपकडून येत्या निवडणुकीतही दक्षिण महाराष्ट्राची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर दिली जाणार आहे. शिवसेनेशी युती होणार काय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पाटील यांनी शिवसेनेसोबत टोकाचे मतभेद होणार नाहीत याची दक्षता घेतली आहे. कोल्हापूर लोकसभेला धनंजय महाडिक खासदार असतील, तर अमल महाडिक मंत्री असतील, असे सांगत भाजपची भिस्त महाडिक यांच्यावर असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. मात्र हे निमंत्रण राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार महाडिक यांनी धुडकावले नसले तरी राष्ट्रवादीतील ताज्या घडामोडींनुसार भाजपला नव्याने तयारीला लागावे लागेल असेच चित्र आहे. कारण शरद पवार यांनी महाडिक यांचे नाव जाहीर करताना तीनदा कोल्हापूर दौरा केला आहे. पवार यांनी भाजपची खेळी ओळखून धनंजय महाडिक यांचा भाजपचा मार्ग प्रयत्नपूर्वक रोखला आहे. तेथे लोकसभेला मैदानात उतरू शकेल असा उमेदवार भाजपने अजून उघड केलेला नाही. मात्र शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना राष्ट्रवादीत आणून त्यांना उमेदवारी देण्याचा महाडिक विरोधकांचा डाव फसला आहे. मंडलिक शिवसेनेचेच उमेदवार असतील, त्यांना महाडिकविरोधकांचे बळ मिळेल, असे दिसते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तरी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची महाडिक यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी दिसत नाही. चंद्रकांत पाटील यांनी पक्षबांधणी करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका काबीज केल्या. महामंडळे, समित्या, राज्यसभा अशा नियुक्त्या करत स्थानिक नेते-कार्यकर्त्यांची फौज त्यांनी तयार केली आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेतील भांडणावरच त्यांचे राजकारण चालणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने खासदार राजू शेट्टी यांच्याशी जुळवून घेतले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हातभार आघाडीला मिळेल. जनसंघर्ष यात्रा, हल्लाबोल यात्रेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या चार महिन्यांपासून निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या आणि त्यांचे प्रश्न यावर तयार झालेल्या वातावरणावर स्वार होण्याची या पक्षांची धडपड आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांचे अलीकडे वाढलेले दौरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील यांचे दौरे यातून या दोन्ही पक्षांनी गेलेल्या जागा परत मिळविण्यासाठी वर्षभरापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पवार यांनी खासदार शेट्टी, काँग्रेसचे इच्छुक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याशी चर्चा करून हातकणंगलेत शेट्टींना हिरवा कंदील दाखविला. मात्र त्यामुळे राष्ट्रवादीच्या निवेदिता माने दुखावल्या आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शेट्टी यांच्या विरोधात राष्ट्रवादीला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधलेले माने यांचे पुत्र जिल्हा परिषदेंचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांचे नाव चर्चेत आहे. हातकणंगले मतदारसंघ रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासाठी सोडला जावा असे भाजपचे प्रयत्न सुरू असून तसे झाल्यास भाजपवरही जबाबदारी येऊ शकते. सांगलीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत:चा गट मजबूत केला आहे. पक्ष संघटन करण्यापेक्षा त्यांनी स्वत:चा गट बांधण्यावरच जास्त लक्ष दिले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात आणि मोठ्या गावांत त्यांचे कार्यकर्ते दिसतात. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे सख्य नव्हते. त्यातच वालचंद महाविद्यालयाच्या मालकीवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. काही वरिष्ठ मंडळींनी आणि चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांना बळ दिल्याने संजयकाका नाराज होते. नंतर कॅबिनेट मंत्रीपदाच्या दर्जाचे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन त्यांना भाजपने खूश केले आहे. आता सिंचन योजना पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला आहे. संजयकाका पाटील यांना पक्षातच पर्याय उभा करण्यात भाजप कमी पडला. त्यामुळे सध्या भाजपला लोकसभा निवडणुकीत त्यांच्याशिवाय पर्याय नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. प्रतीक पाटील यावेळीही इच्छुक आहेत. पाच वर्षे त्यांचा संपर्क नव्हताच. काँग्रेसच्या कार्यक्रमांतही ते दिसत नव्हते. मात्र सोनिया गांधी यांच्याकडे जाऊन उमेदवारी आणू, असा त्यांना विश्वास आहे. विशाल पाटील यांचेही नाव पुढे येत आहे. विशाल यांनी नियोजनबद्ध वाटचाल सुरू केली आहे. वसंतदादा महोत्सव घेऊन ते लोकांपुढे आले आहेत. साखर कारखाना खासगी कंपनीकडे सोपवून ते राजकारणात आले आहेत. स्वत:च्या गटाची बांधणीही त्यांनी सुरू केली आहे. ते स्वत: संपूर्ण लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा सर्व्हे करत आहेत. भाजपला रकमराम ठोकलेले गोपीचंद पडळकर यांच्याबाबतही काँग्रेस-राष्ट्रवादी चाचपणी करत आहे. शरद पवार, विश्वजित कदम यांच्यासोबत पडळकर यांच्या बैठका झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आल्यास भाजपला निवडणूक जड जाईल. मात्र उमेदवार कोण असेल त्यावर बाकीची गणिते ठरतील.(लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत)