राजकारणाची मेट्रो!
By admin | Published: December 23, 2016 11:55 PM2016-12-23T23:55:23+5:302016-12-23T23:55:23+5:30
पुण्यातील बहुचर्चीत मेट्रो सुरू व्हावी, वेगवान प्रवास व्हावा अशी पुणेकरांची अपेक्षा. मात्र, मेट्रोच्या कामाने वेग घेण्यापेक्षा या निमित्ताने
पुण्यातील बहुचर्चीत मेट्रो सुरू व्हावी, वेगवान प्रवास व्हावा अशी पुणेकरांची अपेक्षा. मात्र, मेट्रोच्या कामाने वेग घेण्यापेक्षा या निमित्ताने राजकारणच सुसाट झाले. प्रत्येक टप्प्यावर राजकारणाच्या गर्तेतून मेट्रोचा प्रवास सुरू आहे. राजकीय लढाईचे हत्यार म्हणून मेट्रोचा वापर केला गेला. अगदी भूमिपूजनापर्यंत हा वाद सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज, शनिवारी मेट्रोचे भूमिपूजन होत आहे. वास्तविक पंतप्रधानांच्या हस्ते एखादा प्रकल्प सुरू होणे याला वेगळे महत्व असते. प्रकल्प पुढे जाण्यास त्यातून मदत होते. काही पदांबाबत पक्षीय राजकारण करणे योग्य नसते. परंतु, दोन्ही बाजूंनी हे घडले. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मेट्रोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातच पालक मंत्री गिरीष बापट यांनी समारंभासाठी दोन व्यासपीठे उभारण्याची घोषणा केली. पंतप्रधान कार्यालयाच्या राजशिष्टाचाराचा दाखला दिला गेला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच उपव्यासपीठावर बसण्याची खेळी असल्याचा संशय आला. यामुळे महापौर प्रशांत जगताप यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या हस्ते आदल्या दिवशीच भूमिपूजन करण्याची आततायी भूमिका घेतली. कॉँग्रेसनेही त्याला पाठिंंबा दिला. परंतु, स्थानिक पातळीवर कार्यकर्ते झुंजत असले तरी राष्ट्रीय पातळीवरील समीकरणे वेगळी असतात, हे महापौरांना उमगले नाही. पंतप्रधान कार्यालयाकडूनच शरद पवार यांचे नाव व्यासपीठावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापौरांना घूमजाव करावे लागले. यामध्ये खरी कोंडी झाली ती कॉँग्रेसची. राष्ट्रवादीबरोबर फरफट होते आहे, हा समज खोडून काढण्यासाठी शुक्रवारी मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्याला उपस्थित होते. मेट्रोचा प्रस्ताव आमचा, प्रयत्नही आमचे होते, अशी भूमिका कॉँग्रेसतर्फे मांडण्यात आली. विकासकामातून राजकीय फायदा घेणे नवीन नाही. राजकारणाचे तेच पहिले सूत्र असते. परंतु, नागरी प्रश्नांवर कधी तरी राजकारण्यांनी एकत्र यायला हवे. वाहतुकीच्या समस्येमुळे पुणे शहर प्रगतीच्या आलेखावर मृत होऊ पाहात आहे. यावर उपाययोजना असलेले मेट्रोसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राजकारणाच्या चिखलात अडकू नये, हीच नागरिकांची किमान अपेक्षा असते. पंतप्रधानांनी सर्वच राजकीय पक्षांच्या मदतीने मेट्रोला धक्का द्यावा आणि राजकारणाच्या गर्तेतून मेट्रो बाहेर काढावी, हीच पुणेकराची इच्छा आहे.