जगभरातल्या गर्भश्रीमंतांचा सिंगापूरकडे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 05:23 AM2021-06-01T05:23:13+5:302021-06-01T05:23:25+5:30

हवाई वाहतुकीवर निर्बंध आहेत, तर अनेक जण स्वत:चं खासगी विमान घेऊन येथे पाेहोचत आहेत. सिंगापूर हे अनेक लब्धप्रतिष्ठितांसाठी ‘घर’ बनतं आहे. 

Rich people from all over the world travel to Singapore | जगभरातल्या गर्भश्रीमंतांचा सिंगापूरकडे प्रवास

जगभरातल्या गर्भश्रीमंतांचा सिंगापूरकडे प्रवास

Next

अब्राहम मॅसलो या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानं १९४३ मध्ये माणसांच्या भावभावनांवर आधारित एक ‘पिरॅमिडल स्ट्रक्चर’ तयार केलं. माणसाला प्रत्येक पायरीवर, प्रत्येक टप्प्यावर काय हवं असतं, त्याच्या गरजा काय असतात आणि कोणत्या गाेष्टींनी तो प्रेरित होतो, यावर त्यानं प्रकाश टाकला. त्याचा हा ‘पिरॅमिड’ जगप्रसिद्ध झाला. 

यात मॅसलोनं म्हटलं आहे, पहिल्या टप्प्यावर माणसाला अन्न आणि वस्त्र  यासारख्या शारीरिक गरजांची जास्त आवश्यकता असते. दुसऱ्या टप्प्यावर त्याला सुरक्षा आणि संरक्षण या गोष्टींची गरज असते. तिसऱ्या टप्प्यावर प्रेम, नाती, आपल्या जीवाला जीव देणारं असं कोणीतरी असावं असं त्याला वाटतं. चौथ्या टप्प्यावर आपल्या कर्तृत्वाचा लोकांनी आदर करावा, आपल्याला मानसन्मान मिळावा असं माणसाला वाटतं आणि अखेरच्या पाचव्या टप्प्यावर आपण काहीतरी चांगली क्षमता संपादित केलेली असावी, स्वत:चं एक विशिष्ट स्थान असावं असं त्याला वाटत असतं. आज जवळपास ८० वर्षांनंतरही मॅसलोचा हा पिरॅमिड तितकाच प्रसिद्ध आहे आणि एका वेगळ्या कारणानं सध्या तो चर्चेत आहे. जगभरातल्या अति श्रीमंत व्यक्ती या पिरॅमिडच्या खालच्या स्तराकडे जाताना, म्हणजे सुरक्षा आणि संरक्षण या गोष्टींना अधिक प्राधान्य देताना दिसताहेत. कोरोनाच्या काळात तर ते अधिकच स्पष्टपणे समोर आलं आहे. त्यामुळे जगभरातील अति श्रीमंत लोक सध्या कोणत्याही गोष्टीपेक्षा पिरॅमिडच्या प्राथमिक टप्प्याला म्हणजे सुरक्षा आणि संरक्षण या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व देताना दिसतात. आपल्यासाठी ‘सुरक्षित जागा’ शोधण्याच्या त्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे  सिंगापूर. 

अमेरिका, ब्रिटन, चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि भारतातीलही अति श्रीमंत वर्ग ‘सुरक्षित स्वर्ग’ म्हणून सिंगापूरला पहिली पसंती देत आहे. सिंगापूर असंही बऱ्याच आधीपासून जगातील श्रीमंतांचं आवडीचं ठिकाण आहे. हे पर्यटक बऱ्याचदा शॉपिंग, मेडिकल चेकअप आणि कॅसिनो खेळण्यासाठी सिंगापूरला छोटी भेट देतात, पण कोरोनानंतर कायमचं राहण्यासाठीच गर्भश्रीमंतांनी सिंगापूरला अग्रक्रम दिला आहे. ‘वेल्थ मॅनेजमेंट अलायन्स’चे संस्थापक स्टीफन रेपको म्हणतात, “जगात आपण कुठे राहायचं, कुठे स्थायिक व्हायचं हे जे गर्भश्रीमंत स्वत: ठरवू शकतात आणि त्यानुसार निर्णय घेऊ शकतात, त्यांच्यासाठी सिंगापूर हा सध्या ‘आशियाना’ झाला आहे. माझे काही परदेशी क्लायंट आधीच सिंगापूरवासी झाले आहेत आणि इतरही अनेक त्या मार्गावर आहेत!”

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानं केलेल्या सर्वेक्षणानुसार मलेशिया आणि इंडोनेशिया येथील मृत्युदर सिंगापूरपेक्षा तब्बल दहा ते तीस पटींनी अधिक आहे. याशिवाय सिंगापूरमध्ये तीस टक्क्यांपेक्षाही अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे तिथे संसर्गाची भीती कमी आणि सिंगापूरचंही अति श्रीमंतांसाठी पायघड्या घालण्याचं धोरण असल्यामुळे सिंगापूरमध्ये लब्धप्रतिष्ठितांची गर्दी होते आहे. 
‘स्माइल ग्रुप’चे हरीष बहल म्हणतात, “याआधी इथे इतक्या गर्भश्रीमंतांना मी कधीच भेटलो नव्हतो!”
सिंगापूरमध्ये जागा घेण्याचं, तिथे कार्यालयं स्थापन करण्याचं, संपत्ती घेण्याचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. 

अर्थातच २०१८ पासून इथल्या सगळ्याच गोष्टींचे दरही वाढले आहेत, पण त्याच्याशी या श्रीमंतांना काहीही देणंघेणं नाही. सिंगापूरचा एक कार डिलर कीथ ओ सांगतो, “काही दिवसांपूर्वीच मी फेसबुकवर एक मेसेज पाहिला. चीनच्या एका अब्जाधीशाने ४.६५ कोटी रुपयांची बेंटले कार ऑर्डर केली होती. त्यानं फक्त एवढंच विचारलं होतं, कारची डिलिव्हरी कधी मिळेल आणि त्यासाठी किती पैसे द्यावे लागतील?”

सिंगापूरमध्ये अशा प्रकारचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रिमियम सेगमेंटमधील महागड्या कार्स खरेदी करण्याचं परदेशी लोकांचं प्रमाण या वर्षी तब्बल साठ टक्क्यांनी वाढलं आहे. या वर्षीच्या सुरुवातीच्या चार महिन्यांतच बेंटले, रोल्स राॅइस, मर्सिडिज.. अशा तब्बल १३०० गाड्या विकल्या गेल्या. केवळ ५७ लाख लोकसंख्या असलेल्या या देशांतील हा आकडा भल्याभल्यांनाही बुचकळ्यात टाकणारा आहे. या खरेदीदारांमध्ये भारत, चीन, इंडोनेशिया आणि मलेशिया येथील श्रीमंतांची संख्या मोठी आहे. हवाई वाहतुकीवर निर्बंध आहेत, तर अनेक जण स्वत:चं खासगी विमान घेऊन येथे पाेहोचत आहेत. यामुळे ‘हँगर स्पेस’ची (विमान ठेवण्यासाठीची सुरक्षित, कव्हर्ड जागा) मागणीही येथे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिंगापूर हे अनेक लब्धप्रतिष्ठितांसाठी ‘घर’ बनतं आहे. 

पैसे गुंतवा, नागरिकत्व घ्या! 
सहज हवाई वाहतूक, पालकांसाठी मोठ्या कालावधीचे परमिट, स्वस्त बिझिनेस लोन, अत्यल्प स्टॅम्प ड्युटी इत्यादी कारणांमुळे श्रीमंतांना सिंगापूर आकर्षित करीत आहे. याशिवाय समजा तुमच्याकडे किमान पाचशे कोटी रुपयांची संपत्ती असेल आणि त्यातील १४ कोटी रुपये जर तुम्ही इथल्या व्यवसायात गुंतवले, तर तुम्हाला लगेच सिंगापूरचं नागरिकत्वही बहाल केलं जातं.

Web Title: Rich people from all over the world travel to Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.