गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलेला मरणोपरांत देहदानाचा संकल्प साऱ्या समाजाने प्रेरणा घ्यावा असाच आहे. हे जवान आपले घरदार सोडून, स्वत:चा जीव धोक्यात घालून नक्षलवाद्यांशी लढत आहेत. या देशसेवेची ते परतफेड मागत नाहीत. आपल्या कर्तव्यापोटी मिळणाºया पगारात ते आनंदी आहेत. पगार वाढावा किंवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी ते संप करीत नाहीत किंवा रस्त्यावरही उतरत नाहीत. कल्पना करा, हे जवान उद्या संपावर गेले तर आपण सुरक्षित राहू का? केवळ या कल्पनेने अंगावर शहारे येतात. पण ते तसे करणार नाहीत. कारण वैयक्तिक सुखापेक्षा त्यांना देशाचे, समाजाचे हित महत्त्वाचे वाटते. यासाठी देशासाठी प्राण पणाला लावण्याची त्यांची तयारी आहे. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी देशाच्या हवाली केले असले तरी, आपण गेल्यानंतरही आपला देह देशातील सामान्य माणसाच्या सत्कारणी लागावा, ही त्यांची भावना लाखमोलाची आहे. या जवानांच्या त्यागाचे मूल्य समाजाला कुठल्याही मापात मोजता येणार नाही. त्यांची ती अपेक्षाही नाही. नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. अभिमानाची गोष्ट अशी की, या पाचही बटालियनमधील जवानांनी हा संकल्प केला आहे. आम्ही जिवंतपणी देशाच्या आणि समाजाच्या कामी येत असतो. पण मृत्यूनंतरही आमच्या शरीराचा उपयोग गरजवंतांना व्हावा, ही या जवानांच्या मनातील भावना आहे. जवानांच्या संकल्पाकडे बघितल्यानंतर आपल्या साºयांच्याच मनाचे तोकडेपण ठसठशीतपणे समोर येते. आपण खुप सुरक्षित आयुष्य जगत असतो. देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांच्या तुलनेत आपले जीवन तसे बरेचसे सुखवस्तू आहे. आपण स्वत:चा, स्वत:च्या नातेवाईकांचा आणि फार झाले तर जातीचा विचार करीत असतो. त्यापलीकडे आपले दुसरे विश्व नसते. आपण रक्ताच्या नात्यांमध्ये एवढे गुरफटलो असतो की, आपण समाजाचे काही देणे लागतो, हा विचारही कधी मनाला स्पर्शून जात नाही. त्यामुळे दुसºयाच्या उपयोगात यावे, दुसºयांची मदत करावी, इतरांच्या वेदनेशी आपले नाते जोडावे, असे कधीही वाटत नाही. आपल्यासाठी दान अथवा दातृत्व हा विषय मंदिरातील दानपेटी किंवा अभिषेकापुरता मर्यादित असतो. अशी मतलबी आणि चौकटीतील मानसिकता घेऊन आपण जगत आहोत. त्यामुळे नेत्रदान, अवयवदान, देहदान या दानाच्या श्रेष्ठतम मूल्यांचा विचार आपल्याला कधीही येत नाही. याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बराचसा अज्ञानी व संकुचित आहे. समाजाच्या, देशाच्या शत्रूंशी लढत असलेल्या जवानांनी असा संकल्प सोडल्यानंतर त्यांना वंदन करण्यासाठी आपले हात, म्हणूनच आपसूक जोडले जातात...
श्रेष्ठ दानाला वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 2:47 AM