बलात्काऱ्यांना जिवंत राहण्याचा मुळीच हक्क नाही
By विजय दर्डा | Published: April 16, 2018 12:41 AM2018-04-16T00:41:19+5:302018-04-16T00:41:19+5:30
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात घडलेल्या मानवतेला काळिमा फासणा-या एका घटनेने सध्या संपूर्ण देश जणू सुन्न झाला आहे. तेथे बकरवाल या भटक्या समाजातील एका आठ वर्षाच्या मुलीचे काही लोकांनी अपहरण केले आणि सात दिवस तिच्यावर सतत बलात्कार करून तिची हत्या केली. राज्य प्रशासनाने सुमारे तीन महिने गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात घडलेल्या मानवतेला काळिमा फासणा-या एका घटनेने सध्या संपूर्ण देश जणू सुन्न झाला आहे. तेथे बकरवाल या भटक्या समाजातील एका आठ वर्षाच्या मुलीचे काही लोकांनी अपहरण केले आणि सात दिवस तिच्यावर सतत बलात्कार करून तिची हत्या केली. राज्य प्रशासनाने सुमारे तीन महिने गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर सुशासन आणि स्वच्छ प्रशासनाचा दावा करणा-या भारतीय जनता पार्टीचे दोन मंत्री व एक आमदार गुन्हेगारांना पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या मोर्चांमध्ये सामील झाले. बलात्का-यांविरुद्ध आरोपपत्र दाखल होऊ नये यासाठी जम्मू बार असोसिएशनच्या वकिलांनी हरत-हेने प्रयत्न केले. एका निरागस मुलीवर केल्या गेलेल्या राक्षसी अत्याचारास बेशरमपणाने धार्मिक रंग दिला गेला. राज्याचे शासन व प्रशासन हे सर्व पाहात राहिले कारण या सर्व घाणेरड्या घटनाक्रमात भाजपाचे मंत्री, आमदार आणि धर्माच्या नावे आपली पोळी भाजून घेणारे मोठे राजकीय नेते सामील होते. परंतु नराधमांना कोणताही धर्म नसतो हे ते विसरले. जिच्यावर हा पाशवी बलात्कार झाला ती मुलगी कोणत्या धर्माची होती याने या गुन्ह्याची अमानुषता जराही कमी होत नाही.
जानेवारीत घडलेली ही घटना आता जगापुढे आली आहे. हे प्रकरण दडपून टाकण्याचा पोलिसांनी खूप प्रयत्न केला. परंतु माध्यमांमध्ये त्याला वाचा फुटून देशभर काहूर माजल्यावर नाईलाजाने एफआयआर नोंदविला गेला व आरोपपत्रही दाखल केले गेले. आता सर्वोच्च न्यायालयानेही यात लक्ष घातले असून जम्मू व कठुआच्या बार असोसिएशनकडे खुलासा मागितला आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाºयांनी याचा एकदा तरी विचार केला का, की त्या मुलीच्या जागी त्यांच्या घरातील मुलगी असती तर त्यांच्यावर काय वेळ आली असती?
क्रौर्याच्या या बातम्या वाचून मी विचलित झालो आहे. उपाशी ठेवून मुलीवर सात दिवस बलात्कार व्हावा, अगदी मरेपर्यंत हे अत्याचार सुरू राहावेत, हे पाहून मनात आले की, काय अवस्था झाली आहे या देशाची? देशात कायदा आहे की नाही? कायद्याचा जराही धाक वाटू नये एवढे गुन्हेगार निर्ढावतात तरी कसे? दिल्लीतील निर्भया घटनेनंतर अधिक कडक कायदा केला गेला. पण त्या कायद्यालाही कुणी भीक घालत नाही. सत्ताधाºयांनीच कायद्याची लक्तरे केली व ते गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहू लागले तर कायद्याचा धाक राहणार तरी कसा?
उत्तर प्रदेशातही नेमके तसेच घडले आहे. तेथील प्रशासनाने कायदा केराच्या टोपलीत फेकण्याचे काम एवढ्या निर्लज्जपणे केले आहे की योगी आदित्यनाथ सरकारच्या प्रामाणिकपणापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तेथेही उन्नाव जिल्ह्यात एका निरागस लहान मुलीवर पाशवी बलात्कार झाला. भारतीय जनता पार्टीचे आमदार कुलदीप सेंगर यांनी बलात्कार केल्याचे या मुलीने स्पष्टपणे सांगितले. गेले सहा महिने ती पोलीस ठाण्यात खेपा घालत राहिली, परंतु पोलिसांनी आमदाराविरुद्ध गुन्हा नोंदविला नाही. नाईलाजाने या मुलीने लखनौमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा सर्वांना खडबडून जाग आली. कायदा त्याचे काम करेल असे योगी आदित्यनाथ मानभावीपणे सांगत राहिले. पण त्यांच्या राज्यात आंधळ््या कायद्याला सत्ताधाºयांविरुद्ध बोट उगारायचीही हिंमत नाही, हेच दिसून आले. या प्रकरणात पोलिसांची बेशरमी एवढी शिगेला गेली की, बलात्काºयांना पकडण्याऐवजी त्यांनी त्या बलात्कारित मुलीच्या वडिलांनाच उचलून कोठडीत टाकले. या पित्याचा कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर १४ गंभीर जखमा दिसून आल्या. त्यावर त्यांना कोठडीत अमानुष मारहाण झाल्याचे उघड होते. काही तरी केल्यासारखे दाखविण्यासाठी काही पोलिसांना निलंबित केले गेले. खूप ओरड झाल्यावर आदित्यनाथ सरकारने या बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत त्या बलात्कारी आमदाराला अटक करण्याचा आदेश दिला तेव्हा कुठे आमदार सेंगर गजाआड गेला. एकीकडे आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, तर दुसरीकडे त्यांनीच बनविलेली राज्यघटना सत्ताधारी पक्ष पायदळी तुडवितो. याला लोकशाही कसे म्हणावे? हे दबंग लोक स्वत:ला कायदा व समाजाहून श्रेष्ठ मानतात की काय? सुसंस्कृत आणि चारित्र्यवान सरकार यालाच म्हणायचे का? गुन्हेगार कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी तो कायद्याहून वरचढ नसतो. कायदा सर्वांसाठी समान असतो हे सर्वांनी पक्के लक्षात ठेवायला हवे.
खरं तर प्रत्येक राजकीय पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बोलबाला असून ते प्रभावी नेते होऊन बसले आहेत. मतांच्या राजकारणासाठी सर्वच राजकीय पक्ष या गुन्हेगारांपुढे गोंडा घोळत असतात. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सर्वच राजकीय पक्षांनी अशा गुन्हेगारांना पक्षाबाहेर हाकलून द्यायला हवे. बलात्काराच्या घटनांची आकडेवारी घोर चिंता लागावी अशी आहे. सर्वच बलात्कार पोलिसांकडे नोंदविले जातातच असे नाही त्यामुळे वास्तवात होणारे बलात्कार नोंद होणाºया गुन्ह्यांहून जास्त असू शकतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार सन २०१६ मध्ये देशात बलात्काराचे सुमारे ३७ हजार गुन्हे नोंदले गेले. यापैकी ४६२ बलात्कार सहा वर्षांहून कमी वयाच्या मुलींवर झालेले होते. ६ ते १२ वर्षे वयाच्या १,४७४ तर १२ ते १६ वर्षे वयाच्या ५,७६९ मुलींवर बलात्कार झाल्याचे या आकडेवारीवरून दिसते. १६ ते १८ वयोगटातील ८,२९५ मुलींवर बलात्कार झाले.
बलात्कारांनी आता एवढे गंभीर स्वरूप धारण केले आहे की, देशावरील हा कलंक कसा पुसला जाईल यावर सरकार आणि सर्व राजकीय पक्षांनी अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सभ्य समाजात अशा निंद्य कृत्याला जराही थारा असू शकत नाही.
हे लिखाण संपवत असतानाच आणखी एक हृदयद्रावक बातमी आली. गुजरातच्या सूरत जिल्ह्यात ११ वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली गेली. बातमीनुसार तिच्या गुप्तांगावर ८६ जखमा आढळून आल्या. पुण्यभूमी असलेला भारत अशा पाप्यांचा देश कसा काय झाला हे समजेनासे झाले आहे!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
नोएडाचे अनुप खन्ना सध्या समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे कामही तसेच आहे. गरिबांना आपण चांगले जेवण द्यावे, असा विचार अनुप खन्ना यांच्या आईच्या मनात एक दिवस आला. खन्ना लगेच दुसºया दिवसापासून त्या कामाला लागले. सुरुवात १५ लोकांपासून झाली. आज अनुप खन्ना यांच्या घरात शिजविलेले साजूक तुपातील सुग्रास जेवण केवळ पाच रुपयांत दररोज सुमारे ५०० गरीब लोकांना पुरविले जाते. गरिबांनाही भीक घेतल्यासारखे वाटून त्यांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये म्हणून खन्ना जेवणाचे पाच रुपये घेतात! त्यांच्या या स्तुत्य उपक्रमात आता इतरही लोक सहभागी झाले आहेत. अशी ही ‘दादी मा की रसोई’ रोज दु. १२ ते २ या वेळात दारी येणाºयांच्या क्षुधाशांतीसाठी उघडी असते.