तोगडियांची गच्छंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:06 AM2018-04-20T00:06:45+5:302018-04-20T00:06:45+5:30
सुब्रमण्यम स्वामींचा नेहरू व गांधी या परंपरेवर आणि तिला आदरस्थानी मानणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींवर विषाक्त डोळा होता.
प्रवीण तोगडिया आणि सुब्रमण्यम स्वामी ही भारताच्या राजकारणातील कमालीची द्वेषाक्त माणसे आहेत. हे कुणाच्या वा कशाच्या बाजूचे आहेत याहूनही त्यांचा कुणावर आणि कशावर डोळा आहे हे त्यांना समजून घेण्यासाठी जास्तीचे उपयुक्त आहे. सुब्रमण्यम स्वामींचा नेहरू व गांधी या परंपरेवर आणि तिला आदरस्थानी मानणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींवर विषाक्त डोळा होता. नेहरूंचे घराणे आता सत्तेवर नाही आणि वाजपेयी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी अरुण जेटली या राजकारणात फारसे अग्रेसर नसलेल्या मंत्र्याला आपल्या टीकेचे लक्ष्य बनविले आहे. ते मोदींवर टीका करीत नाहीत म्हणून भाजप व संघही त्यांच्या टीकाखोरीला महत्त्व देत नाही. तोगडियांचा वार मात्र मोदींवर आहे. गेले काही दिवस मोदी आणि त्यांचे सरकार हिंदूहिताचे काम करीत नाहीत, मंदिराच्या कामात रस घेत नाहीत आणि लोकप्रियतेच्या मागे लागून ‘नको त्यांचा अनुनयच ते अधिक करते’ अशी त्यांची वक्तव्ये प्रकाशित होत राहिली. एक दिवस ते स्वत:च बेपत्ता झाले आणि आपले अपहरण केले गेले असा कांगावा त्यांनी मागाहून केला. त्यांच्या त्या टीकेचा रोख अर्थातच मोदींवर होता. तोगडिया हे बोलण्या-वागण्यातही बरेचसे अद्वातद्वा असलेले गृहस्थ आहे. त्यांचे आकांडतांडव जेव्हा डोक्यावरून जाऊ लागले तेव्हा संघातील मोदींच्या गटाने त्यांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला. ‘संघात व्यक्ती मोठी नसते, तसे होण्याचा प्रयत्न करणाºयांना त्यांची जागा लागलीच दाखविली जाते’ हा संघाचा बराचसा फसवा बोलबाला मग तोगडियांचे पंख कापायला कामी आला. कधी नव्हे ती विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदाची त्यासाठी निवडणूक घेतली गेली. तीत तोगडियांनी त्यांच्या कुणा रेड्डी नामे इसमाला आंतरराष्टÑीय अध्यक्षपदासाठी उभे केले तर मोदींच्या संघातील गटाने न्या. कोकजे यांना ती उमेदवारी दिली. कोकजे यांनी रेड्डींना ७१ मतांनी हरविले. परिणामी मोदी विजयी आणि तोगडिया पराभूत झाले. कोणत्याही व्यक्तीला संघटनेहून मोठे होऊ न देण्याचा संघाचा पवित्रा त्यामुळे पुन्हा एकवार अधोरेखित झाला. (मोदींच्या तशा मोठेपणाकडे मग त्या परिवारातील निष्ठावंतांनाही फारसे लक्ष द्यावेसे वाटले नाही) मात्र हा पराभव तोगडियांच्या जिव्हारी लागला. विश्व हिंदू परिषदेसारख्या स्वत:ला धर्मनिष्ठ म्हणविणाºया संघटनेवर बोगस मतदारांच्या नोंदणीचा, मतदानातील लुच्चेगिरीचा व त्यातील राजकीय हस्तक्षेपाचा आरोप आता त्यांनी केला आहे. तेवढ्यावर न थांबता मोदींच्या अहमदाबादेत बेमुदत उपोषण करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. पुढे जाऊन विश्व हिंदू परिषदेत फूट पाडण्याचा व आपली वेगळी संघटना उभी करण्याचा इरादाही त्यांनी जाहीर केला आहे. हा तोगडिया यांनी संघाच्या नेतृत्वाला शह देण्याचा चालविलेला प्रकार आहे. संघ त्याच्या नित्याच्या कार्यपद्धतीनुसार तोगडियांना उत्तर देणार नाही. तो प्रथम त्यांच्याकडे दुर्लक्ष करील व नंतर ‘तोगडिया वाया गेले आहेत’ किंवा त्यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे अशी कानाफुसीही तो त्याच्या शैलीत करू लागेल. स्वयंसेवकांना व विहिंपमधील जुन्या निष्ठावंतांना तो तोगडियांकडे दुर्लक्ष करायला सांगेल आणि एक दिवस तोगडियांचे नाव माध्यमांमधून वगळले जाईल. तोगडिया हे तसेही एक अतिशय उठवळ गृहस्थ आहेत आणि त्यांचा माध्यमांनाही कंटाळा आला आहे. त्यामुळे संघ, विश्व हिंदू परिषद व न्या. कोकजे हे तिथे नवे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष यांचे काम सोपे व सुकरही होईल. त्याहून महत्त्वाची बाब ही की या घटनेमुळे मोदींचा संघ परिवारातील एक टीकाकारही इतिहासजमा होईल. १९९२ मध्ये संघ परिवाराने बाबरी मशिदीचा विध्वंस केला तेव्हापासून या तोगडियांना उत्साहाचे व काहीशा उन्मादाचे भरते आले होते. त्यांची भाषाही साधी न राहता धमकीवजा बनली होती. त्यांचे चाहते त्या भाषेवर प्रसन्न आणि टाळ्या कुटणारे होते. स्वत: तोगडियाही स्वत:वर प्रसन्न होते. आता त्यांची निवृत्तीच नव्हे तर गच्छंतीही झाली आहे आणि संघ परिवाराची एक डोकेदुखीही त्यामुळे कमी झाली आहे.