समर्पण से समर्थन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:03 AM2018-06-12T00:03:00+5:302018-06-12T00:03:00+5:30
मोटाभाई खूप भला माणूस आहे. एवढ्या मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असूनदेखील जरासुद्धा गर्व नाही, की सत्तेचा अहंकार नाही. गांधीबाबांच्या साबरमती परिसरात बालपण गेल्यामुळे सत्य, अंहिसा आणि त्याग या सद्गुणांचे बाळकडू मिळाल्याने त्यांच्या उक्ती आणि कृतीत केसभरही अंतर सापडणार नाही.
- नंदकिशोर पाटील
मोटाभाई खूप भला माणूस आहे. एवढ्या मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असूनदेखील जरासुद्धा गर्व नाही, की सत्तेचा अहंकार नाही. गांधीबाबांच्या साबरमती परिसरात बालपण गेल्यामुळे सत्य, अंहिसा आणि त्याग या सद्गुणांचे बाळकडू मिळाल्याने त्यांच्या उक्ती आणि कृतीत केसभरही अंतर सापडणार नाही. ‘अहर्निश सेवामहे’ हे त्यांचे जीवनध्येय असल्याने सदोदित ते कार्यमग्न असतात. अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून साधी दाढी करायलाही उसंत मिळालेली नाही. पायाला भिंगरी लावल्यागत ते देशभर संचार करत असतात. मोटाभार्इंचा पायगुण असा की, ते अध्यक्ष झाल्याबरोबर कधीकाळी बहुरंगी असलेला भारताचा नकाशा एकदम भगवा झाला! ‘भारतमातेची सगळी लेकरं समान आहेत’ असं गांधीबाबा म्हणायचे. हे ऐकल्यापासून भार्इंनी सगळ्यांना भगवं करण्याचा जणू चंगच बांधला आहे. भार्इंची आणि त्याच्या पक्षाची अशी दिग्विजयी वाटचाल सुरू असताना मध्येच एखादा कानडी अडथळा येतो. पण म्हणून भार्इंनी हार मानलेली नाही. २०२४ हे त्याचं अंतिम लक्ष्य आहे. (या लक्ष्यात २०१९ अनुस्यूत आहेच) यावरून पुराणातील एक कथा आठवली. श्रावण सोमवारचे अनुष्ठान केलेल्या एका उपवर कन्येस भगवान शंकर प्रसन्न होतात आणि एक वर मागण्यास सांगतात. ती कन्या म्हणते, ‘माझी एकच इच्छा आहे.’ भोलेबाबा विचारतात, ‘कसली इच्छा आहे ते तरी सांग. मी पूर्ण करतो’ त्यावर ती कन्या म्हणते, ‘माझ्या नातवांनी मला कैलासयात्रेला न्यावं!’ याला म्हणतात दूरदृष्टी! असो. उगीच विषयांतर नको. सांगायचा मुद्दा असा की, सध्याच्या काळात मोटाभार्इंसारखा दार्शनिक शोधून सापडणार नाही. इतर पक्षांचे अध्यक्ष साखरझोपेत असताना भार्इंनी आपले संपर्क अभियान सुरू केले आहे. परवा ते मुंबईतही येऊन गेले. भेटले कुणाला तर, गानसम्राज्ञी लतादीदी, अभिनयसम्राज्ञी माधुरीताई आणि उद्योगसम्राट रतन टाटा यांना! (दीदींचा आवाज बसल्यामुळे ती भेट टळली.) या तिघांचे समर्थन मिळाले, तर इतरांची गरजच काय? पण काही नतद्रष्ट मंडळींना हे पाहावलं नाही. ते म्हणतात, मोटाभार्इंनी धारावी अथवा बेहरामपाड्याला का नाही भेट दिली? किमान मुंबईतील लोकलप्रवासी किंवा डब्बेवाल्यांना तरी भेटायचं...!’ आम्हाला वाटतं मराठी माणूस अशा शुद्र विचारांमुळेच मागे पडतो. कधी, कुणाला आणि कुठे भेटायचं, हे गुजराती माणसांकडून शिकलं पाहिजे. रतन टाटांची गोष्ट सोडा, पण माधुरीताई मुंबईत राहात असताना आपण तिला साधं हळदी-कुुंकवाला बोलावत नाही. बिचारी अमेरिका सोडून मुंबईला परत आली तरी तिचंं कौतुक नाही. शेवटी तिला आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ‘बकेट लिस्ट’ सिनेमा काढावा लागला. अमितभाई घरी येणार म्हणून तिनं खम्मन ढोकळा, फाफडा, जिलेबी असा खास गुजराती मेनू बनवला होता. पण मोटाभार्इंनी कशाला हात लावला नाही.
त्यावर डॉ. नेनेंनी विचारलं, ‘डायटिंग का?’ भार्इंनी लागलीच पोटावरून हात फिरवत खुलासा केला. ‘नही जी. मीडियावाले पिछे पडे रहते है, इसलिए मैने बाहर का खानाही छोड दिया है’ अमितभार्इंनी हे वाक्य उच्चारताच शेजारी बसलेल्या रावसाहेबांनी तोंडापर्यंत नेलेला ढोकळा पुन्हा प्लेटमध्ये ठेऊन दिला. गाडीत बसताना भाई एवढंच म्हणाले, ‘समर्थन के लिए समर्पण चाहिये!’
(nandu.patil@lokmat.com)