लाल मातीतील जिद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 04:39 AM2018-04-14T04:39:40+5:302018-04-14T04:39:40+5:30

लाल मातीची रग आणि जिद्द राजकारणालाही चीतपट करते, हे महाराष्ट्राचा गोल्डन बॉय राहुल आवारे याने दाखवून दिले.

Red soil insistence | लाल मातीतील जिद्द

लाल मातीतील जिद्द

Next

लाल मातीची रग आणि जिद्द राजकारणालाही चीतपट करते, हे महाराष्ट्राचा गोल्डन बॉय राहुल आवारे याने दाखवून दिले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालून राहुलने त्याच्यावरील सर्व आक्षेपांना उत्तर दिले. खेळामधील राजकारण नवे नाही. संघटनेच्या पातळीवर आणि कुस्तीच्या मैदानावरही महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात अनेक डाव रंगले. यातील एका डावाने २०१६च्या रिओ आॅलिम्पिकमधील राहुलची संधी हुकली होती. यापूर्वी २००८मध्ये पुणे येथे यूथ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि तुर्की येथील ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या राहुलने २०१० ते २०१७ दरम्यान राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग सुवर्णपदक जिंकले आहे. ही सगळी देदीप्यमान कारकिर्द आणि तब्बल दोन वर्षे जोरदार तयारी करूनही राहुलचा समावेश झाला नाही. त्याला डावलून भारतीय कुस्ती महासंघाने ५७ किलो वजनी गटात हरियाणाच्या संदीप तोमरची निवड केली होती. त्या वेळी ही निवड वादग्रस्त ठरली. संपूर्ण महाराष्ट्र राहुलवरील अन्यायाविरोधात उभा राहिला. राज्यातील कुस्तीशौकीन, मल्ल, आमदार, खासदारांपासून मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला; पण राहुलला संधी मिळाली नाही. खरेतर, कारकिर्दीच्या या टप्प्यावरील राजकारणाने दुसरा कोणी असता तर हताश झाला असता. पण, रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांनी पाहिलेले स्वप्न, गुरू काका पवार यांची अपेक्षा आणि वडिलांनी कुस्तीच्या ध्येयापायी सोसलेले टक्केटोणपे राहुलच्या मनात होते. त्यामुळे त्याने संयमाने सराव कायम ठेवला. २०१७मध्ये प्रो रेसलिंग लीगच्या पहिल्याच दिवशी मुंबई महारथी संघाकडून खेळून संदीप तोमरला धूळ चारली. सोनिपत (हरियाणा) येथील निवड चाचणीत संदीप तोमरला त्याच्या घरच्या मैदानावर चीतपट केले आणि राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत स्थान मिळविले. मध्यंतरीच्या काळात त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. स्पर्धेत सहभागी होता येते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर त्याने पुनरागमन करून स्पर्धेतील सहभाग निश्चित केला. दररोज तब्बल ८ तास सराव सुरू ठेवला. राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेतील यश ही केवळ पायरी आहे. महाराष्टÑातील लाल मातीतील हे वादळ आता घोंगावत राहणार आहे. आता राहुलपुढे ध्येय आहे २०२०मधील टोकियो आॅलिम्पिकचे. कुस्तीच्या ध्येयापोटी त्याची झोकून देण्याची वृत्ती पाहता, बिराजदार आणि काका पवार यांचे आॅलिम्पिकमध्ये केवळ देशाचे प्रतिनिधित्व करण्याचेच नव्हे, तर सुवर्णकामगिरी करण्याचे स्वप्नही राहुल निश्चित पूर्ण करेल, यात शंका नाही.

Web Title: Red soil insistence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.