इंद्रलोकीचा स्टार रिपोर्टर आपला यमके आज खूपच वैतागलेला होता. मराठी भूमीतील घडामोडींच्या रिपोर्टऐवजी चक्क उंदीर जातीवर अभ्यास करण्याची वेळ त्याच्यावर आली होती. महागुरू नारदांनी त्याच्याशी संपर्क साधून इंद्रदरबारात घडलेल्या आगळीकीची माहिती त्याला दिली होती. मराठी भूमीच्या राजदरबारात नाथाभाऊ नामक खानदेशपुत्राने गाजविलेल्या दरबाराची गूँज इंद्रदरबारापर्यंत पोहोचली. स्वर्गलोकातल्या सर्व महालांमधली ‘अखिल मराठी मूषक संघटना’ चवताळून उठली. अस्मिता अन् अस्तित्व काय फक्त मराठी नेत्यांनाच असते काय? आम्हा मराठी मूषकांच्या अस्तित्वाला धक्का लावाल तर आम्ही गप्प बसणार नाही ! गरज पडली तर भूतलावरील आमच्या मूषक बांधवांना आदेश देऊन राळेगणसूत अण्णांच्या मांडीला मांडी लावून रामलीला मैदानावर मूषकांची फौज बसवू! प्रसंगी यावर्षी गणरायाचे वाहक म्हणून सेवा देणारे मूषक संपावर जातील... मूषक ज्ञातीच्या या पवित्र्याने इंद्रदेव व्यथित झाले आणि नारदांना त्यांनी स्टार रिपोर्टर शिष्य यमकेशी मोबाईलवर संपर्क साधायला सांगितले...नारद : शिष्यवर नाथाभाऊंनी असे काय केले की, त्रिलोकातील मूषक ज्ञाती त्यांच्यावर रागावली?यमके : मूषक म्हणजे आमचे उंदीरमामाच ना! अहो, देवेंद्रभाऊंनी आपल्या अष्टरत्न मंडळातील वजनदार रत्न चंद्रकांतदादा यांच्या शिरावर ‘उंदीर मुक्ती’ मोहीम दिली होती. ३ लाख १९ हजार ४०० उंदरांची मुक्ती केल्याचा खलिता नाथाभाऊंच्या हाती पडला. त्यांनी त्या खलित्याची आणि देवेंद्रभाऊंच्या दरबाराची लक्तरे दरबारात टांगली...नारद : उद्धवराजे आणि त्यांचे सैन्य देवेंद्रभाऊंच्या कारभाराची लक्तरे जशी नेहमीच टांगायचा प्रयत्न करतात, तशी एकही संधी नाथाभाऊ सोडत नसतात हे सर्वज्ञात आहे. देवेंद्रभाऊंनी त्यांना अष्टरत्नातून वगळून खानदेशात धाडल्यामुळे त्यांचे तसे वागणे अपेक्षितच आहे. पण देवेंद्रभाऊंनी चिडण्याऐवजी स्वर्गलोकातील मराठी मूषक संघटना का बरे चिडली?यमके : महागुरू, नाथाभाऊंच्या आकडेवारीत झालेल्या घोळामुळे किंवा उंदीर मुक्तीला आता गती मिळेल म्हणून समस्त उंदीरमामा भडकले असतील...नारद : अरे, उलट स्वर्गलोकातील मूषक संघटनेने देवेंद्रभाऊंच्या समतावादी स्वभावाचे कौतुक केले आहे. संघटनेच्या बैठकीत अनेक वादग्रस्त मंत्र्यांना वाचवून कवचकुंडले व ‘स्वच्छता प्रमाणपत्रे’ बहाल करणाऱ्या देवेंद्रभाऊंच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यात त्यांनी मराठी उंदरांच्या बाबतीतही तीच भूमिका घेऊन ‘उंदीर मुक्ती’ कागदावरच करून मूषक संघटनेला समतेने वागविल्याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला...यमके : मग, नाथाभाऊंवर वैतागण्याचा मुद्दा येतोच कुठे?नारद : नाथाभाऊंनी मूषक विरोधक मांजरे किंवा बोके पाळण्याचा दिलेला सल्ला मूषक संघटनेला झोंबला! त्रिलोकाने तो सल्ला मानला तर आपली जमातच धोक्यात येईल म्हणून ते नाथाभाऊंवर खार खाऊन आहेत.- राजा माने
उंदीरमामा नाथाभाऊंवर भडकले
By राजा माने | Published: March 26, 2018 1:20 AM