मितभाषी ‘एटी’

By admin | Published: May 11, 2017 12:22 AM2017-05-11T00:22:02+5:302017-05-11T00:22:02+5:30

एरवी एखादे पद माणसाच्या पदरात पडले की, त्याचे राहणीमान, वागणे-बोलणे बदलल्याची आणि समाजापासून तो काहीसे अंतर ठेवून वावरू लागल्याची उदाहरणे कमी नाहीत.

Reticent 'AT' | मितभाषी ‘एटी’

मितभाषी ‘एटी’

Next

एरवी एखादे पद माणसाच्या पदरात पडले की, त्याचे राहणीमान, वागणे-बोलणे बदलल्याची आणि समाजापासून तो काहीसे अंतर ठेवून वावरू लागल्याची उदाहरणे कमी नाहीत. परंतु तब्बल आठवेळा आमदारकी व चार वेळा मंत्रिपद भूषवूनही आपल्या वागण्या-बोलण्यात अथवा राहणीमानात कसलाही बदल न करणारी व्यक्ती विरळच ठरावी. अर्जुन तुळशिराम तथा ‘एटी’ पवार हे त्यापैकीच एक. नाशिक जिल्ह्यातील दळवट या आदिवासी गावाच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय क्रांती दल ते राष्ट्रवादी कॉँग्रेस व्हाया कॉँग्रेस व भाजपा अशा सुमारे चार दशकांहून अधिकच्या आपल्या राजकीय प्रवासात एटींनी कसलाही राजकीय वाद ओढवून घेतला नाही, त्यामागील कारणही त्यांच्या शांत व अबोल स्वभावात दडले होते. आक्रमकता व आक्रस्ताळेपणातून प्रसिद्धी जरूर मिळते, परंतु कामे होतातच असे नाही त्यासाठी दोन हात सदा जोडलेले असणेच उपयोगी ठरते. ‘एटी’ याच कार्यशैलीसाठी परिचित होते. दोन हात व एक मस्तक हेच त्यांचे भांडवल. त्याच बळावर त्यांनी विकासापासून दूर राहिलेल्या कळवण तालुक्यातील जनतेसाठी अनेकविध प्रकल्प राबविले. जमीन मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना दगड मारून पळवून लावण्याची प्रथा असणाऱ्या आदिवासी भागात ‘अर्जुनसागर’सारखा प्रकल्प उभारून परिसरातील पाणी समस्या दूर करण्याचे श्रेय तर त्यांना जातेच पण आदिवासींच्या विकासासाठी स्वतंत्र खाते व अर्थसंकल्पात विशिष्ट निधी राखीव ठेवण्याच्या निर्णयाचे सूत्रपातकर्ते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तापी महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. या सर्व पदांना न्याय देताना त्यांनी कळवण व आदिवासी बांधवांकडे कधी दुर्लक्ष होऊ दिले नाही. म्हणूनच कळवण म्हणजे एटी आणि एटी म्हणजे कळवण असे एक सूत्रच होऊन बसले होते. पक्ष बदलला तरी कळवणच्या मतदारांनी एटींची पाठ कधी सोडली नाही. २०१४च्या निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचनेचा फटका त्यांना बसला; पण त्यांच्या साधेपणाने हात जोडून वावरण्यात अखेरपर्यंत बदल झाला नाही. अखेर जनतेला काय हवे असते? आपला नेता आपल्या सोबत आहे, याचेच त्यांना कौतुक असते. त्यामुळेच एटींचे जाणे सर्वांसाठी चटका लावणारे आहे.

Web Title: Reticent 'AT'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.