समर्पणाचे अक्षय समाधान...नितीन गडकरींना परवाच्या समर्पणातून माणूसपणाचे ते प्रयोजन गवसले
By गजानन जानभोर | Published: September 26, 2017 03:38 AM2017-09-26T03:38:50+5:302017-09-26T03:39:00+5:30
राजकारणी माणसे स्वार्थी आणि श्रेयासाठी हपापलेली असतात. समाजातील हे चित्र ब-याचअंशी खरेही. राजकारणातील तो स्थायीभाव झाल्याने एव्हाना लोकांनाही त्याचे आता काही वाटेनासे झाले आहे.
राजकारणी माणसे स्वार्थी आणि श्रेयासाठी हपापलेली असतात. समाजातील हे चित्र ब-याचअंशी खरेही. राजकारणातील तो स्थायीभाव झाल्याने एव्हाना लोकांनाही त्याचे आता काही वाटेनासे झाले आहे. पण, परवाचा नागपुरातील एक कार्यक्रम सुखद अनुभूती देणारा ठरला. निमित्त होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक संस्थांना दिलेल्या दोन कोटी रुपयांच्या मदतीचे. महाराष्टÑातील सामाजिक संस्थांना, कार्यकर्त्यांना मदत करताना गडकरींच्या मनात उपकृत करण्याची भावना नव्हती किंवा त्यांना त्याचे राजकीय भांडवलही करायचे नाही. या सर्वच संस्था सेवाभावी आणि कार्यकर्ते निष्कांचन आहेत. ते कुणाचे मिंधे नाहीत. त्यातील बहुतेकांना सामाजिक कार्याचा पिढीजात वारसाही नाही. सरकारचे अनुदानी पाठबळ नसताना कुणापुढेही हात न पसरवणारी ही निरिच्छ माणसे आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराईचा संतोष गर्जे. वडील अचानक घरातून निघून गेले. संतोषला हे अनाथपण जाणवू लागले. बहीण आजारात गेली. भाचा अनाथ झाला. संतोषने त्याला पोटाशी धरले. अशीच पाच-सहा अनाथ मुले सावली शोधत त्याच्याजवळ आली. गावालगतच्या एका शेतात शेड घालून या मुलांना घेऊन संतोष राहू लागला. त्यातून ‘सहारा अनाथालय’ जन्मास आले. लातूरजवळ हासेगाव नावाचे खेडे आहे. रवी बापटले हा पत्रकार सतत अस्वस्थ राहायचा. एड्सने मरण पावलेल्या स्त्री-पुरुषांच्या मुलांचे पुढे काय होत असेल? हे त्याच्या अस्वस्थतेचे कारण. १० वर्षांपूर्वी पत्रकारिता सोडली आणि रवीने या एड्सग्रस्त मुलांसोबत राहायला सुरुवात केली. त्याच्या सेवालयात आता अशी ६०-७० मुले राहतात. समाजकंटकांनी रवीची झोपडी जाळली, त्याच्या मुलांना वाळीत टाकले. पण तो खचला नाही. अकोल्याचा महेश्वर अभ्यंकर २२ वर्र्षे दारू प्यायचा. उद्ध्वस्त झाला. एके दिवशी तसाच झिंगलेल्या अवस्थेत गाडीत बसला आणि पुण्याला गेला. त्यातून सावरला. यापुढे अशाच व्यसनाधीन तरुणांसाठी काम करायचे ठरवले. महेश्वरच्या मुक्तचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रात आता दारुडे येतात आणि नवे आयुष्य घेऊन जातात. मेळघाटचे डॉ. रवींद्र-स्मिता कोल्हे या दाम्पत्याने ठरवून फकिरी पत्करली. नागपूरचा रामभाऊ इंगोले हा भला माणूस. वाट चुकलेल्या भगिनींच्या मुलांसोबत सन्यांशाचा संसार मांडून बसला आहे. वरोºयाचे प्राध्यापक मधुकर उपलेंचवार या देवमाणसाचे संपूर्ण आयुष्य गरीब, अनाथ मुलांना घडविण्यात गेले. अहमदनगरचे ‘माऊली’ डॉ. राजेंद्र धामणे, अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी, अकोल्याच्या मंजुश्री कुलकर्णी, नीरज आवंडेकर, कुरखेड्याच्या शुभदा देशमुख, पुण्याचे बास्तु रेगे, फासेपारध्यांच्या मुलांसाठी धडपडणारा मतिन भोसले, मेळघाटचा बंड्या साने, जिव्हाळ्याचे नागेश पाटील, औरंगाबादच्या अंबिका टाकळकर असे कितीतरी प्रामाणिक कार्यकर्ते परवाच्या ‘समर्पण’ कार्यक्रमात होते.
चार महिन्यांपूर्वी गडकरींचा षट्यब्दीपूर्तीनिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. त्या समारंभात त्यांना भाजप नेते, कार्यकर्त्यांनी एक कोटीचा निधी सप्रेम भेट दिला. त्यात गडकरींनी एक कोटीची भर घातली. ‘माझे नाव कुठेही येऊ द्यायचे नाही, तुमच्या संस्थेत माझ्या नावाची पाटीही लावू नका’, हे गडकरींनी या साºयांना आवर्जून सांगितले. प्रत्येक माणूस आपल्या जगण्याचे प्रयोजन कुठेतरी शोधत असतो. ते राजकीय प्रतिष्ठा, ऐश्वर्यात कधीच सापडत नाही. नितीन गडकरींना परवाच्या समर्पणातून ते प्रयोजन गवसले आणि माणूस म्हणून आंतरिक समाधानही लाभले. तेच अक्षय आहे, आयुष्यभर व नंतरही सोबत राहणारे आहे.