डायरी: नोंद क्रमांक १७६०स्थळ: वर्षा, वेळ: अपरात्रहल्ली दिवस भुर्रकन जातात. आजचा दिवसही कसा गेला, हे कळलंच नाही. श्वास घ्यायलाही उसंत नव्हती. सकाळपासून नुस्ती धावपळ...खंडीभर भूमिपूजनं आणि तोंडभर भाषणं! आजकाल गडकरी मुंबईत आले की, अशीच दमछाक होते. सकाळी महामार्ग तर दुपारी जलवाहतूक, सायंकाळी जलसंधारण तर रात्री सेमिनार! दमायला होतं नुसतं. बरं हे सगळं फुकटात असतं तर एकवेळ समजू शकलो असतो. पण प्रत्येक कोनशिला लाखभर कोटींची. कुठून आणायचे एवढे पैसे? गडकरींचं बरं आहे. त्यांची वाणी म्हणजे साक्षात कुबेराची टांकसाळ! उचलली जीभ की पाडली नाणी. आपलं काय? तिजोरीच्या नावावर भिक्षुकाची झोळी! तीही फाटकी. एकीकडे ठिगळ लावले की दुसरीकडे फाटते. अकबराचा रांजण जसा शेवटी रिकामाच राहातो. तशी आपली गत. उघडपणे बोलायची सोय नाही, म्हणून डायरीत लिहून ठेवतो. जीएसटीमुळं अक्षरश: कंगाल झालोय. कर्मचाºयांच्या पगाराला देखील पैसे पुरेनात. आशाळभूतपणे केंद्राकडे डोळे लावून बसतो. ते देतील तो तुकडा गोड मानून घेतो. छे! सीएम होण्याऐवजी महापौर झालो असतो तर बरं झालं असतं. असो. निवडणुकीत भलतीसलती आश्वासनं देऊन बसलो. आता ती पुरी करता-करता नाकीनऊ आलेत. तरी गडकरी सांगत होते, टोल बंद करू नका. टोलचा पैसा वर खर्चाला कामी येतो. पण आपणंच त्यांचं ऐकलं नाही. आश्वासनपूर्तीचा उत्साह नडला, दुसरं काय? बरं काहीतरी नवं करून दाखवावं म्हणून ‘समृद्धी’चा घाट घातला, पण तिथेही सतराशेसाठ विघ्न! कसातरी तो मार्ग रेटून नेत असताना मध्येच शेतकºयांचा संप आडवा आला...सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात. पण माझ्यासाठी तर सतरावंही धोकादायक गेलं! किती संकटं आली? कोपर्डीची घटना, मराठा समाजाचे महामोर्चे, डॉक्टरांचा संप, मुंबई विद्यापीठातील सावळा गोंधळ, कर्जमाफीतील आॅनलाईन घोळ...एकामागून एक संकटांची डेलीसोप मालिकाच सुरू होती. दैव बलवत्तर म्हणून निभावलं. समजा, गुजरातेत दगाफटका झाला असता तर सगळं खापर मुंबईवर फोडलं गेलं असतं!गुजरातवरून आठवलं. आपल्याकडेही कमी दिवस उरलेत. उणेपुरे एकवीस महिने! परवा नाथाभाऊ म्हणाले, दिवस बदलायला वेळ लागत नाही. तर गिरीशभाऊ म्हणे, पुढचं काही खरं नाही! आपलीच माणसं अशी का घाबरवून सोडतात? तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण शनिशिंगणापूरला जाऊन आलो आणि संकल्पही केला. ‘हे शनिदेवा, मावळत्या वर्षात खूप संकटं झेलली. आता तरी इडापीडा टळू दे. नवीन वर्ष सुखसमृद्धीचं जाऊ दे. नव्या वर्षात अरबी समुद्रातील छत्रपतीं शिवरायाचं आणि इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकारचं काम मार्गी लागलं की सफोला कंपनीच्या तेलानं (महाग असलं तरी) तुम्हाला अभिषेक घालिन!’शनिशिंगणापूरला जाऊन आल्यापासून निर्धास्त होतो. झोपही चांगली लागली. पण नव्या वर्षाची पहाट कोरेगाव-भीमा घेऊन उजाडली. आई म्हणते तेच खरं. सत्ता हीच खरी साडेसाती असते. विरोधात बसून कुणाचाही ‘शनि’ वक्री करता येतो!इति.- नंदकिशोर पाटील
सत्ता, शनि आणि साडेसाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 3:09 AM