प्रणवदांचा खरा राष्ट्रधर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:29 AM2018-06-09T02:29:52+5:302018-06-09T02:29:52+5:30
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे स्वयंभू व्यक्तिमत्त्व आहे. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहूनही आपण त्या समूहाच्या जराही प्रभावाखाली नाही हे काल जसे त्यांनी दाखवून दिले तसेच काँग्रेसमधील काही भुरट्या माणसांच्या टीकेची आपल्याला पर्वा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे स्वयंभू व्यक्तिमत्त्व आहे. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहूनही आपण त्या समूहाच्या जराही प्रभावाखाली नाही हे काल जसे त्यांनी दाखवून दिले तसेच काँग्रेसमधील काही भुरट्या माणसांच्या टीकेची आपल्याला पर्वा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना त्यांना संघालाच राष्ट्र, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय अभिमान यांचे खरे स्वरूप, ऐतिहासिक दाखले देऊन ऐकविले व ते करतानाच देशभक्ती ही कोणत्याही एका संघटनेची मक्तेदारी नसते हेही फार परखडपणे ऐकविले. या देशात राष्ट्रनिर्मितीचे कार्य फार पूर्वी सुरू झाले. बुद्ध, अशोकाच्या, चाणक्य-चंद्रगुप्तच्या आणि कृष्णदेव राय यांच्याच काळात त्याची मुहूर्तमेढ झाली व त्याला बळकटी आली. ही बाब त्यांनी मेगास्थेनिस व ह्युएनत्संगसारख्या जुन्या इतिहासकारांचे दाखले देत सांगितले. पुढे मोगलांच्या व ब्रिटिशांच्या राजवटीनंतर तेच काम लो.टिळक, महात्मा गांधी व पं. नेहरू सारख्या देशभक्तांनी केले. या देशाला त्याचे स्वातंत्र्य या महापुरुषांच्या प्रयत्नांतून व त्यांना जनतेने दिलेल्या पाठिंब्यातून प्राप्त झाले असे सांगत, ‘आम्हीच काय ते देशभक्त’ हा संघाकडून मिरविला जाणारा दंभ खरा नाही हेही त्यांनी सांगून टाकले. हा देश घटनेने दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या चतुसूत्रीवरच मोठा होईल. तिला बाधा आणण्याचे काम कुणी करू नये असे सांगतानाच देशात आज असलेली अस्वस्थता, हिंसाचाराचा उद्रेक व जाती-धर्मामधील तेढ यांचा उल्लेख त्यातील आरोपींची नावे न घेताच त्यांनी केला असला तरी त्यांचा रोष कुणावर होता हे साऱ्यांना कळण्याजोगे होते. संघाच्या सर्वोच्च व्यासपीठावर जाऊन संघाला असे सुनावण्याचे धाडस यापूर्वी कधी कोणत्या वक्त्याने वा पाहुण्याने केले नाही. त्यामुळे प्रणव मुखर्जींना संघस्थानावर आणून त्यांच्याकडून एक चांगले प्रशस्तीपत्र मिळविण्याचा संघाचा इरादा पार धुळीस मिळाल्याचेच काल साºयांना दिसले. संघाच्या प्रथेनुसार प्रमुख पाहुण्यांच्या नंतर सरसंघचालकांचे भाषण होत असते. मात्र यंदा तो क्रम बदलून प्रणवदांचे भाषण साºयांच्या अखेरीस झाले. त्याआधी दिलेल्या आपल्या लांबलचक बौद्धिकात सरसंघचालक मोहन भागवतांनी संघ ही देशभक्तांची निर्मिती करणारी व देशभक्तीचा संस्कार करणारी संघटना असल्याचे सांगितले. तिचे दरवाजे साºयांसाठी खुले असल्याचेही त्यांनी यावेळी प्रथमच घोषित केले. मात्र त्यांनीही संघाच्या वर्तमान राजकारणाचा उल्लेख आपल्या भाषणात केला नाही. ‘सत्तेमुळे समाज बदलत नाही, तो व्यक्तीच्या मानसिकतेत होणाºया बदलांमुळेच पुढे जातो’ असेही यावेळी ते म्हणाले. तोपर्यंत स्तब्ध राहिलेले व संघाच्या ध्वजप्रणामातही सहभागी न झालेले प्रवण मुखर्जी भाषणास उभे राहिले तेव्हा ते आता काय बोलतील याचीच उत्सुकता उपस्थितांएवढीच साºया देशाला लागून राहिली होती. दूरचित्रवाहिन्यांवर तर त्यासाठी हाणामाºयाच सुरू होत्या. मात्र प्रणवदांच्या पहिल्या वाक्यातूनच त्यांच्या धर्मनिरपेक्ष वृत्तीचा परिचय साºयांना घडत गेला. हा देश सर्वांचा आहे. तो बहुसंख्याकांएवढाच अल्पसंख्याकांचा, दलितांचा व स्त्रियांचाही आहे असे सांगत त्यांनी खºया व जातीधर्मनिरपेक्ष राष्ट्रभक्तीचा जो संदेश संघाला व देशाला ऐकविला तो साºयांनाच शांत व अंतर्मुख करून गेला़
प्रणवदांचे भाषण विद्वत्तापूर्ण व समर्थ पुरावे देत पुढे गेले. देशाचा इतिहास कुणा एका धर्माचा, जातीचा वा विचाराचा नसून तो सर्वसमावेशक मानसिकतेचा आहे. तो घडविण्याचे काम येथील आजवरच्या विवेकी नेत्यांनी व त्याच्या पिढ्यांनी केले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ सारे विश्वच एक कुटुंब आहे ही भारताची वृत्ती आहे. ती वृत्ती सर्वसमावेशक आहे, अन्यवर्जित नाही. हा देश साºयांचे स्वागत करणारा, भिन्न विचारांना आत्मसात करणारा व विश्वाच्या एकात्मतेत राष्ट्राची एकात्मता पाहणारा आहे हे सांगताना त्यांनी गांधीजींचे प्रसिद्ध वचन उद्धृत केले. ‘माझा राष्ट्रवाद विश्वाच्या एकात्मतेशी जुळणारा व त्यात विलीन होणारा आहे’, असे गांधीजी एका ब्रिटिश पत्रकारास दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. प्रणवदा हे काँग्रेसच्या परंपरेत वाढलेले व तिच्याशी एकरूप झालेले नेते आहेत. त्यांना संघाचे वेगळेपण त्यातील बारकाव्यासह कळणारे आहे. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे एकेकाळी काँग्रेसचे सदस्य व नागपुरात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या स्वयंसेवकाच्या पथकाचे प्रमुख होते हे त्यांना ठाऊक होते. त्याचमुळे त्यांचा उल्लेख त्यांनी ‘भारतमातेचे सुपुत्र’ असा केला. मात्र त्यांच्या पश्चात त्या पदावर आलेल्या कोणत्याही संघप्रमुखाचे वा त्याच्या कार्याचे नाव त्यांनी घेतले नाही. एक अभ्यासू, सावध व समृद्धी असणारे व्यक्तिमत्त्वच त्यांच्या भाषणातून देशात पहायला मिळाले. त्याचा आनंद संघावाचूनच्या साºयांना त्याचमुळे झालाही आहे. प्रणवदांच्या संघातील उपस्थितीला काही काँग्रेसजनांनी आक्षेप घेतला. त्यांच्या जाण्यामुळे संघाला जास्तीची प्रतिष्ठा मिळेल असा त्यांचा आक्षेप होता. संघाचा प्रत्यक्ष संबंध गांधीजींच्या खुनाशी आहे, तो खून करणारे पिस्तुल संघाच्या कार्यकर्त्यानेच गोडसेला दिले़ संघाने ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्य लढ्याला साथ तर दिली नाहीच उलट त्याने ब्रिटिशांनाच साहाय्य केले हे जुने आरोप या आक्षेपांनी केले. प्रणवदांनी ते आरोप खोटे आहेत असे म्हटले नाही आणि त्यावर टिप्पणीही केली नाही. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यानंतर ते देशाचे एक स्वतंत्र नागरिक आहेत आणि त्यांनी आता कोणत्या पक्षाशी प्रत्यक्ष संबंधही ठेवला नाही त्यामुळे एखाद्या व्यासपीठावर जाऊन स्वत:चे स्वतंत्र मत ऐकविणे हा त्यांचा अधिकार आहे व तो साºयांनी मान्य करणे आवश्यक आहे. एखादा नेता वा कार्यकर्ता जरा वेगळे मत मांडू लागला वा एखाद्या व्यासपीठावर जायला सिद्ध झाला की लगेच तो आपली आयुष्यभराची निष्ठा विसरतो असे कुणीही समजण्याचे कारण नाही. त्यामुळे प्रणवदांचे भाषण व त्यांची संघातली उपस्थिती काँग्रेसमधील टीकाकारांएवढीच संघातील आशाळभुतांनाही बरेच काही शिकवून गेली आहे. ती साºयांनी अंतर्मुख होऊन समजून घेणे गरजेचे आहे.प्रणवदांनी संघाला काही ऐकविण्याचे मनात आणून त्याचे निमंत्रण स्वीकारले असेल तर त्यांचा तो अधिकार खिलाडूपणे मान्य करणे हे साºयांचे कर्तव्यही आहे. तथापि, या घटनेने सर्वात मोठा धडा संघाला दिला आहे. ही संघटना एकचालकानुवर्ती असल्याने प्रणवदांच्या भाषणाचा तिच्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नसली तरी त्यांचे भाषण ऐकणाºया इतरांना खरा राष्ट्रवाद, खरी देशभक्ती व खरा राष्ट्रधर्म सांगून गेले आहे. दुर्दैवाने वैचारिक व्यासपीठे व तिही राष्ट्रीय स्वरूपाची कमी होत असल्याचा हा काळ आहे, त्यामुळे प्रणवदांचे भाषण, मग ते संघाच्या व्यासपिठावरून केलेले का असेना, सर्वच नागरिकांना काही चांगले व राष्ट्रीय मार्गदर्शन करून गेले आहे. त्यातल्या त्यात जे घ्यायचे तेच तो घेईल मात्र न घेणाºयालादेखील साºयांची वास्तव बाजू हे भाषण दाखवून जाईल.