- सचिन जवळकोटे
‘जिथे गवताला भाले फुटतात,’ या वाक्याची आठवण यावी, अशा विचित्र अन नाट्यमय घडामोडी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात घडताहेत़ रोज एक नेता ‘कमळाचा सुगंध’ घेण्यासाठी मुंबईत ‘वर्षा’कडे धाव घेतोय़ मात्र आज मंगळवारी जी व्यक्ती देवेंद्रपंंतांना भेटण्यासाठी मुंबईत गेलीय, तिचा संदर्भ मात्र राजकीय कार्यकर्त्यासाठी अत्यंत धक्कादायक. अकलूजच्या राजकारणालाच कलाटणी देणारा़ अकलूजमध्ये आजपावेतो थोरल्या बंधुंच्या विरोधात रणनीति आखण्यातच ज्यांचा प्रत्येक दिवस गेला, ते ‘धवलदादा’ मुंबईत भेटताहेत भाजप नेत्यांना. वेळप्रसंगी ‘रणजितदादां’सोबत काम करायची तयारीही ठेवावी लागेल, असा सल्ला त्यांना दिलाय काही नेत्यांनी. मोहिते-पाटील घराण्यातील नव्या बेरजेच्या राजकारणाचे सूचक आहेत त्यांच्या ‘पालक’त्वाची जबाबदारी घेतलेले सोलापूरचे ‘विजय मालक’. सोबतीला अनुमोदक आहेत बार्शीचे ‘राजाभाऊ़’ विशेष म्हणजे या मुंबई भेटीला नसावी केवळ पक्षांतराचीच किनाऱ असेल ‘भाऊबंदकी’ची जुनाट जळमटं बाजूला फेकून ‘भावकी’चा गुलाल एकमेकांना लावण्याची नवी परंपरा. मागच्या पिढीपासून चालत आलेल्या हाडवैराचा डाग पुसून काढून हातात हात घालून काम करण्याचा नवा पायंडा़ ज्या चुका पूर्वी ‘विजयदादा’ अन् ‘पप्पा’ यांच्या काळात झाल्या, त्या सुधारुन पुन्हा एकत्र येण्याची अनोखी धडपड. होय़़़ अकलूजचे ‘रणजितदादा’ अन् ‘धवलदादा’ या दोघांना एकत्र आणण्याची नवी समिकरणं ठरतील मुंबईत. ‘जिथे तलवारीला फुलं फुटतात,’ या नव्या भावनिक नाट्याची रंगीत तालीम होईल ‘वर्षा’ बंगल्यावर.क़ारण एकाच म्यानात दोन-दोन तलवारी बाळगण्याची तयारी दाखविली याच ‘देवेंद्रपंतां’नी.
एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर राजकीय हुकूमत गाजविणाºया मोहिते-पाटील घराण्याचा दबदबा होता अवघ्या महाराष्ट्रातही. मात्र पंधरा वर्षांपूर्वी ‘विजयदादा’ उपमुख्यमंत्री बनले, तेव्हापासून म्हणे ‘धाकटे दादा बारामतीकर’ झाले प्रचंड डिस्टर्ब. याच काळात ‘कमळ’वाल्यांनी दिवंगत प्रतापसिंहांना सोलापुरातून ‘खासदार’ म्हणून निवडून आणलं़ एक मंत्री ‘घड्याळ’वाले़ दुसरे खासदार ‘कमळ’वाले़ एकाच घरात दोन-दोन चिन्हं गुण्यागोविंदानं नांदू लागली़़़ अन् इथंच या घराण्याच्या एकीला सुरूंग लागला़ ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांनीही जिल्ह्यातील दोन नंबरच्या फळीतील सरदारांना ताकद देण्यास सुरुवात केली़ याचा पुरेपूर फायदा जेवढा माढ्याच्या ‘बबनदादां’नी घेतला़, तेवढाच करमाळ्याच्या ‘बागलां’नाही मिळाला़ कधीकाळी नजरेला नजरही न देणारी मंडळीही आता अकलूजकरांंविषयी उघडपणे बंडाची भाषा बोलू लागली.
हे कमी पडलं की काय म्हणून घरातही ‘दुफळी’ माजली़ सत्तेसाठी ‘भाऊबंदकी’उफाळून आली़ ‘सत्तेच्या चुलीत भावकीची राख’ झाली़ दोन्ही बंधू एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभारले़ २०१४ साली ‘पप्पां’चा पराभव झाला, मात्र त्यांनी घेतलेल्या मतांमुळे थोडक्या मतांनी निवडून येण्याची वेळ थोरल्या दादांवर आली़ त्यानंतर ‘धवलदादां’नीही सेनेचा ‘भगवा पंचा’ गळ्यात टाकला़ दुसºया पिढीनंही घराण्याच्या एकीला थेट ‘जय महाराष्ट्र’ ठोकला़ नुकत्याच झालेल्या साखर कारखान्याच्या रणसंग्रामात एकमेकांच्या भ्रष्टाचाराची लक्तरंही अकलू्जच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न झाला़ हे पाहून अकलूजकर दचकले़ भांबावले़ दोन भावांच्या सत्तासंघर्षात विनाकारण आपला राजकीय बळी नको म्हणून अनेकांनी राजकारणातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़ अकलूजच्या या आधुनिक महाभारताची वर्णनं थोरल्या काकांपर्यंत अत्यंत चविष्टपणे पोहोचवली जात होती़ मात्र बारामतीकरांनी या ‘गृहयुद्धा’त न पडता जिल्ह्यातील अकलूजकरांच्या विरोधकांनाच ताकद देण्याचा एक कलमी कार्यक्रम व्यवस्थितपणे सुरूच ठेवला़ या दरम्यान, अकलूजकर पिता-पुत्र शांतच राहिले असले तरी आतल्या संतापाचा स्फोट अखेर माढा लोकसभेच्या निमित्तानं झालाच. थोरल्या काकांच्या विरोधात उघडपणे बंड पुकारुन ‘रणजितदादा’नी कमळाचं फूल हातात धरलं.
याच काळात ‘धवलदादा’ही कोल्हापूरच्या ‘चंद्रकांतदादां’सोबत संपर्कात होते़ खरं तर, काही दिवसापूर्वी ‘धवलदादां’नी ‘थोरले काका बारामतीकर’ यांचीही भेट घेतलेली़ ‘हातात घड्याळ’ बांधण्याची इच्छाही व्यक्त केलेली़ मात्र त्यावेळी ‘तुम्हाला विजयदादांच्या नेतृत्वाखालील अकलूजमध्ये काम करावं लागेल,’ असा वडिलकीचा सल्ला म्हणे थोरल्या काकांनी दिलेला़ त्यामुळे ‘घड्याळाचा नाद’ सोडून ‘धवलदादा’ पुन्हा ‘कमळाच्या मोहात’ पडलेले़ मात्र बसच्या खिडकीतून रुमाल टाकून अगोदर धरलेली सीट त्यांच्या थोरल्या दादांनी परस्परच पटकावलेली. ‘लोटस बस’चे चालक असलेल्या ‘देवेंद्रपंतां’च्या केबिनमधून ‘रणजितदादां’नी थेट गाडीत प्रवेश केलेला़ त्यामुळे बाहेर लटकलेल्या ‘धवलदादां’ना आता बसमध्ये प्रवेश करायचाच असेल तर ‘रणजितदादां’लगत बसण्याशिवाय पर्याय नाही़़ अन् तो पर्याय म्हणे त्यांनी स्विकारावा यासाठी जोर लावताहेत भाजपाचेच काही नेते़
दोनच दिवसापूर्वी ‘चंद्रकांतदादा’ सांगोल्यात बोलले होते की आम्ही दोन घराणी एकत्र आणण्याचं काम करत असतो़ खरं तर, हा त्यांचा बारामतीकरांना टोला होता़ बीडचं मुंढे घराणं असो की अकलूजचे मोहिते-पाटील़ माण-खटावचे गोरे बंधू असोत की साताºयाचे राजे़़ या साºयाच घराण्यांमध्ये सत्तेच्या ठिणगीची फुंकर टाकून कुणी भाऊबंदकी भडकविली, हे प्रत्येक मराठी माणसाला ठावूक़ त्यामुळं परिचारक अन् मोहिते-पाटील यांना एकत्र आणण्याचं काम करत असताना ‘कमळ’वाल्यांनी एकाच घराण्यातल्या दोन बंधुंनाही जोडण्याचा जणू विडा उचललाय़ मात्र यात या घराण्याबद्दलची आपुलकी जास्त की बारामतीकरांविरुद्धचा द्वेष अधिक़़़ याचं उत्तर लोकसभा निवडणुकीनंतरचा काळच देईल. - सचिन जवळकोटे
( लेखक ‘सोलापूर लोकमत’चे निवासी संपादक आहेत. )