वाचनीय लेख - राज ठाकरेंनी कॅरम फोडला; सोंगट्यांचे काय?
By यदू जोशी | Published: April 12, 2024 10:07 AM2024-04-12T10:07:37+5:302024-04-12T10:08:12+5:30
एरवी विरोधात राहिले असते तर राज ठाकरेंनी महायुतीचे कपडे फाडले असते, आता मात्र महायुतीला कपडे शिवून देणारा नवा टेलरच मिळाला आहे.
यदु जोशी
‘अंधेरा मांगने आया था रौशनी की भीख, हम अपना घर न जलाते तो क्या करते’ या जातीचे औदार्य दाखवत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. स्वत:साठी त्यांनी काहीही मागितले नाही आणि स्वत:कडचे सगळे देऊन मोकळे झाले. अमित शाह यांच्या गुहेत गेले तेव्हाच ते वाघाशी पंगा घेणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. आपली कवचकुंडलेही देऊन टाकली म्हणून त्यांना आधुनिक कर्णदेखील म्हणता येईल. फक्त मोदींसाठी आपण हा पाठिंबा दिल्याचे सांगताना त्यांनी, ‘उद्या अपेक्षाभंग झाला तर आपण बोलायला मोकळे राहू’, असेही सांगून ठेवले आहे. भूमिका बदलण्यासाठी प्रसिद्ध असलेला नेता म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते. पुढेमागे महायुतीशी जमले नाही तर टीका करू, प्रसंगी साथही सोडू, असा पर्याय त्यांनी स्वत:कडे ठेवला आहे. याचा अर्थ एक भूमिका घेताना ती भविष्यात बदलण्याची तरतूदही त्यांनी करून ठेवली आहे. एक दरवाजा उघडताना तो कालांतराने बंद करण्याचा अधिकारही राखून ठेवला आहे.
एकचालकानुवर्ती पक्षाचे एक चांगले असते. त्यांना एखादा निर्णय घेताना पक्षात कोणाशी चर्चा वगैरे करावी लागत नाही. ‘मला असे वाटते’ असे म्हटले की झाले! ‘मी कोणाच्याही नेतृत्वात काम करू शकत नाही’, असे स्वत: राज यांनीच परवा जाहीरपणे सांगितले. राज स्वत:च स्वत:चे पक्षश्रेष्ठी आहेत. पक्षाचे इंजिनही तेच, चालकही तेच आणि डबेही तेच. ‘राजसाहेब काय काय भूमिका घेणार याची उत्सुकता तुमच्याप्रमाणे आम्हालाही आहे’, असे बाळा नांदगावकर, प्रकाश महाजन, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हे सभेपूर्वी माध्यमांना सांगत होते, यावरून निर्णयप्रक्रियेत त्यांना कितपत सामावून घेतले जाते ते कळले.
कधी मोदींवर टोकाची टीका तर कधी फक्त मोदींसाठी महायुतीला पाठिंबा, अशा परस्परविरोधी वागण्याने सातत्याच्या अभावाची टीका राज यांच्यावर होते. हा पाठिंबा देताना त्यांनी स्वत:साठी, पक्षासाठी, पक्षातील नेत्यांसाठी काहीही मागू नये हे अनाकलनीय आहे. रामदास आठवले भलेही त्यांच्या पक्षातील नेत्यांना काहीच मिळू देत नाहीत; पण निदान स्वत:कडे मंत्रिपद तरी घेतात. महादेव जानकर यांनी ‘महाविकास आघाडीकडे चाललो’ असे भासवून दबाव आणला आणि महायुतीकडून परभणीची जागा मिळवून घेतली. पक्षातील बेरोजगार नेत्यांचे पुनर्वसन होईल, असा शब्द महायुतीकडून घेण्याची संधी राज यांना होती, पण कर्ण बनत त्यांनी ती गमावली. त्यांच्या पाठिंब्यामागचे ‘राज’ काय याकडे विरोधी पक्षांमधील काही नेत्यांनी अंगुलीनिर्देश केलेला आहे, खरेखोटे माहिती नाही. एक खरे की महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत जे फडणवीसांच्या संपर्कात असतात, त्यातले एक राज ठाकरे आहेत आणि दुसरे कोण ते तुम्ही शोधा, काही ‘प्रकाश’ पडला तर मला सांगा.
यू टर्न घेण्याबाबतची टीका केवळ राज यांच्यावरच कशासाठी? अलीकडे ज्याने हे केलेले नाही, असा महाराष्ट्रातील एक पक्ष दाखवा! भाजपने राष्ट्रवादीचा मुका घेतला, काँग्रेसने शिवसेनेशी रोमान्स केला, राष्ट्रवादीने शिवसेनेला डोळा घातला. सत्ताकारणाच्या सोईसाठी सर्वांनीच घटस्फोट घेत नवा घरठाव केला. पहिले लग्न कोणाचेच टिकलेले नाही, सगळे पुनर्विवाह आहेत. राज यांनी परवा म्हटलेच की, ‘महाराष्ट्रात इतका चुकीचा कॅरम फोडला आहे की कोणाच्या सोंगट्या कोणत्या भोकात गेल्या हेच कळत नाही,’ हे म्हणत असताना त्यांनीही तसाच कॅरम फोडला. त्यामुळे आधीच गोंधळात असलेल्या त्यांच्या पक्षातल्या सोंगट्यांचे काय, हा प्रश्न आहेच.. पण त्याहूनही मोठा प्रश्न हा, की राज महायुतीसोबत गेले त्यात त्यांचा फायदा आहे की महायुतीचा?
कोणाचा काय फायदा होईल?
मनसे लोकसभा लढणार नसल्याने त्यांना या निवडणुकीपुरता तरी कोणताही राजकीय फायदा झालेला नाही. झाला फायदा तर तो महायुतीलाच होईल. राज यांच्याकडे मॅग्नेट आहे. परवाची शिवाजी पार्कवरील गर्दी तेच सांगत होती. लोक आजही त्यांचे दिवाने आहेत. लोकांना आकर्षून घेण्याची विलक्षण हातोटी या माणसाकडे आहे, पण आलेल्या लोकांना स्वत:सोबत टिकवून ठेवता येत नाही हा अवगुणही आहेच. महायुतीच्या समर्थनार्थ ते आता सभा घेतील, एकदोन दिवसांत भाजपकडून त्यांच्या हाती सभांचे वेळापत्रक पडेलच. एरवी विरोधात राहिले असते तर राज यांनी महायुतीचे कपडे फाडले असते, आता कपडे शिवून देणारा नवा टेलर त्यांना मिळाला आहे.
महायुतीचे कपडे फाडणारे उद्धव ठाकरे, शरद पवारांना घेरण्याचे काम राज करतील हा महायुतीचा फायदा आहेच. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकच्या पट्ट्यात राज यांना मानणारा वर्ग आहे, तो महायुतीसोबत किती गेला हे निकालात दिसेलच. शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना करणाऱ्या राज यांनी १८ वर्षांनंतर भाजपच्या माध्यमातून फुटलेल्या शिवसेनेशी (शिंदेसेना) सलगी केली आहे. आपला पक्ष आपल्या बळावर वाढवता येत नाही असे लक्षात आल्याने तर राज यांनी महायुतीचा सहारा घेतला नसावा? लोकसभेला दोन जागा घेतल्या आणि त्या पडल्या तर विधानसभा आणि महापालिकेला महायुतीत आपली बार्गेनिंग पॉवर कमी होईल अशा भीतीने लोकसभाच न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला दिसतो.
(लेखक लोकमतमध्ये सहयोगी संपादक आहेत)